आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण असे का वागतो?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. त्याच्या पत्नीचे गुडघ्यांचे आणि पायाच्या घोट्यांचे ऑपरेशन करावे लागले होते, पण सांधे तसेच दुखत राहिले होते. त्या म्हणाल्या, “डॉक्टर सांगतात की उभे राहायचे नाही. पण घरातल्या घरातच माझे सात-आठ तास उभे राहणे आणि चालणे होतच राहते.’ त्यांच्या मुलाने सांगितले “घरी कामाला माणसे आहेतच. स्वयंपाकपाणी, झाडणे, कपडे धुणे या साऱ्या कामांसाठी बायका येतात, पण आईला त्यांचे काम पटत नाही. ही आपली त्यांच्या मागे फिरत राहते. डॉक्टर आम्हाला रागावतात. आताही त्यांचे आणि आमचे ऐकतच नाहीत, त्याला काय करायचे काही समजतच नाही.’
मी त्याच्या अाईला म्हटले, “तुम्ही उभे राहणे आणि फिरणे होतेच असे म्हणता, कोण तुम्हाला हे करायला लावते? तुम्ही आपल्या वागण्यानेच प्रकृती बिघडवून घेत आहात, हे तुमच्या ध्यानात कसे येत नाही?’ त्यावर त्या म्हणाल्या, “समजते सगळे, पण मला राहावत नाही आणि स्वस्थ बसवत नाही त्याला मी तरी काय करू?’

एक बॅडमिंटन खेळाडू सामन्यात सुरुवातीला पुष्कळ पुढे असते; पण सामना संपायला आला की तिचा खेळ अतिशय खराब व्हायला लागतो आणि दरवेळी सामना हातातून िनसटतो. असंख्य खेळाडूंचे असे होते. सर्वसामान्य माणसे आपल्या सवयी बदलता न आल्याने बरेच नुकसान करून घेतात. काही मोठ्या नावारूपाला आलेल्या व्यक्तीसुद्धा असेच वागताना मला आढळलेल्या आहेत. त्यांना सल्ला देताना माझ्या ध्यानात येते की अनेक सवयींबाबत माझी वागणूकसुद्धा तशीच होत राहते.

असे का वागतो आपण? शहाणीसुरती म्हणवून घेत असलेली माणसे अशी वेड्यासारखी का वागतात? त्याचे कारण आपल्या मेंदूत आणि मनातच आहे. सर्व जग बदलत असते. काही वेळा या बदलाची गती जास्त असते, तर काही वेळा कमी असते. जड वस्तू कमी वेगाने बदलतात; पण सजीव प्राणी, ज्यांच्यामध्ये चैतन्य असते ते जास्त झपाट्याने बदलत असतात. माणसाचे आयुष्य जेमतेम ८०/९० वर्षांचे असते. त्यातसुद्धा बालपण, तारुण्य, वृद्धत्व असे वेगवेगळे टप्पे असतात. सजीव प्राण्यांमध्ये सर्वात प्रगत मेंदू माणसाचाच आहे. आपले लक्ष कशावर आहे, त्या वस्तूला, घटनेला किंवा विचाराला आपण प्रतिसाद कसा देतो, ते मेंदूतल्या केंद्रांमध्ये न्यूरॉन्स ठरवत असतात. आपला मेंदू केमिकल्सची मोठी फॅक्टरी आहे. एकदा जो प्रतिसाद आला, त्याच्यासाठी जी केमिकल्स असतात, ती मेंदूमध्ये तयार करण्याचे काम सुरू होते. आपण त्या अनुभवाची आठवण केली की परत तीच प्रक्रिया होते. जास्त वेळात तो अनुभव किंवा त्याची स्मृती जागी होत राहिली तर तीच तीच केमिकल्स निर्माण होण्याची गती वाढते. म्हणजे मग मन आणि मेंदू आपल्याविरुद्ध कट केल्यासारखेच वागायला लागतात. एखाद्या कंपनीत जास्त माल तयार होऊन पडला की त्या कंपनीचे व्यवस्थापन तो माल गिऱ्हाइकांच्या गळ्यात मारून खपवून टाकण्याच्या उद्योगाला लागते तसेच हे आहे. आपलेच मन आणि आपला मेंदू आपल्या मर्जीच्या पूर्णपणे विरुद्ध आपल्याला वागवतात. आपल्या तत्त्वज्ञानात असे मांडले आहे की मन, बुद्धी, अहंकार हीसुद्धा जड तत्त्वे आहेत. त्यांना बदल आवडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सहजप्रवृत्ती जे ज्ञात आहे त्याच्याचकडे जात राहण्याची असते. अज्ञाताकडे जाण्याचे त्यांना भय वाटत राहते. भूतकाळ हा ज्ञात आहे आणि भविष्यकाळ संपूर्णपणे अज्ञात. त्यामुळे आपण भविष्याकडे पाठ फिरवून भूतकाळात जगण्याचे प्रयत्न करत राहतो. यामुळे आपण लावून घेतलेल्या सवयी मोडायची आपली मुळीच तयारी नसते. या सवयी हे यमाचे पाश आहेत. त्यांनाच सारखे स्वीकारत राहून आपण आपले सारे जीवन नासवून टाकतो. नुसते आरोग्यच खराब होते असे नाही तर सारा भविष्यकाळच अंधकारमय होऊन जातो. यासाठी गीतेत निर्भयतेची उपासना सांगितली आहे. प्राणायाम आणि प्रकाशाची उपासना आपल्याला भूतकाळातून बाहेर वर्तमानात येऊन अज्ञात भविष्याला तोंड देण्यासाठी तयार करतात.
आपण जर मनाला त्याचे वागणे चुकीचे आहे हे पटवून देऊ शकलो तर ती नको असलेली केमिकल्स निर्माण होणे थांबते आणि कालांतराने त्या प्रक्रियेची साखळीसुद्धा नाहीशी होऊन जाते. मग आपण आपले अवधान कशावर ठेवायचे आणि प्रतिसाद कसा व कोणता द्यायचा याच्यावर आपले नियंत्रण येते. या साऱ्या खटाटोपाला प्रतिपक्ष-भावना अशी संज्ञा आहे. म्हणजे ज्या विचारांना आणि भावनांना बळी पडून आपण दु:खात पडत जातो त्यांना स्वसंवादाने आणि दृढ निर्धाराने खोडून काढायचे. हे जर साधले तर कॅन्सरसारखे दुर्धर रोग नाहीसे करणारे रसायन आपला मेंदू शरीरातच निर्माण करतो आणि ज्या पेशी आपले मूळ काम विसरून भलतेच काही करत राहत असतात त्यासुद्धा भानावर येऊन योग्य तेच कार्य करायला लागतात. आणि आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये प्रभावी बदल घडून येतात. आपल्या आंतरिक शक्तीचा प्रकाश बाहेरचाही अंधकार दूर करतो. वाईट सवयीचे गुलाम होऊन आयुष्य दु:खमय करून टाकण्याची मुळीच गरज नाही. आपण आपल्या डोक्यात कोणते विचार स्वीकारतो आणि घोळू देतो त्याबद्दल सतत सतर्क राहायला हवे. जे विचार आपल्या मनात यायला हवेत ते स्वसंवादाने पक्के करत जायचे आणि नको असलेल्या विचारांवर एकाग्र न होता अवधान हव्या त्या विचारांवर नेणे हीच खरी उपासना आहे. ती करत राहण्याचा सुज्ञपणा आपल्यात आणला की दु:खाची काय बिशाद आहे आपल्याला त्रास देण्याची? का बरे आपण हे करत नाही? आपले विचारच मेंदूतल्या प्रक्रियांना चालना देत असतात. म्हणून त्यांच्यावरच नियंत्रण हवे.

-भीष्मराज बाम, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ
बातम्या आणखी आहेत...