आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेमोक्रॅटिक पक्ष आहे कुठे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या जगाचे लक्ष अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे लागले आहे. दररोज ट्रम्प काहीतरी वादग्रस्त निर्णय घेत आहेत. सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीलाच ट्रम्प यांनी शेजारी राष्ट्रांपैकी मेक्सिकोला दुखावले. पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंधने घातली आहेत. ओबामा यांचे यश मानले जाणारी आरोग्यविषयक योजना रद्द केली आहे. पॅसिफिक प्रदेशातील निवडक बारा देशांशी केलेल्या व्यापारी करारालासुद्धा ट्रम्प यांनी केराची टोपली दाखवली आहे. महत्त्वाच्या सरकारी पदांवर बेजबाबदार आणि आक्रस्ताळ्या मानल्या जाणाऱ्या लोकांची निवड केली आहे. त्यामुळे ट्रम्प हे निवडणूक जिंकल्यावर मध्यममार्गाकडे झुकतील अशी जी आशा होती ती आता हळूहळू मावळत चालली आहे. 

एकीकडे ट्रम्प असे चर्चेत असताना डेमोक्रॅटिक पक्ष मात्र सध्या कुठेही दिसत नाही. खरे तर आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक धोरणे याबाबत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात एक किमान पातळीपर्यंत सहमती होती. ट्रम्प यांनी त्या सहमतीला सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष त्यांच्याबरोबर फरपटत का होईना मात्र जात आहे. खरी चिंता आहे ती डेमोक्रॅटिक पक्षाबाबत. हा पक्ष आणि त्यांचे नेते ट्रम्प निवडून आले या धक्क्यातून अद्याप सावरलेले दिसत नाहीत. माध्यमांत, चर्चेत, विचारविश्वातून जणू डेमोक्रॅटिक पक्ष सध्या हद्दपार झाला आहे. निवडणुकीत पराभव होणे ही एक बाब आहे आणि पक्षाचे मनोधैर्य खचणे ही दुसरी. पक्षाची सध्याची वागणूक पाहता त्या पक्षाचे मनोधैर्य खचले आहे काय? अशी शंका येते. 

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील निकालांची आकडेवारी पाहिली तर असे दिसते की, हिलरी क्लिंटन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली होती. तसेच अध्यक्षीय निवडणुकीच्या बरोबरीने झालेल्या अमेरिकी सिनेटच्या निवडणुकांतसुद्धा रिपब्लिकन पक्षापेक्षा डेमोक्रॅटिक पक्षाला जास्त मते मिळाली आहेत. तसेच निवडणुकीनंतर सूत्रे हाती घेताना नवनियुक्त अध्यक्षांना अमेरिकी जनतेत किती पाठिंबा आहे यावर नजर टाकली तर त्यानुसार ट्रम्प हे सर्वात कमी लोकप्रिय अध्यक्ष आहेत. ज्या दिवशी ट्रम्प यांचा शपथविधी झाला त्या दिवशी ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. शपथविधीनंतर ट्रम्प यांच्या स्त्रीविषयक भूमिका लक्षात घेऊन अमेरिकी स्त्रियांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला होता. त्याला जगभरातून पाठिंबा मिळाला होता. मात्र ट्रम्प यांना असा सर्वस्तरीय विरोध होत असला तरीही त्यांनी आपली भूमिका बदलण्याची किंवा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कोणतीही चिन्हे दिलेली नाहीत. ट्रम्प यांनी आपल्याला देशभरात आणि जगभरात व्यक्त होणाऱ्या विरोधाची काहीही दखल घेतलेली नाही. उलट शपथविधीनंतर आपल्या भाषणात ते सर्व देशाला पुढे घेऊन जातील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र त्यांनी तसे काहीही केले नाही. उलट त्यांनी आपल्या समर्थकांसाठी आपण सत्ता राबवणार आहोत अशा अर्थाची विधाने केली आहेत. 

आज डेमोक्रॅटिक पक्ष एका बाजूला निवडणुकीतील पराभव आणि दुसऱ्या बाजूला पूर्णतः आक्रस्ताळे वागणारे, आक्रमक ट्रम्प अशा दुहेरी कात्रीत सापडला आहे. त्यामुळे हा पक्ष आता काय करणार, असा प्रश्न समोर येऊ शकतो. मात्र आजच्या काळात डेमोक्रॅटिक पक्षाला हतबल होऊन चालणार नाही. कारण सत्ता जरी ट्रम्प यांच्याकडे असली तरी त्या सत्तेचा वापर ते कसा करतात यावर सतत लक्ष ठेवावे लागणार आहे. सत्तेचा दुरुपयोग त्यांनी करू नये यासाठी त्यांच्यावर धारदार टीका करावी लागणार आहे. त्यादृष्टीने जनमत तयार करावे लागणार आहे. ट्रम्प यांच्याविरोधात असलेल्यांना संघटित करावे लागणार आहे. अमेरिकेत सिनेट आणि काँग्रेस अशी दोन प्रतिनिधीगृहे आहेत. अध्यक्षाला या दोन्ही सभागृहांना टाळून राज्यकारभार करता येत नाही. दोन्हीकडे आज डेमोक्रॅटिक पक्ष अल्पमतात आहे. मात्र आणखी दोन वर्षांनी या प्रतिनिधीगृहांसाठी पुन्हा निवडणुका होतील तेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळवण्याची संधी असू शकते. ओबामा यांच्या काळात असे झाले होते. ते स्वतः डेमोक्रॅटिक पक्षाचे होते आणि दोन्ही सभागृहांत रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होते. त्यामुळे ओबामांना कारभार करताना बऱ्याचदा अडचणी आल्या होत्या. डेमोक्रॅटिक पक्षाला ट्रम्प यांच्याबाबत तसे करता येऊ शकते. तसेच ट्रम्प यांनी केलेल्या अनेक नियुक्त्यांना मान्यता देताना डेमोक्रॅटिक पक्ष अध्यक्षांना आपल्या भूमिका सौम्य करण्याचा आग्रह धरू शकतो. 

आजसुद्धा ट्रम्प यांच्या समर्थकांपेक्षा त्यांच्या विरोधकांची मोठी संख्या आहे. मुस्लिम देशांतील नागरिकांना बंदी, मेक्सिकोला दुखावणे वगैरे पावले उचलल्यामुळे त्यांना असलेला विरोध आणखी वाढतच जाणार. ट्रम्प यांच्या आर्थिक आणि राजकीय भूमिका, लोकशाही संस्थांना टाळून कारभार करण्याची इच्छा, माध्यमांशी वैर यामुळे त्यांचा स्वतःचा पक्षसुद्धा अडचणीत येऊ शकतो. परिणामी भविष्यात ट्रम्प यांना पक्षातूनच विरोध होऊ शकतो. अध्यक्षीय निवडणूक जिंकण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे नेते ट्रम्प यांच्याविरोधात होते. ते उचल खाऊ शकतात. स्वपक्षीय आणि डेमोक्रॅटिक पक्ष यांच्या दुहेरी विरोधाला तोंड देता देता ट्रम्प यांची दमछाक होऊ शकते. त्यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष आत्मविश्वासाने उभा राहणे आवश्यक आहे. मात्र आज आत्मविश्वास गमावल्यासारखा वागत आहे. त्यामुळे आजच्या ट्रम्प यांच्या अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्ष आहे कुठे, असा प्रश्न पडल्यास नवल नाही!

sankalp.gurjar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...