आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्ट ऑफ लिव्हिंग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य मिळाले त्या क्षणापासून पाच हजार वर्षांचे ‘सांस्कृतिक’ वय जपणा-या भारतीयांना आपण तरुण आहोत असे कधी वाटले नाही. पण त्यांना आपण वृद्ध आहोत असेही कधी वाटले नाही. ग्रामीण भागातील वृद्धांनी आपले वृद्धत्व स्वीकारले होते, पण शहरी वृद्धांना ते झेपले नाही.
संसदीय लोकशाहीचा स्वीकार आणि अंमल करणा-या भारताने स्वातंत्र्याची पासष्टी गाठली आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर भारत आता ‘वरिष्ठ नागरिक’ ठरला आहे. या वरिष्ठ नागरिकाने लोकशाहीचे सर्वच्या सर्व ‘स्तंभ’ काबीज केले आहेत. त्याला कौटुंबिक ज्येष्ठत्व अजूनही हवे आहे. त्यासाठी त्याने विभक्त कुटुंब पद्धतीऐवजी अविभक्त कुटुंब पद्धती नव्याने रुजावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात अमिताभ बच्चन नावाचे एक गडगंज कलावंत चांगलेच तरबेज आहेत. लोकांनीदेखील त्यांचे हे बहुउद्देशीय ‘ज्येष्ठत्व’ मान्य केले आहे आणि राजकीय परिस्थिती काहीशी वेगळी असून या क्षेत्रातील एकही ज्येष्ठ वा वरिष्ठ नागरिक आपण थकलो आहोत, असे म्हणत नाही आणि मानतही नाही. अधूनमधून तसेच ऐन निवडणुकीच्या काळात तरुणांच्या हाती सत्ता आणि देशाचे भवितव्य देण्याचे वक्तव्य केले की भागते. अर्थात तरुणांच्या हाती सत्ता याचा अर्थ आपल्या घरातील वा नात्यातील युवा- युवतींना तिकिटे मिळवून त्यांना सत्तेच्या मार्केटमध्ये सजवून उभे केले की काम फत्ते, एवढाच असून त्यात सर्वपक्षीय राजकारणी तरबेज आहेत. मोक्याच्या ठिकाणी फलक लावून थोडी जाहिरातबाजी केली की यांच्या हातात सत्ता द्यायला आपणही मोकळे. खरे तर भारतातील बहुसंख्य तरुण वर्गाला राजकीय सत्तेचा मोह कधी पडत नाही. उत्तम शिक्षण, नोकरी, छोटासा व्यवसाय आणि आत्मसन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळाली तर स्वत: ज्येष्ठ नागरिक होईपर्यंत त्यांची अन्य काही अपेक्षा नसते. प्रत्यक्षात वेगळेच घडताना दिसते!
अलीकडच्या काळात तरुणांपेक्षा ज्येष्ठ-वरिष्ठ नागरिकांच्या अपेक्षाच अधिक वाढल्या आहेत. त्यांची संख्या वाढते आहे. स्वतंत्र भारत शंभरी गाठेल (15ऑगस्ट 2047) तेव्हा देशातील पासष्टी ओलांडलेल्या सीनियर सिटिझन मंडळींचे देशातील प्रमाण निम्म्यापेक्षा अधिक असेल. पूर्वी ग्रामीण भागात अशा
नागरिकांसाठी खास कट्टे असत. देवळे असत. तिथेच पान- सुपारी -तंबाखू-विड्यांची देवाणघेवाण होत असे. लग्ने ठरत आणि न्यायनिवाडे होत असत. तंटे सोडवले जात असत. भुताखेतांच्या गोष्टींना ऊत येई. राजकारणावरसुद्धा चर्चा होत. सामूहिक पेपर वाचन तर अनेक ठिकाणी होत असे. पंचायतीच्या अंगणात एखादा रेडिओ बातम्या देत असे. त्यावरही गप्पा होत. ही सवय त्यांना स्वातंत्र्य चळवळीने लावली होती. अजूनही हे चित्र ब-या च ठिकाणी आढळते. रेडिओ जाऊन टीव्ही आला हाच काय तो फरक. पण हे वृद्ध तृप्त असत, असे ‘गेले ते दिन गेले...’ म्हणणारे असंख्य मराठी साहित्यिक मानतात! पण शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या कथा वेगळ्या, व्यथा वेगळ्या आणि कट्टेही वेगळेच. सकाळी ते मॉर्निंग वॉक करतात. हास्य संघात सामील होतात. हात वर करून हा हा किंवा खो खो हसतात. त्यात काही वृद्धापण सामील असतात. हास्योन्माद ओसरला की मूळ चेह-यांवर येतात. आम्हीच आमच्या जीवनाचे शिल्पकार... असे ते मनोमन मानतात. या तमाम वृद्ध भारतीयांकडे शासनकर्त्यांनी प्रचंड लक्ष दिले असून रेल्वे तिकिटासाठी खास सवलती, वेगळी रांग, बस दरात सवलत, डावीकडील जागा राखीव, बँकेत वेळ वाढवणे अशा अनंत सोयी ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना आपणही आता लवकर ‘ज्येष्ठ’ व्हावे, असे वाटू लागले आहे. या हास्य संघांच्या सभासदांचे लक्ष मात्र नसत्या उठाठेवींकडे अधिक असल्याचे आढळून आले आहे! अनेक प्रवासी कंपन्यांनी अशा अति महत्त्वाच्या नागरिकांसाठी सेकण्ड इनिंग, थर्ड इनिंग वगैरे दौरे आखून ठेवले आहेत. वयाच्या 60-65व्या वर्षी तितकेच वयोमान गाठलेला अतुल्य भारत कसा आहे, ते याचि देही याचि डोळा पाहण्याची त्यांची इच्छा आणि उत्साह इतरांनीदेखील याचि देही याचि डोळा पाहून घ्यावा असा आहे. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये याच मंडळींनी गांधीगिरी करून सिनेमा तुफान गाजवला होता. सत्तरी ओलांडलेल्या अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात असंख्य तरुणांनी गांधीगिरीचा अवलंब केल्याचे अनेकांना स्मरत असेल. ‘मूर्ख म्हाता-या ने डोंगर हलवला’ नामक एक चिनी लोककथा खूप प्रसिद्ध आहे. इथे मात्र एका अति शहाण्या म्हाता-या ने उभी लोकशाही आणि वर्तुळाकार संसद गदागदा हलवून दाखवण्याची किमया करून दाखवली आहे. पण हे राम! संसदेत पण तितकेच चिवट ज्येष्ठ नागरी लोकप्रतिनिधी असल्यामुळे ती पडता पडता वाचली आणि तिने लोकशाहीलाही वाचवले, हे आम्हा ज्येष्ठ नागरिकत्वाच्या वेटिंग लिस्टवर असणा-यांचे भाग्यच म्हणायला हवे! तर आजच्या अतुल्य भारतातील शहर भागातील ज्येष्ठ नागरिक सुखी आहेत. समृद्ध आहेत. त्यांचे जीवनमान वाढले आहे. अपेक्षाही वाढल्या आहेत. पण ते अतृप्त आहेत. अस्वस्थ आहेत. त्यांना (म्हणे) अलीकडे आणखी एका समस्येने ग्रासले आहे. त्यांना आता ‘लिव्ह-इन-रिलेशन’ नामक फंडा हवा आहे. कारण अमेरिकेत ‘तसे’ काही संबंध ठेवणा-यांचे प्रमाण वाढत असल्याचे इकडच्या सीनियर सिटिझनना त्यांच्या तिकडच्या नातवंडांनी ई-मेलवरून कळवले आहे. तेव्हापासून ‘यांनी’ वृत्तपत्रीय लेखनात अशा नव्या नात्यांविषयी विपुल आणि अतुलनीय असे लेखन केले आहे. स्वातंत्र्य मिळाले त्या क्षणापासून पाच हजार वर्षांचे ‘सांस्कृतिक’ वय जपणा-या भारतीयांना आपण तरुण आहोत असे कधी वाटले नाही. पण त्यांना आपण वृद्ध आहोत असेही कधी वाटले नाही. ग्रामीण भागातील वृद्धांनी आपले वृद्धत्व स्वीकारले होते, पण शहरी वृद्धांना ते झेपले नाही. हल्लीच्या काळात पुरुषांचे वय आणि स्त्रियांचे पगार कोणी कोणाला विचारू नयेत; सांगू नयेत, असे एका ज्येष्ठ नागरिकाने एका हास्य संघात हसत हसत सांगून टाकले! खरंच हेवा वाटावा असे यांचे वानप्रस्थ आहे. प्रश्न एकच पडतो, या मंडळींनी प्रत्येक टप्प्यावर आपले जीवन सकस केले. त्यात भारतीय लोकशाहीचा, राज्यघटनेचा आणि अर्थातच तिरंगी राष्ट्रध्वजाचा हातभार लागला आहे. तरी अलीकडे यापैकी अनेक जण भगव्या, हिरव्या आणि निळ्या पलटणीत सहभागी झालेले दिसतात. त्यात स्त्रियादेखील आहेत. त्यांना संध्याछायेची भीती वाटत नाही. प्रकृतीस जपावे असे त्यांना कोणी सांगत नाही, इतकी ते स्वत:ची काळजी घेताना दिसतात. यालाच ते ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ मानतात काय? तसे असेल तर तरुणांनी त्यांच्याच हाती देशाचे भवितव्य द्यावे आणि स्वत: गतकालीन इतिहासात रमून जावे. कारण हा इतिहास सांगणारे राजकीय गृहस्थदेखील सहस्रचंद्रदर्शन सोहळे होऊनही ‘आता जगायचे असे किती क्षण राहिले...’ असे चुकूनसुद्धा म्हणत नाहीत!