आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रातःस्मरणीय नालंदा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञानमीमांसा आणि तर्कशास्त्र या ज्ञानशाखांची पायाभरणी करणारे, बौद्ध धर्म प्रसारात मोलाची भूमिका बजावणारे जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ ८०० वर्षांच्या कालावधीनंतर पुनरुज्जीवित होत आहे. नालंदाच्या एकेकाळच्या वैभवाचे दर्शन घडवणारा हा लेख...

नालंदा हे नाव केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगभरातील अनेक तज्ज्ञ-अभ्यासकांना हजार वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असलेले जगातील सर्वात प्राचीन आणि जगप्रसिद्ध विश्वविद्यालय म्हणून परिचित आहे. नालंदा अस्तित्वात असतानाच्या हजार वर्षांच्या कालखंडात एवढे समृद्ध विद्यापीठ जागतिक स्तरावर कुठेही अस्तित्वात नव्हते. नालंदाच्या अस्तित्वाच्या खुणा, पुरातत्त्वीय पुरावे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातही सापडत आहेत. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे आता तब्बल ८०० वर्षांनंतर पुन्हा एकदा नालंदा विद्यापीठाचे चीन, जपान, श्रीलंका आदी देशांच्या साहाय्याने पुनरुज्जीवन करण्यात आले असून त्यासाठी भारत सरकारने २७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

लॉर्ड कनिंगहॅम यांनी सर्वप्रथम नालंदाचे अवशेष शोधून स्थाननिश्चिती केली. बिहारमधील राजगृह किंवा राजगीरपासून उत्तरेस सुमारे ७ मैल अंतरावरील बारागाव म्हणजे पूर्वीचे नालंदा होय. बौद्ध साहित्यामध्ये अनेक ठिकाणी नालंदाचा उल्लेख वारंवार येतो. इथे असलेले पावारिक म्हणजेच आम्रवन हे गौतम बुद्धांच्या काळापासून असल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये येतो. असे म्हणतात की, स्वतः गौतम बुद्धांनीही या विद्यापीठाला भेट दिली होती. मात्र, त्याचे कोणतेही पुरात्त्वीय पुरावे आज अस्तित्वात नाहीत. जैन साहित्यामध्ये महावीरांनी याच नालंदात गोसालची भेट घेतल्याचा उल्लेख येतो. बुद्धांच्या काही काळ आधी महावीर होऊन गेले. मात्र, एकूणच उल्लेखांवरून नालंदा हे बुद्धकाळातही अस्तित्वात असलेले विद्यापीठ असावे, अशी शंका येते.
सम्राट अशोकाच्या कालखंडापासून या नालंदाच्या अस्तित्वाचे पुरात्त्वीय पुरावे निश्चितच सापडतात. बौद्ध साहित्यातील उल्लेखानुसार गौतम बुद्धांचे पट्टशिष्य असलेल्या सारिपुत्ताचे हे जन्मगाव होय. याच सारिपुत्ताचा स्तूप मुंबईतील बोरिवली उपनगराजवळच्या कान्हेरी गुंफांमध्ये आजही पाहायला मिळतो. सम्राट अशोकाने नालंदाला भेट दिली त्या वेळेस त्याला इथे सारिपुत्ताचा (सारिपुत्र) चैत्यस्तूप दिसला. त्यावर त्याने मंदिर उभारण्याचे आदेश दिले, असा उल्लेख असलेली एक ताम्रपट्टीकाही सापडली आहे. बौद्ध धर्मातील महायान पंथाचे हे सर्वात महत्त्वाचे पीठ होते. बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुनाने त्याच्या आयुष्याचा सर्वाधिक काळ नालंदामध्येच व्यतीत केला. इथेच आर्यदेव या त्याच्या शिष्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेत अभ्यास केला आणि नंतर हाच आर्यदेव तिबेट आणि चीनमध्ये धर्मप्रसारार्थ गेला. आजही तिबेट आणि चीनमध्ये बौद्ध धर्माची पताका डौलाने फडकते आहे, त्याला नालंदा विद्यापीठाची पार्श्वभूमी आहे, याचे पुरावे चिनी, तिबेटी, संस्कृत, सिंहली भाषेतील विविध साहित्यामध्ये तर सापडतातच, शिवाय अनेक शिलालेखांमध्येही त्याचे उल्लेख श्रीलंका, जपान, चीन, तिबेट आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये सापडतात.

प्राचीन भारताला भेट देणाऱ्या अनेक तत्कालीन पर्यटकांनी त्यांच्या नोंदींमध्ये नालंदाचा उल्लेख प्रामुख्याने केलेला आहे. भारतात सर्वप्रथम आलेला चिनी प्रवासी म्हणून फाहियान याचा उल्लेख होतो. ‘बुद्धाचा पट्टशिष्य असलेल्या सारीपुत्राच्या जन्म आणि परिनिर्वाणाचे स्थान असलेल्या नालंदाला मी आज भेट दिली. सारीपुत्राच्या परिनिर्वाणाठिकाणी उभारण्यात आलेले चैत्य आजही चांगल्या अवस्थेत पाहायला मिळते.’ फाहियानचा हा उल्लेख चौथ्या शतकातील आहे. त्यानंतर सातव्या शतकात प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युआन श्वांग याने नालंदाला भेट दिली. केवळ भेट देऊन न थांबता त्याने इथे दीर्घकाळ वास्तव्य करून योगसूत्रेही शिकून घेतली. याच विद्यापीठामध्ये तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून पाच वर्षे कामही पाहिले. त्याने नालंदाचा उल्लेख ‘ना-आलम्-दा’ असा केला आहे. म्हणजेच, ज्ञानाचे दातृत्व असलेले ठिकाण. तत्कालीन सुमारे पाचशे व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन नालंदाची जमीन विद्यापीठाला दान दिली आणि त्यातूनच विद्यापीठाची उभारणी झाल्याचाही उल्लेख प्रवासनोंदींमध्ये आहे. शक्रादित्य, बुद्धगुप्त, तथागतगुप्त, बलादित्य, वज्र आणि हर्ष या राजांनी नालंदाला खूप मोठ्या प्रमाणावर राजाश्रय दिल्याचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत. हर्षाच्या कालखंडात ह्युआन श्वांग येऊन गेला. हर्षाच्या दरबारात बौद्ध धर्मातील तज्ज्ञ म्हणून त्याने कामही पाहिले. नालंदाच्या आवारात सहा मोठे बौद्ध मठ असल्याचा आणि मठाच्या बरोबर मध्यभागी संघाराम असल्याचा उल्लेख ह्युआन श्वांग करतो. श्वांगच्या नोंदीनुसार सुमारे शंभर प्राध्यापक आणि पाच हजारांहून अधिक विद्यार्थी इथे वास्तव्यास होते. ब्राह्मणी परंपरा व बौद्ध परंपरा अशा दोन विभागांमध्ये शिक्षणाची विभागणी झालेली होती. विभागांची नावे हेतुविद्या, शब्दविद्या, चिकित्साविद्या अशी होती. सांख्यदर्शनासाठी स्वतंत्र विभाग अस्तित्वात होता. श्वांग आला त्या वेळेस शीलभद्र हे नालंदाचे कुलगुरू होते आणि नालंदा हे पाणिनीय व्याकरणासाठी जगप्रसिद्ध होते.

येथील काही प्राध्यापक हे जगप्रसिद्ध असल्याचा उल्लेखही श्वांग करतो. त्याने दिलेल्या नामावलीमध्ये कुलगुरू शीलभद्र, त्यानंतरचे आचार्य धर्मपाल, चंद्रपाल, गुणमति, स्थिरमति, प्रभामित्र, जिनमित्र, दिङ्नाग आदींचा समावेश होतो. हे विद्यापीठ इतके प्रसिद्ध होते की, तिथले तज्ज्ञ शिक्षक आपल्या राज्यातही अध्यापनाकरिता यावेत, अशी विनंती आसामच्या तत्कालीन राजाने कुलगुरू शीलभद्र यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडून तत्काळ उत्तर न मिळाल्याने नालंदावर आक्रमण करून तज्ज्ञ शिक्षकांना पळवून नेण्याची लेखी धमकीही त्या राजाने दिली होती. या लेखी पत्राबरोबर पाठविलेली राजमुद्रा पुरातत्त्व संशोधकांना नालंदामध्येच सापडली.
नालंदामध्ये असलेल्या शिक्षकांची कुलपती, अध्यापती अशी व्यवस्थित वर्गवारी करण्यात आलेली होती. इच्छुक विद्यार्थ्यांच्या मुलाखती तज्ज्ञ प्राध्यापकांनी घेतल्यानंतर त्यांच्या निवासाची सोय त्यांच्या हुशारीनुसार केली जात असे. स्थवीर पदापर्यंत पोहोचलेल्या शिक्षकांना सर्वोत्तम निवासव्यवस्था मिळत असे. असलेल्या तर इथून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पंडित म्हणून संबोधले जात असे.

नालंदा हे जसे विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध होते तसेच ते येथील ग्रंथालयासाठीही जगप्रसिद्ध होते. पाच मजली (सुमारे साठ फूट उंचीच्या) तीन भव्य इमारतींमध्ये हे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय वसलेले होते. बख्तियार खिलजी या आक्रमकाने अकराव्या – बाराव्या शतकात आक्रमण करून नालंदा पूर्ण उद्ध्वस्त केले, त्या वेळेस जाळलेल्या या ग्रंथालयातून पुढचे तब्बल सहा महिने धूर येत असल्याचे उल्लेखही तत्कालीन ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. त्यावरून येथील ग्रंथसंपदेची कल्पना यावी.
आज जपान, चीन, जावा-सुमात्रा, कोरिया, मध्य आशियातील अनेक देश याठिकाणी बौद्ध धर्म अस्तित्वात आहे. त्याची मुळे नालंदा विद्यापीठात रुजलेली आहेत. येथूनच बाहेर गेलेल्या नागार्जुन, आर्यदेव, बुद्धपलित, भावविवेक, चंद्रकीर्ती, शांतिदेव, शांतरक्षित, कमलशील, असङ्ग, वसुबंधू, दिङ्नाग, धर्मकीर्ती, विमुक्तीसेना, हरिभद्र, गुणप्रभा, शाक्यप्रभा आणि दीपंकर आतिष या सतरा जगद्विख्यात विद्यार्थ्यांनी बौद्धधर्म जगात सर्वदूर नेला. चीन, जपान, कोरिया, तिबेट, श्रीलंका, म्यानमार आदी सर्व देशांमध्ये बुद्धवंदनेसाठी जी प्रार्थना केली जाते, त्यातील पहिल्या चरणातच नालंदाच्या या सर्व सतरा विद्यार्थ्यांचा उल्लेख प्रातःस्मरणीय म्हणून आदराने केला जातो. विद्यमान बौद्ध धर्मगुरू दलाई लामा म्हणतात, प्रत्येक बौद्ध धर्मपालन करणाऱ्याच्या दिवसाची सुरुवात गौतम बुद्धाबरोबरच नालंदाच्या या सतरा विद्वानांच्या नामस्मरणानेच व्हायला हवी.
नालंदा विद्यापीठाच्या आता होत असलेल्या पुनरुज्जीवनाला म्हणूनच एक आगळेवेगळे महत्त्व असून जगभरातील अनेक देशांनी त्यासाठी आर्थिक पाठिंबा तत्काळ जाहीर केला आहे. चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांनी प्रत्येकी एक दशलक्ष अमेरिकन डॉलर देऊ केले आहेत. काळानुसार आता नालंदालाही बदलावे लागेल. त्यामुळे पुनरुज्जीवित नालंदा विद्यापीठात यापुढे परिस्थितिकी (इकॉलॉजी), पर्यावरणशास्त्र अशा नव्या विषयांचाही समावेश करण्यात आला आहे. ४४३ एकरांवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या या विद्यापीठाचा प्रारंभ १५ विद्यार्थ्यांपासून सुरू करण्यात आला असून सध्या ७ प्राध्यापक आहेत. सात विविध नवीन महाविद्यालये याच आवारात उभी राहणार असून तिथे पदव्युत्तर संशोधनास वाव दिला जाणार आहे. २०२० पर्यंत नालंदा पुन्हा सुस्थितीत येईल, अशी अपेक्षा आहे.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत. anuradhaparab@gmail.com)