आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिकारी युग स्त्री- सावित्रीबाई फुले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूळनिवासी भारतीय बहुजन समाजामध्ये स्त्रियांचा हुंकार कायम भिंतीआड दाबला गेला. परकीय आक्रमणाने भारतातील मूळ संस्कृती आणि समाजव्यवस्थाच पूर्णपणे उद्ध्वस्त केली. आर्याच्या आक्रमणानंतर मूळची मातृसत्ताक पद्धती नेस्तनाबूत करण्यात आली. आर्यप्रणीत पितृसत्ताक व्यवस्था रूढ झाली. यामुळे स्त्री ही गुलामगिरीच्या साखळदंडात बंदिस्त झाली. आर्याच्या पुरुषप्रधान संस्कृतीने तिला केवळ एक उपभोग्य वस्तू बनवली.
रूढी, परंपरा, देव-देवतांच्या कपोलकल्पित खोट्या-नाट्या कथांमध्ये तिला गुंतवून ठेवण्यात आले. व्रतवैकल्य, मंत्र, जपताप, अनुष्ठान यासारख्या नियमात तिला बांधून ठेवले. यामुळे तिच्यातील प्रतिभा, क्षमता, बुद्धिकौशल्य यासारख्या गुणांचा विकास झाला नाही. जन्मापासून-मरेपर्यंत तिने सेवा करावी, अशीच व्यवस्था आर्यांच्या धर्मव्यवस्थेने केली. ती कशी त्यागमूर्ती आहे याचे फसवे आदर्श तिच्यापुढे ठेवण्यात आले. तिच्या कुठल्याच कार्यकर्तृत्वाला वाव मिळाला नाही आणि तिनेही निमूटपणे, मूक प्राण्याप्रमाणे गुलाम वृत्तीत जगण्याची मानसिक तयारी ठेवली.
भारत गुलामगिरीचे चटके सोसत होता. भारताला गुलामगिरी नवी नव्हती, कित्येक वर्षे भारत देश हा गुलाम राहिला, अशा या गुलाम देशातील गुलाम स्त्री ! काय अवस्था असेल तिची? ‘चूल आणि मूल’ एवढेच तिचे कार्यक्षेत्र होते, पण म्हणून ती कुटुंबात सुरक्षित नव्हती. अनेक वाईट चालीरीती, कुप्रथा, धर्मांची जोखडं यामध्ये ती पिचून गेली. बालविवाह, वैधव्य, सती प्रथेच्या अनिष्ट रूढी परंपरेत ती होरपळत होती. घरातल्या घरात तिच्यावर होणा-या अन्याय आणि अत्याचाराला संपूर्ण इतिहास साक्ष आहे. अशा या धर्मांच्या आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या चौकटी खिळखिळ्या करण्याचे काम सावित्रीबाई फुलेंनी केले. सावित्रीबाई फुलेंनी उचललेले हे पाऊल क्रांतिकारी होते. ज्या काळात स्त्रीला माजघरातून दिवाणखान्यात डोकावून पाहण्याचीही बंदी होती. त्या काळात सावित्रीबार्इंनी स्त्रियांसाठी शाळा काढली. हे केवळ धाडसाचे पाऊल होते! अन्याय आणि अत्याचारापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी ती प्रथम स्वावलंबी बनली पाहिजे हा विचार त्यांच्या मनात होता. म्हणूनच त्यांनी पुण्याला भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली.
धर्माने अव्हेरलेल्या स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे, त्या काळातील सनातनी प्रस्थापित व्यवस्थेला खूप मोठा धक्का होता. पहिल्यांदाच एका शूद्र बहुजन समाजातील स्त्रीने उचललेले ते बंडखोरीचे पाऊल होते. याचा त्रासही त्यांना सहन करावा लागला, पण गुंडांच्या आणि धटिंगणांच्या भीतीला त्यांनी भीक घातली नाही. वेळप्रसंगी अशा गुंडांचे ‘श्रीमुख’ फोडण्याचे अचाट सामर्थ्यही त्यांनी दाखवले, म्हणूनच आत्मसंरक्षणासाठी संपूर्ण स्त्री जातीसाठी सावित्रीबाई फुले प्रेरणादायी आहेत. 3 जानेवारी हा दिवस ‘स्त्री मुक्तिदिन’ म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले या केवळ समाजसुधारकच नव्हत्या, तर स्त्रियांच्या न्याय्य हक्कासाठी लढणा-या प्रेरक शक्ती होत्या. समाजात स्त्री आणि पुरुषांमध्ये असणा-या असमानतेबद्दल त्यांच्या मनात कमालीचा तिटकारा होता. त्यांची ही घालमेल त्यांच्या कवितेतून व्यक्त होताना दिसते त्या म्हणतात -
‘बाईल काम करीत राही, ऐतोबा हा खात राही
पशुपक्ष्यांत ऐसे नाही, त्यास मानव म्हणावे का?’
निसर्गातील सार्थ उदाहरण देऊन ही असमानता केवळ मानव प्राण्यात कशी आहे हे दाखवून समाजातील दांभिकतेवर प्रहार केला आहे. सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तिमत्त्व एक क्रांतिकारी लोकनायिकेच्या रूपात पुढे येताना दिसते. त्या काळी स्त्रियांना वर्ज्य असणा-या कित्येक गोष्टी सावित्रीबार्इंनी मोठ्या हिमतीने केल्या. पेशवाईच्या काळात ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’ची स्थापना केली. सवर्ण जातीतील वाकडं पाऊल पडलेल्या स्त्रियांच्या अनौरस मुलांचे बाळंतपणे करण्यासाठी त्यांना बालहत्या प्रतिबंधक गृहाचा खरा आधार होता. यामुळे संपूर्ण समाजात खळबळ माजली. धर्माच्या ठेकेदारांनी टीकेचे रान उठवले, पण धीरोदत्त व निश्चयाचा महामेरू असलेल्या सावित्री डगमगल्या नाहीत. त्यांनी आपले कार्य जोमाने चालू ठेवले. अशा या कणखर व्यक्तिमत्त्वाच्या युग-स्त्रीने आपल्या पतीच्या निधनानंतर हातात ‘टिटवं’ धरून अंतिम संस्काराचाही विधी पार पाडला आणि महात्मा फुलेंच्या निधनाचा तमाशा करायला बसलेल्या कर्मठ चांडाळ चौकडीला चांगलाच धडा शिकवला ! या घटनेवरून सावित्रीबाई फुले आधुनिक समाज निर्मितीचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावलेल्या ‘सुधारणेच्या रोपट्याचे’ आज वटवृक्ष बनले आहे. हा अन्याय, अत्याचार थांबवण्यासाठी पुन्हा ‘सावित्री’ निर्माण होणे आता शक्य नाही, पण सावित्रीच्या ख-या वारसदार म्हणून स्वत:चा उद्धार स्वत:च करण्याची हिंमत दाखवली पाहिजे. सावित्रीच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आत्मसन्मानाने जगण्याचा निर्धार करायला हवा. सावित्रीच्या याच प्रेरणेची ज्योत पेटवून आपणही ‘अभया’ होऊया ! सावित्रीची ज्ञानज्योत घराघरांत लावूया !