आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anjani Narvane Article About Gujarati Writer Dhruv Bhatt, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक आगळावेगळा गुजराती लेखक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रूढ अर्थानं शिक्षित असणं आणि उत्तम साहित्याचं सर्जक असणं याचा संबंध असतोच असं नाही. आजचे गुजराती भाषेतले अग्रगण्य लेखक ध्रुव भट्ट या अत्यंत साध्या, निगर्वी व्यक्तीनेही हेच सिद्ध करून दाखवलं आहे. शिक्षणात मन लागेना म्हणून कॉलेज सोडून दिले, नावाला नोकरी करू लागले; पण मग त्यांच्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे पेनाच्या टोकातून अक्षरे उमटू लागली आणि कविता लिहिल्या जाऊ लागल्या! गेल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये, गूढवादाकडे झुकणार्‍या अनेक कविता, खिळवून ठेवणार्‍या व अनेक पुरस्कार मिळालेल्या आठ कादंबर्‍या व काही नाटके ही त्यांची साहित्यसंपदा, संख्येनं दबून जायला होईल अशी कदाचित म्हणता येणार नाही; परंतु गुणवत्तेनं आणि लेखनाच्या वेगळेपणामुळं मात्र थक्क करणारी आहे. ज्यांना आपण तळागाळातली अडाणी, वनवासी, आदिवासी प्रजा म्हणतो अशा, पण तेही वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांमध्ये, त्यांच्यातलंच होऊन, त्यांच्या बोलीभाषा, संस्कृतीचा अभ्यास करून, ते उत्तमोत्तम कादंबर्‍या ते लिहितात. शिक्षण अर्धवट सोडलं असलं, तरी रामायण, महाभारत, उपनिषदांचा ध्रुव भट्ट यांनी अभ्यास केला आहे, असे जाणवते.

सध्याच्या शिक्षणाचा निसर्गाशी तुटत चाललेला संबंध वाढवावा व जोपासावा असं ठरवून ते व पत्नी दिव्याबहन सुट्यांमध्ये आसपासच्या मुलांना पायी पायी समुद्रकिनार्‍यानं किंवा जंगलातनं प्रवासाला नेऊ लागले. रात्री निवारा नाही मिळाला, तर वाळवंटातच चूल पेटवून स्वयंपाक करायचा, तिथंच झोपल्या झोपल्या मुलांना चांदण्या-तारे-नक्षत्रांची माहिती द्यायची. अशा भटकंतीनंतर लिहिली गेली ‘समुद्रान्तिके’ ही कादंबरी, जी अनेक पुरस्कार मिळवून गेली (मराठीत ‘सागरीतीरी’). जुजबी नोकरी सोडून मग दोघंही धरमपूरच्या जंगलात (डांग) पिंडवळ येथे जाऊन राहिले. ‘नचिकेता ट्रस्ट’ स्थापन करून तेथील वनवासी मुलांसाठी शाळा सुरू केली. शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी ‘संदर्भ’ मासिक सुरू केले. ज्यात शिक्षक, मुलांनी विज्ञानासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञ मंडळी उत्तरे देत असतात. पिंडवळचं काम चालू करून देऊन ते मध्य प्रदेशात नर्मदा किनार्‍याच्या जंगलात गेले. तेथील अनुभवांमधून जन्म झाला ‘तत्त्वमसि’ या गाजलेल्या कादंबरीचा. तिला साहित्य अकादमीचा व इतर अनेक पुरस्कार मिळाले. या कादंबरीचे मराठीत, इंग्रजीत, हिंदीतही अनुवाद झाले. पुढे ध्रुव भट्ट व त्यांच्या पत्नीचे पाय वळले गीरच्या अभयारण्याकडे. तेथील अभयारण्यात सहकुटुंब मुक्त संचार करणारे सिंह, त्यांच्याबरोबर सहजपणे वागणारे, भोवतालच्या झोपड्यांमध्ये राहणारे गाई, म्हशी पाळणारे भखाड, पर्यटन विभागातली माणसं, इतर अनेक जाती-पोटजातींची माणसं, त्यांच्या बोलीभाषा, रीतिरिवाज, राहणी व संस्कृती, समुद्रकिनार्‍यावरचे मच्छीमार व त्यांचं जीवन या सगळ्यात भट्ट पती-पत्नी इतकी रमली की, अभयारण्याच्या हद्दीवर भालछेल गावी त्यांनी थोडी शेती घेतली. एक लहानसं घर बांधलं आणि ते आता बरेचदा तिथंच राहतात! या वातावरणात लिहिली गेली अप्रतिम कादंबरी- ‘अकुपार’! या कादंबरीला अनेक पुरस्कार तर मिळालेच, आता तिचे नाट्यरूपांतरही झालं आहे आणि ठिकठिकाणी हाऊसफुल्ल प्रयोग होत आहेत! काही वर्षांपूर्वी साहित्य अकादमीनं त्यांना ‘रायटर इन रेसिडेन्स’ची एक वर्षाची शिष्यवृत्ती दिली. भावनगरच्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांबरोबर राहून तेव्हा ध्रुव भट्ट यांनी ‘लव्हली पान हाऊस’ ही कादंबरी लिहिली. मध्यंतरी त्यांच्या ‘कर्णलोक’ व अफलातून कादंबरी ‘अतरापि’ प्रसिद्ध झाल्या, ज्यांचे मराठी व इंग्रजी अनुवाद चालू आहेत. या दांपत्याची तळागाळातल्या माणसांबद्दलची ओढ अजून टिकून आहे. कच्छच्या ओसाड वाळवंटात कामधंद्याअभावी चोर्‍यामार्‍या करून पोट भरणार्‍या ‘गारा’ जमातीवर सध्या लिहिली जातेय ‘तिमिरपंथी.’ त्यांच्या ‘गाये तेना गीत’ या काव्यसंग्रहातून ते स्वत: किंवा इतर लोकही काव्यवाचन करतात.

ध्रुव भट्टांच्या लेखनाची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?- एक तर सर्व भारतवासीयांमध्ये एक समान विचारधारा आहे, धर्म कुठलाही असो, या संस्कृतीचा धर्माशी संबंध नाही असं ते मानतात. ही संस्कृती वनवासी- आदिवासी व आपण सर्वांमध्ये आहे. ती या देशाला एक ठेवते व ठेवेल हा त्यांना विश्वास आहे. त्यांच्या एकाही कादंबरीत प्रेमकथा नाही, म्हणून भडक शृंगारिक वर्णनं नाहीत. खून, मारामार्‍या, कट-कारस्थानंही नाहीत आणि तरीही पुस्तक हातातून सोडवत नाही! तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या प्रदेशातला निसर्ग, त्याची बदलणारी रूपं ही कथेचा महत्त्वाचा भाग असतात. तसंच त्या त्या प्रदेशातील लोक त्यांची त्यांची बोलीभाषा बोलतात. कथानायक शुद्ध गुजरातीत बोलतो! आणि शेवटी, कुठल्याही कादंबरीत कथानायकच कथा सांगतो, पण त्याचं नाव आपल्याला कधीच कळत नाही आणि त्यावाचून अडतही नाही! आणि कादंबर्‍यांना ठोस अंत असा नसतो. आपण विचार करत राहतो की, पुढं काय झालं असेल?
(shravannaa@rvanegmail.com)