आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलचे वादग्रस्त तंत्रज्ञान ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोबाइल फोन निर्मितीतील बलाढ्य व कल्पनांना प्रत्यक्ष साकार करणाऱ्या अॅपल कंपनीने या आठवड्यात ‘आयफोन-एक्स’ची घोषणा केली. या फोनचा वापर करणाऱ्या व्यक्तीने आपला चेहरा फोनपुढे ठेवल्यास हा फोन अनलॉक होतो, असे नवे तंत्रज्ञान मोबाइल फोनच्या इतिहासात पहिल्यांदाच आणले गेले आहे. अॅपलचे म्हणणे आहे की, चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकाची सुरक्षितता आणि फोन व ग्राहक यांच्यात विश्वास निर्माण झाला आहे. आपल्याकडे काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डच्या मुद्द्यावर व्यक्तीचा खासगीपणा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे मान्य केले होते. या पार्श्वभूमीवर अॅपलने चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान फोनमध्ये आणून हा वाद अधिक चिघळवला आहे. त्याचे पडसाद आता जगभरातील नियतकालिकांत उमटू लागले आहेत. अत्यंत वैचारिक व प्रतिष्ठित अशा ‘इकॉनॉमिस्ट’ या नियतकालिकाने ‘अॅपलचे नवे तंत्रज्ञान व्यक्तीच्या चेहऱ्यांवरील विविध भाव, छटा, सुरकुत्या यांची व्यापक माहिती गोळा करून ती संग्रहित करेल आणि त्याचे विश्लेषण करेल व या कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर डेटा तयार होईल. परिणामी व्यक्तीच्या जगण्यातील नैसर्गिकतेवर परिणाम होईल. तसेच चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानामुळे रोजगार देण्यात कंपन्या भेदभाव करतील. काही कंपन्या जात, वर्ग, धर्म, लैंगिकता, बुद्धिमत्ता यांच्या आधारावर एखाद्याचा नोकरीचा अर्ज फेटाळून लावू शकतील,’ अशी भीती व्यक्त केली आहे. या भीतीत तथ्य आहे. त्यामुळे आपल्याला व्यक्तीचा खासगीपणा, नैतिकता, तंत्रज्ञानाची मानवी जीवनातील घुसखोरी, सरकारला समाजावर हवे असणारे नियंत्रण आणि बाजारपेठेला ग्राहकाची हवी असणारी माहिती अशा परिघात विचार करावा लागणार आहे. अॅपलने चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणले असले तरी  सीसीटीव्ही, बुबुळे व बोटाचे ठसे अशा माध्यमांचा सुरक्षा यंत्रणा वापर करत आहेत. सीसीटीव्हीचा तर आपल्याकडे सुकाळ झाला आहे. सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्हीचे समर्थन केले जात होते. त्यामुळे सीसीटीव्ही आपल्या कार्यालयात, बिल्डिंगमध्ये दिसून येतात. पण जेव्हा तुमचा चेहरा कॅमेराबद्ध केला जातो व अशा लाखो चेहऱ्यांचा संग्रह खासगी कंपन्या किंवा सरकारकडे जमा होतो तेव्हा अनेक कायदेशीर व व्यक्तिस्वातंत्र्याचे मुद्दे पुढे येत राहतात. अमेरिका, युरोपात मॉलमध्ये िशरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र टिपले जाते व त्याच्या खरेदी सवयींची माहिती गोळा केली जाते. एखाद्या वस्तूच्या खरेदीदरम्यान ग्राहकाच्या चेहऱ्यावर दिसणारे वेगवेगळे मूड हे आता उत्पादक कंपन्यांसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. कोणता ग्राहक कोणत्या वस्तूंची किती प्रमाणात खरेदी करत असतो याची सर्व माहिती कंपन्या गोळा करतात व त्याचे विश्लेषण करून ग्राहकाला आपल्या बाजूने खेचण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरतात. इंटरनेटवर अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या बड्या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांवरील उत्पादने आपण पाहत असतो किंवा खरेदी करतो तेव्हा आपली आवडनिवड कोणती आहे याची विश्लेषणपूर्ण माहिती या कंपन्यांकडे जमा होत असते व पुढील खरेदीवेळी ते आपल्यापुढे किमतीनुसार पर्याय ठेवत असतात, नव्या ऑफर देत असतात. अॅपलचे चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान याच जातकुळीतले आहे. काही महिन्यांपूर्वी एका दहशतवाद्याकडील आयफोनमधील माहिती अमेरिकेच्या एफबीआय सुरक्षा यंत्रणेने अॅपलकडे मागवली होती. त्याला खासगीपणाच्या मुद्द्यावर अॅपल कंपनीने जोरदार विरोध केला होता. न्यायालयात हे प्रकरण गेले. अखेर अॅपलला माघार घ्यावी लागली. अॅपल आपल्याकडे ग्राहकांची माहिती राहील व त्याचा दुरुपयोग होणार नाही असे सांगत असताना हे प्रकरण घडले होते.  

आपल्याकडे मोबाइलची मोठी बाजारपेठ जन्मास आली आहे. रोज नवा ब्रँड किंवा मोबाइलचे नवे व्हर्जन येत असते. या कंपन्या आता चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणतील व कोट्यवधी ग्राहकांची व्यक्तिगत माहिती या कंपन्यांकडे जमा होईल. ही माहिती विकली जाईल व बाजारयुद्ध तीव्र होत जाईल. ग्राहकांच्या छायाचित्राचा दुरुपयोग होण्याची भीतीही आहे. आपल्याकडे मोबाइल कंपन्यांना न्यायालयात खेचावे यादृष्टीने जनमत तयार झालेले नाही किंवा तसे सायबर लॉ कडक नाहीत. खासगीपणा जपला जाणे हा व्यक्तीचा मूलभूत व व्यक्तिस्वातंत्र्य अधिकार आहे. आपले खासगी आयुष्य जगाला न सांगणे म्हणजे आपण काही लपवतोय असा त्याला तर्क लावता येत नाही. आपला चेहरा आपले व्यक्तिमत्त्व असते, माणूस आपल्या चेहऱ्यावर प्रेम करत असतो. त्याचा गैरवापर करण्याची मुभा कोणालाच असू नये, सरकारला व कंपन्यांनासुद्धा!
बातम्या आणखी आहेत...