आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चाचणी’ प्रश्नाचे उत्तररंग ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी अमेरिकाविरोधी राजकारणाची मशाल हाती धरली आहे. त्यांचे वडील किम जोंग इल यांच्याकडून हा अमेरिकाद्वेषाचा वारसा त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे अमेरिकेसह साऱ्या जगाचा विरोध डावलून उत्तर कोरियाने रविवारी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. ही त्या देशाची सहावी अण्वस्त्र चाचणी होती. या साऱ्या गोष्टी अपेक्षितच होत्या. पूर्व आशियामध्ये असलेला उत्तर कोरिया हा अमेरिकेसह जगातील बहुतांश देशांसाठी एक डोकेदुखी ठरला आहे. १९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. त्याचा परिणाम म्हणून कोरिया देशाचे विभाजन झाले.  उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या दोन देशांत १९५० ते १९५३ या काळात जे युद्ध झाले त्यातून जो कायमस्वरूपी तणाव निर्माण झाला, त्याचाच ताजा अाविष्कार म्हणजे उत्तर कोरियाने रविवारी केलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी. उत्तर कोरिया हा अमेरिकेसह सर्वच प्रगत देशांच्या डोळ्यांत सतत खुपत असतो तर दक्षिण कोरिया हा या देशांसाठी लाडका आहे. मुळात उत्तर कोरिया व दक्षिण कोरियामधे जे अनेक वाद आहेत त्याचा आपल्या स्वार्थी राजकारणासाठी अमेरिका व प्रगत देशांनी आजवर व्यवस्थित उपयोग करून घेतला आहे. तैवान, सिंगापूर, हाँगकाँग (चिनी प्रभुत्वाखालील) व दक्षिण कोरिया हे चार आशियाई ड्रॅगन आहेत. तंत्रज्ञान व आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रगत असे हे चारही प्रदेश असल्याने त्यांना आशियाई ड्रॅगन म्हटले जाते. दक्षिण कोरिया व युरोपीय समुदायाने परस्परांशी सात वर्षांपूर्वी मुक्त व्यापाराचा करार केला होता. त्याच वर्षी जी-२०ची परिषदही दक्षिण कोरियात भरली होती. हा सगळा तपशील लक्षात घेता व्यापारउदिमासाठी दक्षिण कोरिया जसा अमेरिका, युरोप या देशांसाठी लाभदायक आहे तसाच पूर्व आशियात आपले वर्चस्व राखण्यासाठी अमेरिका व युरोपने दक्षिण कोरियाला सहकार्याचा हात नेहमीच देऊ केला होता. शीतयुद्धाच्या काळात उत्तर कोरियाचे जगातील सर्व साम्यवादी देशांशी उत्तम संबंध होते. ही दोस्ती अमेरिकेला कायमच खुपत होती. दक्षिण कोरियात लोकशाहीवादी राजवट तर उत्तर कोरियात हुकूमशाही नांदत आहे. दक्षिण कोरियाला पाश्चिमात्य देशांचे मिळणारे पाठबळ पाहून उत्तर कोरियाने शस्त्रसज्ज होण्यासाठी जे मित्र जोडले त्यात चीनचा महत्त्वाचा सहभाग अाहे. चीनकडून उत्तर कोरियाला अणुतंत्रज्ञानापासून ते अन्नधान्यापर्यंत मदत होते. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन याने सहावी अणुचाचणी करण्याचे जे दु:साहस केले त्यामागे चीनचा भरभक्कम पाठिंबा हेही एक कारण आहेच. भारत व चीन या संभाव्य महाशक्ती आहेत. आशियामध्ये भारताला प्रबळ होऊ द्यायचे नाही ही चीनची नीती आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेला वरचढ होऊ न देण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे उत्तर कोरियासारखे देश चीनसाठी बुद्धिबळातील एक प्यादे आहे.  

उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र कार्यक्रम संपुष्टात आणावा यासाठी अमेरिकेसह प्रगत देश व संयुक्त राष्ट्रे सातत्याने विविध मार्गांनी दडपण आणत असतात. उत्तर कोरियावर निर्बंधही लादण्यात आले आहेत. मात्र इतके असूनही हा देश कोणालाच बधत नाही यामागचे इंगित चीनला व्यवस्थित माहीत आहे. चीनचे जपान, दक्षिण कोरिया, भारत आदी देशांशी काही मुद्द्यांवरुन वाद आहेत. त्यामुळे आशियातील उत्तर कोरियासारख्या देशांना चुचकारून त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतले आहे. उत्तर कोरियातील अण्वस्त्र कार्यक्रमाचा चीनने कायमच तोंडदेखला निषेध केला आहे. पण त्याचे अंतरंग नेमके काय  आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. डोकलाम येथे चीनच्या लष्कराने अलीकडेच घुसखोरी केली होती व त्याला भारताने ठाम विरोध केल्यानंतर त्या भागातून आपले सैन्य चीनने माघारी घेतले. चीन भारतासह अन्य शेजारी राष्ट्रांशी भविष्यात अशा पद्धतीनेच वागत राहणार हे गृहीत धरूनच भारताने वागायला हवे. उत्तर कोरियाशी भारताचे व्यापारी व राजनैतिक संबंध उत्तम आहेत. भारतातून २०१३ मध्ये उत्तर कोरियात ६० दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात झाली होती. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा भारताने कायमच निषेध केला असला तरी तो इतक्या विरोधापर्यंत ताणला जाऊ नये की त्यातून दोन देशांमध्ये निर्माण होणाऱ्या तणावाचा चीन फायदा घेईल. सुदैवाने याचे भान भारतातील प्रत्येक केंद्र सरकारने राखले आहे. उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाला समान अंतरावर ठेवून त्यातून आपले हित साधण्याचे राजकारण भारताने खेळल्यास त्याने चीनला शह बसू शकतो. उत्तर कोरियाने केलेल्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्याची उत्तरे शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने अधिक गांभीर्याने विचार करणे आवश्यक झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...