आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Iran\'s Nuclear Program By Fareed Zakaria

इराणच्या दृष्टीने समेट हितावहच?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणच्या अणुविकास प्रकल्पावरून जेव्हा इराण आणि अन्य प्रमुख देशांच्या दरम्यान गेल्या वर्षी जिनिव्हा येथे अंतिम करारावर स्वाक्ष-या झाल्या तेव्हा खूप अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु गेल्या आठवड्यात याच अपेक्षा अंधुक झाल्यासारख्या वाटत होत्या. एक तर इराणच्या अधिका-यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी या कराराला पुन्हा कडाडून विरोध दर्शवला. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या अनेक प्रभावशाली सिनेट सदस्यांनी इराणवर नवे निर्बंध लादण्याची धमकी दिली. परंतु या सर्व घटनांचा अर्थ असाही नाही की, इराणशी कोणताही अंतिम करार शक्य नाही. इराण आणि पाश्चिमात्य देशांनी आता आपल्यामध्ये रुंदावलेली दरी कशी कमी करता येईल, राजनैतिक अडचणी कशा दूर होतील या बाबतीत रचनात्मक दृष्टीने विचारविनिमय सुरू केला पाहिजे.
इराणचे परराष्ट्रमंत्री आणि अध्यक्ष या दोघांनी जी विधाने केली त्यामुळे गदारोळ उडाला. इराणचे परराष्‍ट्रमंत्री जावेद जरीफ यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीचे वार्ताहर जीम शुटो यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘इराण त्यांच्या अणुविकास कार्यक्रमाला बाधा येईल अशा कोणत्याही गोष्टी नष्ट करण्यासाठी सहमत नाही.’ दुसरे वक्तव्य इराणचे अध्यक्ष हसन रोहानी यांनी केले. त्यांनी मला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले की, ‘इराण सध्या अस्तित्वात असलेल्या अणुभट्ट्यांमधील युरेनियमच्या संवर्धनासाठी उपयुक्त असणारी संयंत्रे नष्ट करणार नाही. शिवाय इराण आराकमधील अणुप्रकल्पाला उपयुक्त असणारा जड पाणी प्रकल्पही बंद करणार नाही.’
इराण अणुबॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असणा-या प्ल्युटोनियमचे उत्पादन करू शकतो, असे पाश्चिमात्य देशांना वाटते. हाच इराणसोबतच्या जिनिव्हा कराराचा कळीचा मुद्दा आहे. एखाद्या स्वीकारार्ह कराराच्या मुद्द्यावर इराण आणि अमेरिकेत हाच मूलभूत फरक आहे. इराणचे अध्यक्ष रोहानी यांच्याशी झालेल्या चर्चेत इराणच्या दृष्टिकोनाचा मला अंदाज आला होता. इराण जगापुढे असा दावा करत आहे की, त्यांचा अणुविकास कार्यक्रम हा लष्करी सामर्थ्याचा प्रयत्न नसून तो नागरी विकासासाठीचा प्रयत्न आहे. इराण त्यासंदर्भातील पुरावे आणि आश्वासने देण्यास तयार आहे. पूर्वी इराण आपल्या अणुविकास कार्यक्रमाची माहिती जगाला देण्यास चालढकल करत होता, आता तसे नाही. त्यांनी जगापुढे आपला अणुविकास कार्यक्रम ठेवण्याची तयारी दाखवली आहे. गेल्या वर्षी पाश्चिमात्य देशांशी झालेल्या करारात अणुप्रकल्पाला साहाय्यभूत ठरणारे कारखाने, खाणी आणि उद्योगांचे निरीक्षण करण्याची परवानगी त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरीक्षकांनी इराणमधील अणुप्रकल्पाची पाहणी केली. ही घटना या दशकातील पहिलीच अशी आहे. पण इराण आपल्या अणुविकास कार्यक्रमावर कोणतीही बंधने स्वीकारण्यास नाही. त्यांची अट अशी आहे की, अण्वस्त्र प्रसारबंदीच्या कायद्यावर स्वाक्ष-या करणा-या देशांप्रति अमेरिका किंवा पाश्चिमात्य देश जसा व्यवहार करतात, तसा व्यवहार इराणसोबत व्हावा. त्यांच्या या अटीचा दुसरा अर्थ असा आहे की, अणुप्रकल्पातून मिळणारी वीज त्यांना हवी आहे. या विजेसाठी त्यांना युरेनियम संपृक्त करण्याचा पूर्ण अधिकार हवा आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्यात युरेनियम संपृक्त करण्याबाबत उल्लेख नाही. अणुऊर्जा निर्मिती करणारे अनेक देश युरेनियम संपृक्त करत नाहीत, पण काही देश करत असतात. यामुळे युरेनियमचा वापर करणे आतापर्यंत तरी स्वीकारार्ह आहे या इराणच्या या मुद्द्यास तार्किक आधार आहे. कोणत्याही प्रकारच्या अणुविकास प्रकल्पाचा उद्देश हा केवळ शांततापूर्ण कार्यासाठी करण्यात यावा, हीच महत्त्वाची अट अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्यात समाविष्ट करण्यात आलेली आहे.
इराणसमवेतच्या करारासंदर्भात अमेरिकेचा दृष्टिकोन एकदम वेगळा आहे, अणुकार्यक्रम शांततापूर्ण कार्यासाठीच करण्यात येईल हा विश्वास निर्माण करण्यासाठी इराणला वेगळी पावले उचलावी लागतील, अशी अमेरिकेचीही भूमिका आहे. इराणवर केवळ 5 टक्के युरेनियम संपृक्त करण्याची मर्यादा घालावी. (या मर्यादेमुळे इराण अण्वस्त्रे बनवू शकणार नाही.) शिवाय इराणला युरेनियम संपृक्त करणारे प्रकल्प व जड पाण्याचे प्रकल्प बंद करण्याची अट घालावी असे अमेरिकेला वाटते. या अटीमुळे इराणचा अणुविकास प्रकल्प हा लष्करी सामर्थ्याचे प्रतीक न बनतात तो नागरी होईल असे अमेरिकेचे राजकारण आहे. अमेरिका आणि इराणला आपल्या मूलभूत भूमिकांवर खोलवर विचार करावा लागणार आहे. अणुविकासाच्या मुद्द्यावरून इराणला वेगळी वागणूक दिली जाते आहे; पण ती त्यांच्या भल्यासाठी आहे, याची जाणीव इराणच्या सरकारला करून देणे महत्त्वाचे आहे. सध्याचा इराणचा अणुविकास कार्यक्रम मुळात संशयास्पद असल्याने हे सगळे दबावाचे राजकारण खेळले जात आहे. इराणची त्यांच्या अणुविकास कार्यक्रमातील गुंतवणूक प्रचंड आहे; पण त्यातून निर्माण होणारी वीज कमी आहे. इराणने आपल्या पूर्व भागात असाच एक प्रकल्प सुरू करून जगाला फसवलेही आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनेही हे समजून घेतले पाहिजे की, इराणच्या अणुविकास कार्यक्रमाचे निरीक्षण केल्यानंतर त्यांना इराणला अधिक सवलती द्याव्या लागतील. पण इराणने हा प्रकल्प थांबवल्यास अमेरिकेच्या हाती काही फारसे लागणार नाही. जर सहा ते नऊ महिन्यांचा लीड टाइम निश्चित करण्याचे अमेरिकेने ठरवले तर त्यात मोठे यश आहे. इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरीक्षकांना अणुप्रकल्प पाहण्याची परवानगी नाकारली तर परिस्थिती लगेचच बदलेल आणि अमेरिकेला इराणवर कारवाई करण्यास वेळ मिळणार नाही. हा सगळा तणाव मिटण्यासाठी उभय देशांनी काही मूलभूत करार करण्याची गरज आहे. जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीचे कॉलिन कार्ल आणि जोसेफ सरीनसिओनी यासंदर्भात काम करत आहेत. त्यांच्या मते युरेनियम संपृक्त करणारी केंद्रे नष्ट करण्याऐवजी ती बंद करता येऊ शकतात. इराणमध्ये युरेनियम संपृक्त करणारी 19, 800 हून अधिक अशी केंद्रे आहेत. पण त्यापैकी अर्ध्याहून अधिक केंद्रे बंद अवस्थेत आहेत. इराणने सातत्याने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडील संपृक्त झालेले 20 टक्क्यांपेक्षा अधिक युरेनियम देशाच्या बाहेर जाणार नाही. आता त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाशी केलेल्या करारात ही अटही मागे घेतली आहे. शिवाय देशातील जड पाण्याचे प्रकल्पही अन्य कामासाठी वापरण्यास तयारी दर्शवली आहे.
इराणचे अध्यक्ष रोहानी आणि परराष्‍ट्रमंत्री जरीफ या दोघांनी चर्चा केल्यानंतर माझी खात्री पटली आहे की, हे दोघे मध्यममार्ग काढण्यास तयार आहेत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंध अधिक मैत्रीचे प्रस्थापित करायचे आहेत. (रोहानी यांनी मला, येत्या काही महिन्यांतच इराणमधील सरकारविरोधातील ग्रीन मुव्हमेंटच्या नेत्यांना सोडण्यात येईल, असे संकेत दिले होते.) रोहानी यांच्या सरकारपुढे देशातील काही गटांचा दबाव आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. असाच पेच ओबामा प्रशासनापुढेही आहे. दोन्ही पक्षांनी जिनिव्हा परिषदेतून अंतिम तोडगा मिळेल अशी अपेक्षा न ठेवता उभयतांमध्ये विचारविनिमय करण्याची अधिक गरज आहे. जर असे घडले तर उभय देशांमधील संशय दूर होतील.
(लेखक टाइम मॅगझिनचे संपादक आहेत)
comments@fareedzakaria.com