आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apurva Jakhadi Article About Space, Divya Marathi

स्मरण गागारिनच्या अवकाशयात्रेचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अशा दोनच महासत्ता उदयास आल्या. या महायुद्धाची झळ युरोप, सोव्हिएत युनियनसह अमेरिकेलाही बसलेली असल्याने प्रत्यक्ष युद्धाऐवजी नवे राजकीय डावपेच, शस्त्रास्त्रनिर्मिती, अणुस्फोट किंवा अन्य देशांना लष्करी मदत, अशा पद्धतीने दोन्ही महासत्ता जगाच्या राजकारणावर अंकुश ठेवू लागल्या होत्या. शीतयुद्धाची सुरुवात ही अशी होती. अशाच संघर्षमय काळात सोव्हिएत रशियाने 1957मध्ये ‘स्पुटनिक’ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह अंतराळात पाठवला आणि त्यानंतर सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेदरम्यान अंतराळात याने पाठवण्याची स्पर्धाच सुरू झाली. अमेरिकेने पहिला मानव अंतराळात पाठवण्याचे नियोजन केले होते; पण रशियन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी कठोर परिश्रमांनी अमेरिकेपूर्वी ते साध्य करून दाखवले होते. 12 एप्रिल 1961 रोजी 27 वर्षांचा युरी गागरिन हा रशियन तरुण अंतराळात जाणारा पहिला मानव ठरला.

‘व्होस्तोक-1’ या यानातून झेप घेऊन त्याने तब्बल 108 मिनिटांत जमिनीपासून 203 मैल, म्हणजेच 327 किलोमीटरवरून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून इतिहास घडवला. शिवाय ‘व्होस्तोक-1’ या कॅप्सूलसदृश दिसणार्‍या यानाची केलेली रचना हेसुद्धा महत्त्वाचे संशोधन होते. 2011मध्ये युरी गागारिनच्या अंतराळ उड्डाणाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जगभरात ‘हॅप्पी युरी नाइट’ या विशेष कार्यक्रमाचे जगभर आयोजन करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी संपूर्ण एप्रिल महिन्यात या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

अंतराळात जाणार्‍या पहिल्या यानातील पहिला मानव हा बहुमान हा रशियन युरी गागारिनला मिळाला असला तरी त्याची झेप ही मानवी संस्कृतीच्या इतिहासात एक ऐतिहासिक टप्पा होती. अंतराळात गेल्यावर युरी गागारिनने त्याला आवडणारे ‘द मदरलँड हिअर्स, द मदरलँड नो, व्हेअर हर सन फ्लाइज इन द स्काय’ हे गीत गुणगुणले. प्रख्यात वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्सने 14 एप्रिल 1961 रोजी आपल्या मथळ्यात, ‘मानवाने अंतराळात उच्चारलेले पहिले शब्द’ अशा वाक्यात गागारिनच्या अवकाशझेपेचा गौरव केला.

युरीने 1955मध्ये तांत्रिक शिक्षणाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो रशियन लष्करात दाखल झाला. 1957मध्ये त्याची हवाई दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती करण्यात आली. 1960मध्ये कठोर चाचण्यांनंतर 19 विमानचालकांसह युरीची रशियाच्या अंतराळ मोहिमेसाठी निवड करण्यात आली. ‘सोची सिक्स’ या निवडक गटाला देण्यात येणार्‍या प्रशिक्षणासाठी तो निवडला गेला. पाठोपाठ ‘व्होस्तोक’साठी निवडला जाणारा तो पहिला व्यक्ती होता. शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या अनेक कठोर चाचण्यांनंतर 20 जणांमधून त्याची पहिला अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती. तो चाणाक्ष, बुद्धिमान आणि हजरजबाबी होेता. गुंतागुंतीची गणितीय आकडेमोड करण्याबरोबरच यंत्रांची क्षमता समजावून घेण्यातही तो कुशल होता. गंमत म्हणजे, युरीची उंची केवळ पाच फूट दोन इंच असल्यामुळे त्याची निवड या मोहिमेसाठी करण्यात आली होती, कारण ‘व्होस्तोक-1’ यानाचा आकार लहान असल्यामुळे त्यात कमी उंची असणारी व्यक्ती हालचाली करण्यासाठी योग्य ठरणार असल्याने ही संधी युरीला मिळाली. दुसरी विशेष बाब म्हणजे, गुरुत्वाकर्षणरहित पोकळीचे चालकावर नेमके कोणते परिणाम होतील, याची काहीही माहिती नसल्यामुळे या यानाचे सर्व नियंत्रण पृथ्वीवरून केले जात होते.

आपत्कालीन स्थितीत पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाचा यानाशी असलेला संपर्क तुटला तर यान नियंत्रणात ठेवता यावे, यासाठी युरीला काही सांकेतिक शब्द (कोड) देण्यात आले होते. त्याच्या मदतीने तो यानाचे नियंत्रण करणार होता आणि पुन्हा पृथ्वीवरील कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार होता. आफ्रिका खंडावर यान असतानाच गागारिनला पृथ्वीवर आणण्यासाठी तयार करण्यात आलेले यानाचे इंजिन कार्यान्वित झाले. ‘व्होस्तोक-1’ची रचना अशी होती की, इंजिन खराब झाल्यास ते नैसर्गिकरीत्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणात परतू शकेल, तसेच या स्थितीत गागारिनला दहा दिवस यानात राहता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्याची आवश्यकता भासली नाही. यान वातावरणात परतताच त्याच्यावर गुरुत्वाकर्षणामुळे दहापट दाब वाढला. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेत मानव कसा राहू शकतो, याबाबत विज्ञान शाखेत प्रयोग केले जात होते, हा तो काळ होता. गागारिन गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेत असताना त्याच्या शरीरावर गंभीर असे परिणाम झाले नाहीत. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना वेग कमी करणारी यंत्रणा ‘व्होस्तोक -1’मध्ये नव्हती. त्यामुळे वातावरणात यानाने प्रवेश केल्यानंतर जमिनीपासून चार मैल, म्हणजे सात किलोमीटर उंचीवर असताना गागारिन पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीवर सुखरूप परतला. अंतराळ प्रवासानंतरही गागारिन विमानांच्या चाचण्या घेण्याचे काम करीत असे. ‘मिग 15 यूटीआय’ या विमानाची चाचणी घेत असताना 27 मार्च 1968 रोजी वयाच्या 34व्या वर्षी अपघातात या साहसवीराचा मृत्यू झाला.

अपूर्वा जाखडी
(लेखिका या नासा स्पेस एज्युकेटर आहेत.)