आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीखविरोधी दंगलीचे राजकारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीमध्ये १९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलीमध्ये अशी अनेक प्रकरणे होती की ज्यांचा तपास कालांतराने पोलिसांनी बंद केला होता. त्यामुळे ही प्रकरणे न्यायालयापर्यंतही जाऊ शकलेली नव्हती. अशा प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे केंद्र सरकारने ठरवले असून त्याची घोषणा दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर होणार आहे! यातील विसंगती अशी आहे की, विशेष तपास पथक स्थापन होणार असल्याच्या बातम्या मात्र दिल्ली विधानसभा निवडणुका होण्याच्या आधी झळकल्या आहेत! दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्याचा भाजपने चंग बांधला असून तेथील मतदारांना भुलवण्यासाठी मोदी सरकार शक्य ते सर्वत्र प्रयत्न करीत आहे. १९८४ साली झालेली शीखविरोधी दंगल ही दिल्लीच्या आधुनिक इतिहासातील एक भळभळती जखम आहे. त्यामध्ये सुमारे तीन हजार लोकांचा बळी गेला होता.

अमृतसर येथील सुवर्णमंदिरातून खलिस्तानी दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी जून १९८४मध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कारवाई केली. त्याचा राग मनात धरून सतवंतसिंग आणि बिआंतसिंग या लष्करातील जवानांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या केली. त्यानंतर िदल्लीमध्ये शिखांच्या विरोधात दंगली पेटल्या व त्याचे लोण देशभरातील काही भागातही पसरले. या दंगलींमध्ये काही हजार लोक ठार झाले. दिल्लीच्या दंगलींमधील २२५ प्रकरणे अशी आहेत की ज्यांचा पुन्हा नीट तपास होणे गरजेचे आहे, अशी शिफारस या दंगलींच्या चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती जी. पी. माथूर यांच्या समितीने आपल्या अहवालात केली होती. ज्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी मोदी सरकार विशेष तपास पथक स्थापन करणार आहे, त्या प्रकरणांमध्ये काँग्रेस नेते जगदीश टायटलर, सज्जनकुमार गुंतलेले आहेत.

काँग्रेसला खिंडीत पकडण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार विशेष तपास पथकाचे शुक्लकाष्ठ मागे लावणार यात शंका नाही. दिल्लीतील शीखविरोधी दंगलींच्या सूत्रधारांना गजाआड करण्याबाबत काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. अगदी वाजपेयी सरकार सत्तेवर असतानाही दिल्ली दंगलग्रस्तांना उचित न्याय मिळू शकला नव्हता. आता न्या. माथूर समितीच्या अहवालाची ढाल करून दिल्ली दंगलग्रस्तांना न्याय देण्याचा आव आणणार्‍या मोदींनाही या प्रश्नाचे राजकारण करण्यातच जास्त रस आहे.