आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्न कोणत्या पक्षाचं?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न म्हटलं म्हणजे दोन परंपरागत पक्ष आलेच-वरपक्ष व वधूपक्ष. आजच्या आधुनिक जगात तिसराच एक पक्ष लग्नसमारंभ व इतर सगळ्याच कार्यक्रमांमध्ये घुसलाय तो म्हणजे राजकीय पक्ष. डॉक्टरी पेशातील जनसंपर्कामुळे आम्हाला ब-याच लग्नांची आमंत्रणं येतात. बोकडाच्या नवसापासून ते शेंडी कापण्याच्या कार्यक्रमांपर्यंत सगळ्याच कार्यक्रमांच्या पत्रिका व पत्रकं आजकाल वाटली जातात. एका वैशिष्ट्यपूर्ण निमंत्रणाने माझं लक्ष निमंत्रण पत्रिकेतील मजकुराकडे आकर्षिलं गेलं.
एकदा एक जवळच्या ओळखीतले निमंत्रक मला म्हणाले, डॉक्टरसाहेब, तुम्ही लग्नाला प्रमुख पाहुणे आहात बरं का? तुम्हाला यावंच लागेल लग्नाला. हे ऐकल्यानंतर मी कुतूहलाने लग्नपत्रिका बघितली. एरवी पत्रिकांमधली केवळ स्थळ व वेळ पाहणारा मी त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख पाहुणे, आशीर्वाद, विशेष सहकार्य या मथळ्यांखाली कोणाची नावं आहेत, हे आवर्जून पाहू लागलो.
पत्रिका पाहताच कार्यक्रमाचे, लग्नाचे आयोजक कुठल्या जातीतले आहेत हे लक्षात येतं. एरवी पत्रिकेत फारशा न दिसणा-या माजी राष्ट्रपती गेली पाच वर्षे राजपुतांच्या पत्रिकांमध्ये प्रचंड गाजल्या. मराठा समाजातील पत्रिकांमध्ये शरदराव पवार, विलासरावांनंतर अशोकराव व आता पृथ्वीराज चव्हाणांची नावं आशीर्वादाच्या मथळ्याखाली जरूर दिसतात. छगनराव माळी समाजाच्या लग्नपत्रिकांमध्ये तर खडसे साहेब लेवा मंडळींच्या लग्नपत्रिकांमध्ये आशीर्वाद देताना दिसून येतात. पत्रिकेतील नावांवरून लग्नातला पक्ष कुठल्या राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवून आहे हेदेखील ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. नुकतंच एक नात्यातल्या मित्रपरिवारातलं लग्न पार पडलं. लग्नपत्रिकेत वधू-वरांची नावं, निमंत्रकांची दोन नावं, स्थळ-वेळ याखेरीज 20-25 पुढा-यांची नावं होती. सगळे पुढारी एकाच राजकीय पक्षाचे होते. लग्नसमारंभादरम्यान त्या पक्षाचा राजकीय मेळावा भरलाय, असं वातावरण सर्वत्र दिसून आलं.
दुस-या एका जवळच्या नातेवाइकांकडे लग्नाला न जाऊ शकल्याने मी संध्याकाळी वधूपित्याला फोन लावून शुभेच्छा व दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी लग्नाचा वृत्तांत द्यायला सुरुवात केली. ‘लग्न खूपच चांगलं लागलं. बापूसाहेब व तात्यासाहेब पूर्ण वेळ लग्नाला थांबले. नानासाहेबही येऊन गेले. त्यांनीही बराच वेळ दिला. सगळेच पुढारी हजर होते. लग्न खूप छान झालं!’ मला प्रत्यक्षात माहिती हवी होती वधू-वराची, आमच्या नातेवाईक वºहाडाची, गावाकडच्या नातेवाईक मंडळींची. पण हा वधूपिता राजकीय पुढा-यांपलीकडे बोलायलाच तयार नव्हता.
एका मित्राच्या भावाचं लग्न गेल्या महिन्यात धूमधडाक्यात पार पडलं. पत्रिका झकास छापली होती. पत्रिकेच्या डाव्या पानावरील मजकूर मी वाचू लागलो. मित्रच स्वत: पत्रिका घेऊन आला होता. आशीर्वाद या शीर्षकाखाली जळगाव महानगरपालिका घरकुल घोटाळ्यात अटक झालेल्या नेत्याचं नाव लिहिलं होतं. मित्रच असल्याने मी या प्रकाराबद्दल त्याला छेडलं असता तो ओशाळला. पुढे पत्रिका वाचू लागलो. प्रमुख पाहुणे या मथळ्याखाली खूप मोठी राजकीय व गैरराजकीय लोकांची यादी होती. आमच्या परिसरात सट्टा-पत्ते चालवणारे, मद्यपानाच्या आहारी गेलेले, जातीपातीच्या नावानं राजकारण करणारे, राजकीय तोडीपाणीत अग्रेसर असलेले, असे रथी-महारथी त्या यादीत होते. या मंडळींचं नाव प्रमुख पाहुण्यांत घेतल्याने माझ्या या मित्राचे जवळचे भाऊबंद, मानपानाचे नातेवाईक यांना पत्रिकेत स्थानच नव्हते. या विषयावर विचारल्यावर मित्र म्हणाला, ‘‘दादा, भाऊबंद व नातेवाइकांसाठी दुसरी पत्रिका छापली आहे. राजकारणात पुढा-यांचा मानपान ठेवावाच लागतो दादा! दोन पत्रिका छापल्या म्हणजे दोन्ही कामं होतात. नातेवाईक खुश आणि नेतेही खुश.’’
या वर्षी परिसरातील शिवजयंती, आंबेडकर व राणा प्रतापांच्या जयंतीही केवळ राजकारण्यांनीच साज-या केल्या. सामान्य माणसाचं ते आता कामच राहिलेलं नाही. राजकीय अजेंडा पसरवण्याचंच काम जयंती व समारंभ करताना दिसतात. ज्या पक्षाची सत्ता असेल तेच यात प्रामुख्याने सहभागी होतात. सामाजिक मंडळेही सत्ताधा-यांनाच प्राधान्य देतात. आजच्या लग्नात व इतर कार्यक्रमात प्रतिष्ठा किंवा लाचारी म्हणून अनावश्यक लोकांना पत्रिकेत व कार्यक्रमात जे अवास्तव स्थान दिलं जातंय त्याने एकूणच या मंगल कार्यक्रमाचं पावित्र्य नाहीसं झालंय. कुठलेही शील नसलेले अवैध व्यावसायिक, भ्रष्ट राजकारणी प्रमुख पाहुणे बनत असतील तर लग्नाची धार्मिक व आध्यात्मिक सोहळा म्हणून प्रतिमा नाहीशी होईल. लग्न व इतर कार्यक्रमात वाढणारी ही कुप्रथा वेळीच थांबवणे आवश्यक वाटते.