आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञतेचा अतुल्य सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘शो केस’च्या या जमान्यातही अनेक संस्था आणि व्यक्ती दिखाव्यापासून मुद्दाम दूर राहून कसं निरपेक्ष काम करीत असतात याचा प्रत्यय अलिकडेच पुन्हा आला. निमित्त झालं औरंगाबादच्या शांताराम पंदेरे आणि मंगल खिवसरा या जोडप्याचा वर्धा गावात झालेल्या आगळ्या वेगळ्या सत्काराचं. त्या सोहळ्यातून कोणाला काही प्रेरणा मिळाली तर अशा भल्यांची यादी वाढत जाईल या हेतूने त्यावर प्रकाश टाकायला हवा.
जमनालाल बजाज यांचे सहकारी राहिलेले श्रीकृष्णदास जाजू यांचे वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम उभारण्यात मोठे योगदान होते. अत्यंत प्रामाणिक आणि सद्शील असलेल्या जाजूंची तिसरी पिढी आज वर्ध्यात कार्यरत आहे. आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ डाॅ. उद्धव जाजू आणि त्यांची भावंडे दरवर्षी २३ आक्टोबरला अहिंसेसाठी जीवन वाहिलेल्या जोडप्याचा सत्कार करतात. १९९५ पासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. यंदा त्यासाठी त्यांनी औरंगाबादस्थित शांताराम पंदेरे आणि मंगल खिवसरा या जोडप्याला निवडले. कसे निवडले? काही महिन्यांपूर्वी जाजूंचे संपूर्ण कुटुंब आपल्या कारने पंदेरेेंकडे आले. सहज गप्पा मारायला आलो आहोत, असे सांगून तिथे थांबले. गप्पांमध्ये या जोडप्याची नीट ओळख करून घेतली. त्यांचा इतिहास विचारला, भूमिका तपासून पाहिली आणि विषय निघाला म्हणून दुसऱ्या दिवशी आपल्याच गाडीने त्यांची बाल आनंद जीवन शाळा आणि तिथले कामही पाहून आले. त्यानंतर काही आठवड्यांनी त्यांची सत्कारासाठी निवड केल्याचे त्यांना कळविण्यात आले. स्वत: माहिती घेऊन आणि तिची खात्री करूनच जाजू कुटुंबीय सत्कारासाठी जोडपे निवडतात हे त्यामुळे कळाले.
जाजू कुटुंबातले वृद्ध अजूनही खादी िवणतात. त्या खादीपासून तयार केलेले कपडे आणि साडी देऊन या जोडप्याचा सत्कार केला जातो. त्यावेळी देशभरातले अहिंसावादी तिथे जमतात. भाषणे कोणाचीच नाही. ज्या जोडप्याचा सत्कार असतो त्याच्याशी जमलेले समविचारी लोकं गप्पा मारतात. त्यांची भूमिका जाणून घेतात, कामाची ओळख करून घेतात, अडचणींवर कशी मात केली हे समजून घेऊन स्वत:साठीही उत्तरे मिळवतात. एकदा स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींनाही अशा जोडप्याशी गप्पा मारायला बोलावले जाते. एक दिवस नाहक संमेलन असते. नाहक म्हणजे काहीही कारण नसलेले. ही विनोबा भावेंची संकल्पना. त्यातून समाजासाठी काम करणाऱ्यांनी एकत्र थांबावे, एकमेकांना ऐकावे एवढाच उद्देश. सुमारे दीड हजाराच्या जवळपास समविचारी मंडळी तिथे असते. गेल्या बावीस वर्षात कधी सहचारी नसलेल्या एकाच व्यक्तीची तर कधी एखाद्या गावाच्या ग्रामसभेची निवड जाजू कुटुंबीयांनी या सत्कारासाठी केली अाहे.
वर्ध्याहून निघताना शांताराम पंदेरे आणि मंगल खिवसरा यांना जाजूंनी घरात बोलावले आणि हातात एक पाकीट दिले. आभाराचे पत्र असावे, असे समजून त्यांनी ते खिशात ठेवून दिले. घरी आल्यावर ते पत्र फाईलमध्ये लावण्यासाठी म्हणून पाकीट काढले तर त्यातून धनादेश निघाले. त्यावरच्या रकमा ५ हजारांपासून ३० हजारांपर्यंतच्या. एकूण एक लाख २५ हजार रुपये. अापल्या उत्पन्नातला काही हिस्सा अशा समर्पित कुटुंबासाठी द्यायचा हे जाजू भावंडांनी ठरवले आहे आणि प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार धनादेश तयार करतो. एवढी मोठी रक्कम जाहीर कार्यक्रमात देऊन त्याचा गवगवा नसता का करता आला? पण जाजूंना तेच करायचे नाही.
जसे जाजू कुटुंबीय तसेच पंदेरे, खिवसरा कुटुंब. असा सत्कार झाला, गौरव झाला याची ना त्यांनी बातमी बनवली, ना काेणाजवळ उल्लेख केला. गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले आणि सांगतानाही जाजूंच्या कार्यपद्धतीविषयीच बोलत राहीले. मूळ कोकणातले असलेले शांताराम तारूण्यात फिडेल कॅस्ट्रोच्या विचारांनी झपाटले होते. नंतर जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात आणि युक्रांदमध्ये सक्रीय झाले. समाजासाठी आयुष्य झोकून द्यायचे म्हणून स्वत:चीच परीक्षा घेण्यासाठी कुटुंब त्यागून अनोळखी राशीन गावात आले. तिथे काम करताना मंगल खिवसराशी परिचय झाला आणि सर्वांचा विरोध पत्करून ते विवाहबद्ध झाले. दोघांनाही संसदबाह्य लोकशक्ती उभी करायचीय. मंगल खिवसरांनी पत्रकारीता केली. आता महिलांसाठी काम करण्यात आणि गरीब मुलांसाठी शाळा चालवण्यात त्यांचे आयुष्य चालले आहे. अलिकडेच शांताराम यांना पॅरेलिसीस झाला तेव्हा मंगलताईंनी अापले सर्वस्व त्यांच्यासाठी बहाल केले. आता ते बरे होऊन पुन्हा कामाला लागले आहेत.
- निवासी संपादक, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...