आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरे असहिष्णू कोण?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मे २०१४ ला देशात सत्तांतर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. हे सत्तांतर अनेकांना अनपेक्षित होते. एका विशिष्ट विचारसरणीत जगणाऱ्यांना स्वप्नातदेखील असे वाटले नव्हते की, जनता बहुमताने भाजपला निवडून देईल. पहिले काही महिने हा धक्का कसा सहन करायचा यातच गेले. नंतर केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध कोणकोणते विषय घेऊन उभे राहता येईल, याची आखणी सुरू झाली. त्यातील काही विषय असे - हे सरकार दलितविरोधी आहे, हे सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधी आहे, हे सरकार असहिष्णू आहे, हे सरकार लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक मूल्ये यांना संकटात आणील, बहुमताची हुकूमशाही भाजप निर्माण करील. या विषयांना धरून समविचारी मंडळी त्यांना उपलब्ध होणाऱ्या व्यासपीठांवरून झंझावाती प्रचार करताना दिसतात.  
 
सहिष्णुतेचा एक विषय घेऊया. उपराष्ट्रपतिपदावरून निवृत्त होताना मुहंमद हमीद अन्सारी म्हणाले की, “जर विरोधी गटाला सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले नाही तर लोकशाही जुलूमशाहीत परावर्तित होण्याचा धोका असतो.’ आणखी एका समारंभात ते म्हणाले की, “अल्पसंख्याकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत चालली आहे. त्याला उत्तेजित राष्ट्रवाद कारणीभूत आहे.’ हमीद अन्सारी यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्तम अभिनेते अमोल पालेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चर्चासत्रात म्हणाले की, ‘बहुसमावेशक रचनेला वेगवेगळ्या स्वरूपांत आव्हान देणारे, वेगाने बाहेर येणारे विषारी बाण रोखण्यासाठी एक अभेद्य भिंत उभी करण्याचं, अहिंसक परंतु आक्रमक आव्हान आपण स्वीकारणार आहोत की नाही हा कळीचा मुद्दा आहे.’  
 
अमोल पालेकरांच्या पाठोपाठ सिनेसृष्टीतील गीतकार जावेद अख्तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमात म्हणाले, “ज्या देशात तत्त्वज्ञान, धार्मिक श्रद्धा, सरकार आणि शासन यंत्रणा यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेला नसेल तो देश आणि देशातील वातावरण निकोप आहे, असे कसे म्हणता येईल?... धर्माच्या आडून सत्ता राबवू पाहणाऱ्यांपासून आपण स्वत:ला आणि देशाला वाचवायला हवे.’  
 
तिघेही आपापल्या परीने विद्वान असल्यामुळे असहिष्णुतेचा विषय त्यांनी सैद्धांतिक भाषेत मांडला आहे. तो सोप्या भाषेत मांडायचा तर केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात असहिष्णुता वाढत चालली आहे, बहुविधता धोक्यात येत चालली आहे, लोकशाही संकटात येत चालली आहे, असा मांडता येतो.  

यापैकी प्रत्येकाच्या भाषणातील भाजपचा संदर्भ सोडला तर विचार देण्याच्या दृष्टीने सगळी भाषणे चांगली आहेत. त्यातले विचारही चांगले आहेत, फक्त प्रश्न असा निर्माण होतो की, या सर्व लोकांना दिल्लीत सत्तांतर झाल्यानंतरच कंठ का फुटला? अगोदर देशात सहिष्णुतेचा पाऊस पडत होता आणि २०१४ नंतर सहिष्णुतेचा दुष्काळ पडला, असे झाले आहे का?  
 
थोडे इतिहासात जाऊया. फार लांब जायची गरज नाही. स्वातंत्र्यानंतरचा ७० वर्षांचा इतिहासच बघूया. असहिष्णुतेचा पहिला फटका पंडित नेहरूंनी हिंदुत्ववादी संघटनांना दिला. गांधी खुनाचा खोटा आरोप ठेवून देशभक्तीचा मूर्तिमंत आदर्श असलेल्या सावरकरांना खटल्यात गोवले, कारण ते हिंदुत्ववादी होते. गांधी हत्येशी संघाचा बादरायण संबंध नसताना संघावर बंदी घालून हजारो स्वयंसेवकांचे संसार उद्ध्वस्त केले. नंतर असहिष्णुतेची नेहरूनदी देशात महापूर आल्यासारखी वाहू लागली. समाज जीवनातून सगळे हिंदुत्ववादी अस्पृश्य झाले. त्यांना चिरडून टाकण्याचा नाझी-फॅसिस्ट प्रयोग देशात झाला. अपप्रचाराचा महासागर निर्माण केला गेला. या असहिष्णुतेबद्दल कोणी अश्रू ढाळल्याचे मी तरी पाहिले नाही. ‘संघ अरबी समुद्रात बुडवला पाहिजे,’ ‘संघ ही रुचिहीन, रंगहीन, अर्थशून्य संघटना आहे,’ यावर रकानेच्या रकाने भरून लिखाण झाले.  
 
ही असहिष्णुतेची नेहरूनदी कधी आटली नाही. यूपीए शासनाच्या काळात अंदमान कालकोठीतील सावरकरांच्या कवितेतील वचने काढून टाकण्यात आली. तेव्हा हे सर्व सहिष्णुतावादी खूप आनंदित झाले असावेत. १९९०च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून वेचून वेचून हिंदूंना ठार करण्यात आले आणि त्यांना काश्मीरमधून हाकलून देण्यात आले, तेव्हाही सहिष्णुतेचा खूप मोठा जय झाला. केरळमध्ये दरवर्षी संघाचे निष्ठावान कार्यकर्ते मार्क्ससिस्टांकडून ठार मारले जातात, असे कार्यकर्ते मेले की सहिष्णुतेची पताका अधिक उंच होते. अशा कोणत्याही प्रसंगी आता जे सहिष्णुतेवर कोकीळकंठी झालेले आहेत ते चुकूनही आपला पंचम लावत नाहीत. यांची सहिष्णुता सिलेक्टिव्ह सहिष्णुता आहे. आपल्याला जे सोयीचे त्याबद्दल सहिष्णुता, आपल्याला जे पटत नाही, आपल्या विचारांशी ज्यांच्या विचारांचा मेळ बसत नाही, ते सगळे असहिष्णू. अशी ही सहिष्णुतेची सोपी व्याख्या आहे.  
 
प्रश्न सहिष्णुतेचे काय होणार असा नसून आता जे आलाप करत आहेत त्यांच्या दुकानदारीचे काय होणार हा आहे. भारतीय समाजाला आणि त्यातही हिंदू समाजाला असहिष्णू करण्याची ताकद कोणत्याही हिंदुत्ववादी विचारधारेत नाही. सहिष्णुता समाजाच्या जिन्समध्ये आहे. नुसती सहिष्णुता नसून सत्य एक असून ते जाणण्याचे अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्ग सत्य आहे, हा विचार प्रत्येकाच्या हृदयात अत्यंत खोलवर रुजलेला आहे. त्याची हजारो वर्षांची परंपरा आहे, हा विचार कोणत्याही राजकीय नेत्याने, राजकीय विचारसरणीने किंवा पाश्चात्त्य लोकशाही संकल्पनेने रुजवलेला नाही. त्याचे श्रेय भारतातील महापुरुषांना आणि संतांना द्यावे लागते. रामकृष्ण परमहंस यांनी ‘सर्व मार्ग सत्य आहे’ हे सिद्ध करण्याचा प्रयोग स्वत:च्या शरीराच्या साहाय्याने केला. भारताची ही महान परंपरा बदलण्याचे सामर्थ्य भाजपत नाही, नरेंद्र मोदींमध्ये तर मुळीच नाही; ही परंपरा अधिक सक्षम करण्याचे काम भाजप आणि नरेंद्र मोदी यांना करायचे आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा हातात घेणाऱ्या गोरक्षकांना दोनदा समज दिलेली आहे, १५ ऑगस्टच्या भाषणातही त्यांनी समज दिली आहे. देशातील सगळे थोर पुरुष आपले आणि त्यांच्या देशसेवेबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे, हा विचार घेऊन ‘विवेक’चा चरित्रकोशाचा प्रकल्प गेली ८ वर्षे चालू आहे. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या खंडात सगळ्याच विचारधारेतील थोर पुरुषांचा समावेश केलेला आहे. कोणालाही कसलीही कात्री लावली नाही, सहिष्णुता अशी जगायची असते.
 
ज्यांनी गेली ७० वर्षे असहिष्णुतेचे राज्य या देशात केले, त्यांचे राज्य गेल्यामुळे त्यांनी रडणे स्वाभाविक आहे. काळ बदलला आहे, पिढ्या बदललेल्या आहेत, असहिष्णू लोकांनी आणि विचारधारांनी सहिष्णुतेचा बुरखा पांघरून काही लोकांना काही काळ फसवले, परंतु सर्व लोकांना सर्वकाळ फसवता येत नाही. पूर्वी कोणी त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस करू शकत नव्हते, आज प्रश्नच काय, त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची मन:स्थिती आहे. सहिष्णुतेवर प्रवचन देण्यापूर्वी या सर्व मंडळींनी स्वत:लाच प्रश्न विचारला पाहिजे की, असे प्रवचन देण्याची माझी योग्यता आहे का?

 
 
बातम्या आणखी आहेत...