आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात वृत्तपत्र स्वातंत्र्याचा विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटबंदीच्या विषयावर भारतातील अधिकांश प्रसिद्धीमाध्यमे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमने-सामने आहेत. भारतात अशी स्थिती असताना पाकिस्तानात काय सुरू आहे ? तेथे पंतप्रधान नवाझ शरीफ हे मीडियासमोर काकुळतीला आल्याचे दिसत आहे. दैनिक डाॅनमध्ये शरीफ यांच्या विरोधात एक लेख प्रकाशित झाला. या लेखाचे सूत्र दैनिक डाॅनने सांगितले पाहिजे, असा शरीफ यांचा आग्रह आहे. पण डाॅनने ताठर भूमिका घेतली आहे. आपण सूत्रही सांगणार नाही आणि दिलगिरीही व्यक्त करणार नाही, अशी भूमिका डाॅनने घेतली आहे. पाक सरकारने तेथील प्रेस कौन्सिलच्या मदतीने सूत्र शोधण्याचा प्रयत्न केला. पण प्रेस कौन्सिलनेही सरकारला दाद दिली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे तसे शक्तिशाली व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी डाॅनला नमवण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न चालवला आहे. पण पत्रकारितेच्या पवित्र मूल्यांवर ठाम राहण्याचा निर्णय दैनिक डाॅनने घेतला आहे. प्रेस कौन्सिलनेही मदत करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे सरकार आणि लष्कर दोघांनीही धमकावणे सुरू केले आहे. तरीही वृत्तपत्र स्वातंत्र्याची चाड असलेल्या या मंडळींनी सरकारपुढे झुकण्यास बाणेदारपणे नकार दिला आहे. हे प्रकरण जनतेपर्यंत पोहोचताच वाचकांनी नवाझ शरीफ यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 

जनता विरुद्ध सरकार असे रूप या प्रकरणाला येऊ पाहत आहे. देश विदेशातील मीडियाही डाॅनच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे दिसत आहे. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य कोणतीही शक्ती हिरावून घेऊ शकणार नाही, असे पाक प्रेस कौन्सिलने म्हटले आहे. सरकारने कितीही दबाव वाढवला तरी याने प्रकाशक आणि संपादक दबणार नाहीत. सरकारला लष्कराचे समर्थन मिळण्याची शक्यता आहे. असे झाले तरी लष्कराला विवेकानेच वागावे लागेल. त्यामुळे नवाझ शरीफ यांच्या मनात आता धाकधूक सुरू झाली आहे. आपले आडमुठे धोरण आपल्यावरच उलटणार नाही ना, अशी भीती त्यांना आता वाटायला लागली आहे. नोटा बंदीप्रकरणी मोदी सरकार अडचणीत आल्याचे पाकिस्तानी माध्यमातून म्हटले जात आहे. सरकारने जनतेची फसवणूक केली तर प्रकरण आणखी गंभीर होऊ शकते. पण भारत सरकार कातडी बचावू भूमिका घेत नाही, असे पाकिस्तानातील वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. 

पाक सेना नवाझ शरीफ यांच्या बाजूने आहे. त्यामुळे शरीफ यांना थोडा दिलासा मिळाला आहे. पण दर वेळी असेच घडेल असे नाही. पाक जनता शरीफ यांच्या विरोधात कधी बंड करेल काही सांगता येणार नाही. पण पाक सेना सरकारच्या बाजूने उतरली तर मात्र डाॅनची चिंता वाढू शकते. डाॅनचे म्हणणे आहे की, पाकिस्तानची घटना आणि वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा अधिकार यानुसार आपले स्रोत इतरांना न सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे. पण नवाझ सरकार या मताशी सहमत नाही. देशात अनागोंदी निर्माण करणे आणि सरकारला बदनाम करण्याचे हे षड््यंत्र आहे असे सरकार म्हणते. मुशर्रफ यांचा इतिहास अद्याप ताजा आहे. ते पाकिस्तानचे सेनापती होते तेव्हा त्यांनी कारगिलमध्ये दुस्साहस केले. तेव्हा पाकिस्तानी मीडियाने मुशर्रफसमोर शरणागती पत्करली होती, हे विसरून कसे चालेल? पाक मीडियाने त्यांच्या चुकीच्या निर्णयाला विरोध केला नव्हता. डाॅनला उशिरा का होईना शहाणपण आले आहे, असे म्हणावे लागेल. उशिराने का होईना चूक दुरुस्त केल्याबद्दल डाॅन दैनिकाचे कौतुक केलेच पाहिजे. आता पाक मीडियाने ठाम राहिले पाहिजे. कारण पत्रकारिता धर्माचे पालन आपल्या सोयीने करता येणार नाही. 

पाकस्तानचे दीर्घकालीन हित होईल अशा प्रकारची रणनीती पाकिस्तानातील वर्तमान सरकारने आखली पाहिजे. मागील चुकांमधून केवळ पत्रकारितेनेच नाही तर तेथील सरकारनेही धडा घेण्याची गरज आहे. योग्य काय आणि अयोग्य काय याचा निर्णय घेणे आणि ते जनतेला पटवून सांगणे हीच तर देशभक्तीची व्याख्या आहे. कारगिल युद्धाच्या वेळी काही पत्रकारांनी मुशर्रफ यांना खरी परिस्थिती सांगण्याचा आग्रह केला होता. पण ते सत्तेच्या नशेत होते. परिणाम काय झाला ? सत्य कितीही कटू असू दे ते वेळोवेळी देशातील जनतेच्या समोर मांडणे यातच कोणत्याही देशाचे हित असते. असत्य बोलून जनतेचा विश्वासघात करणारे सत्तेत फार काळ टिकू शकत नाहीत. सत्य समोर येते तेव्हा देशातील जनतेच्या दृष्टीने तो नेता गद्दार ठरतो. सध्या तरी पाकिस्तानी वृत्तपत्रांनी आपली देशभक्ती टिकवत आपली प्रतिमा उजळवली आहे. कारगिलप्रसंगीही पाक वृत्तपत्रांनी अशी भूमिका घेतली असती तर ते देशभक्तीचे उत्कृष्ट उदाहरण ठरले असते. पण पाकिस्तानी मीडियाने ती जखम पट्टी बांधून लपवण्याचा प्रयत्न केला. आज ती जखम नासूर बनली आहे. काेणत्याही देशातील मीडिया हा तेथील जनतेचे खरे डोळे असताे. पण सत्ताधीशांना खुश करण्यासाठी सत्याकडे कानाडोळा केल्यास गंभीर परिस्थिती उद‌्भवते. त्यातून दुर्दशा होते. कारगिल प्रकरणात पाकिस्तानला याचा अनुभव आलाच आहे.
 
पाकिस्तानातील सेनेशी टक्कर घेणे ही सोपी गोष्ट नाही. डाॅनने ज्या प्रकारे नवाझ शरीफ यांना झुकवले ते पत्रकारितेच्या शक्तीचे अजोड उदाहरण म्हटले पाहिजे. या प्रकरणाचा शेवट कसा होईल हे आताच सांगणे कठीण आहे. पण दैनिक डाॅनने नवाझ शरीफ यांना आपल्या निर्णयावर विचार करण्यास भाग पाडले, हे काही कमी नाही. दिवसेंदिवस डाॅन हे वृत्तपत्र शरीफ यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहे. या उदाहरणाने पाकिस्तानातील मीडियाला बळ मिळाले आहे. पत्रकारांमध्ये एकजूट दिसत आहे. हे सुचिन्ह म्हटले पाहिजे.
- मुजफ्फर हुसेन, ज्येष्ठ पत्रकार
बातम्या आणखी आहेत...