आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूकांडातून अशीही थट्टा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकशाहीची थट्टा म्हणजे काय असू शकते, याचे जिवंत उदाहरणच अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. या निवडणुकीत पंचायत समितीच्या पांगरमल गणातून शिवसेनेच्या उमेदवार मंगल महादेव आव्हाड निवडून आल्या. त्यांच्या निवडून येण्याची दखल यासाठी घेतोय, की ज्या दिवशी त्या निवडून आल्याचे जाहीर झाले त्याच दिवशी अहमदनगर पोलिसांनी त्यांना अटक केली. कारण मतदान करण्यासाठी आणि करवून घेण्यासाठी त्यांनी दिलेल्या दारू आणि मटणाच्या पार्टीतील बनावट दारूमुळे ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. निवडून येण्यासाठी उमेदवारांकडून अशा पार्ट्या दिल्या जाणे ही खरे तर नवी बाब नाही. पण या प्रकरणात जो काही घटनाक्रम आहे तो धक्कादायक आहे. 

शिवसेनेच्या या उमेदवार आणि जिल्हा परिषदेसाठीच्या उमेदवार यांनी मिळून ही पार्टी दिली होती. त्यात पुढाकार घेतला होता शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाने. १२ फेब्रुवारीला ही पार्टी दिली गेली आणि १३ तारखेपासून दारूने बळी घ्यायला सुरुवात केली. १५ तारखेपर्यंत सहा जणांचा बळी गेला होता आणि तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर १६ फेब्रुवारीला मतदान होते. सहा जणांचा (एकूण आठ) बळी घेणारी पार्टी देणाऱ्यांना तरी निदान मतदार मतदान करणार नाहीत, अशी अपेक्षा होती. पण झाले उलटेच. शिवसेनेच्या या दोन्ही उमेदवार निवडून आल्या आणि मंगल आव्हाड यांना पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली. आता दोष कोणाला द्यायचा? बनावट दारू पाजून आठ जणांचा बळी घेणाऱ्यांना की त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनाच आपले प्रतिनिधित्व सोपवणाऱ्यांना? 
 
अहमदनगर जिल्ह्यातील हे दारूकांड म्हणजे जशी लोकशाहीची थट्टा आहे तशीच ती शासकीय यंत्रणेची आणि पत्रकारितेचीही थट्टा आहे. शासकीय यंत्रणेची यासाठी, कारण ज्या बनावट दारूने हे बळी घेतले ती दारू अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील कॅन्टीनमध्येच बनवली जात होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा उद्योग तिथे बिनदिक्कतपणे सुरू होता. याच कॅन्टीनच्या भिंतीला लागून पोलिस चौकी आहे आणि पोलिस चौकी आणि कॅन्टीनमधील भिंत काही प्रमाणात तोडण्यात आली आहे. तिथून दिवसभर चौकीतले पोलिसही थेट कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी येत होते, असे सांगतात. दिवसा चहा आणि रात्री मिथेनाॅलच्या माध्यमातून बनावट दारू बनवण्याचे काम तिथे सुरू होते. पोलिसांना याचा थांगपत्ताही नव्हता, यावर कोणी विश्वास ठेवू शकेल? अर्थातच नाही. मिळालेली माहिती तर अशी आहे की, एका पोलिसाचीच या उद्योगात भागीदारी आहे. तो कोण पोलिस आहे हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिस अधीक्षकांसमोर आहे. ज्या कॅन्टीनमध्ये हा गोरखधंदा सुरू होता ती कॅन्टीन जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने करारावर एका माजी नगरसेवकाला चालवायला दिली होती. हा माजी नगरसेवक असा, ज्याच्यावर बनावट दारू निर्मितीत सापडल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली होती. त्याच्याशी केलेल्या कराराची मुदत २०१३ मध्येच संपली होती. तरीही त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नव्हते. 

पत्रकारितेची थट्टा यासाठी की एका स्थानिक वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असलेल्या जाकीर शेख नामक व्यक्तीला (प्रत्यक्ष कॅन्टीन चालविणारा) पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी म्हणून अटक केली आहे. पत्रकारिता हा याचा हातच्याला असलेला ‘धंदा’. त्या नावावर काळे उद्याेग करण्यासाठीचे कवचच त्याला मिळाले होते. पत्रकारितेची धमकी देऊन संरक्षण मिळवत असलेल्या या समाजकंटकाने पत्रकारितेलाच काळिमा फासला आहे. अर्थात, असे कृत्य करणारा जाकीर शेख हा काही एकमेव नाही. गावागावांत अशा भुरट्या पत्रकारांचे पेव फुटले आहे. त्यांच्या धमक्यांना आणि गैरकृत्यांना भलेभले बळी पडताहेत हे वास्तव आहे. अशा लोकांना उघडे करण्यात आणि प्रामाणिक तक्रारदारांचा विश्वास जिंकण्यात आमच्यासारखे मुख्य प्रवाहातले पत्रकारही अपुरे पडताहेत हेही खरे आहे. आत्मवंचना करावी असेच हे कटू वास्तव आहे. 
 
ज्या पांगरमल गावातील सहा जणांचा या दारूकांडात बळी गेला त्या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला होता. हजारपेक्षा अधिक असलेल्या मतदारांपैकी एकानेही मतदान केले नाही. गावाने मतदान करावे, असे आवाहन करायला खुद्द जिल्हाधिकारी तिथे गेले होते; पण गावकऱ्यांनी ऐकले नाही. का ऐकावे? चार वर्षांपासून गावाने दारूबंदीसाठी ठराव करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता. जिल्ह्यातील ६७७ गावांनी असे ठराव करून दिले होते. त्याचे काहीच झाले नाही. उलट त्याचा परिपाक आठ जणांचा बळी जाण्यात झाला असेल तर जिल्हाधिकाऱ्यांचेच काय, मुख्यमंत्री आले तरी गावकऱ्यांनी का ऐकावे? यातून कोणी काय धडा घ्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. 

- निवासी संपादक, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...