आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणांचे विचार वेगळ्या वाटेने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयानंतर देशातील प्रत्येक गावातला गरीब ते महानगरातला गर्भश्रीमंत नागरिक खडबडून जागा झाला. गरजेएवढाच पैसा हाती असल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय पटकन रस्त्यावर आला. नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यावर जमा करण्यासाठी सर्वच बँकांबाहेर रांगाच रांगा लागल्या. मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय काळा पैसा बाहेर निघावा आणि भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून घेतला, असे सांगितले जात आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे मात्र सर्वसामान्य जनतेची चांगलीच धावपळ झाली. नोटांच्या चिंतेसोबतच ज्यांच्याकडे लग्न समारंभ आहे, त्यांनी पैसा कुठून आणावा? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले होते. नोटबंदीच्या निर्णयाबद्दल देशभर उलट-सुलट प्रतिक्रियाही उमटल्या. खरेच मोदी सरकारचा निर्णय चुकला का? हे जाणून घेण्यासाठी देशातील नामांकित हफिंग्टन पोस्ट इंडिया, शादी डॉट कॉम आणि सी व्होटर या तीन वेगवेगळ्या संस्थांनी देशव्यापी सर्वेक्षण केले. यात हफिंग्टन पाेस्ट इंडिया या संस्थेने २५२ लाेकसभा मतदारसंघांतील १२१२ नागरिकांना अाठ प्रश्न विचारले. सी-व्हाेटरने केलेल्या सर्वेक्षणात मतदारांना काही प्रश्न विचारले, शादी डाॅट काॅमने तरुणांना प्रश्न विचारले. या तिन्ही सर्वेक्षणांतून नोटबंदीलाच अधिकचा पाठिंबा मिळाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. सर्वेक्षणातून सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्रास सहन करू, पैसा अॅडजस्ट नाही झाला तर कोर्ट मॅरेज करण्याची तयारी तरुणांनी दाखवली आहे. देशाचं भवितव्य हे तरुणांच्या हाती आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे तरुणांचे विचार हे कोणत्याही देशासाठी कधीही महत्त्वाचेच असतात. त्यामुळे नोटबंदीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या वेगवेगळ्या तीन देशव्यापी सर्वेक्षणांतील निष्कर्ष आणि मोदी सरकारचा निर्णय बरोबर की चूक हे योग्य वेळी ठरेलच; पण तरुणांची जगण्याची आणि विचार करण्याची मानसिकता बदलत आहे, हे मात्र या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. देशासाठी नोटबंदीच्या निर्णयाएवढेच तरुणांचे बदलणारे विचार आणि मानसिकता हेदेखील महत्त्वाचे आहे. असे म्हटले जाते, आई, वडील हेच मुलांचा हट्ट किंवा हौसेखातर लग्नात वारेमाप पैसा उधळतात. मुलांसाठी ते लग्नात कपड्यांपासून ते बँडबाजा, बारातीपर्यंत भपकेबाज प्रदर्शन करतात. अशा प्रदर्शनासाठीच पैसा कमी पडताेय का, असा प्रश्नही निर्माण हाेताेय. मात्र, नोटबंदीमुळे लग्न समारंभासाठी पैसा आणायचा कुठून, या प्रश्नाचे उत्तर शादी डॉट कॉमला १३२० विवाह जुळलेल्या तरुणांनी दिले आहे. नोटबंदीमुळे त्यांच्या विवाह सोहळ्यांवर फारसा परिणाम झाला नाही, हे सांगताना अनेक तरुणांनी पैसा अॅडजस्ट झाला नाही तर चक्क कोर्ट मॅरेज करण्याची किंवा विवाह पुढे ढकलण्याची तयारी दाखवली आहे. याचाच अर्थ, तरुणांनाही लग्न समारंभाच्या भपकेबाजीवर लाखो, करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा तो पैसा कंपनी किंवा व्यवसायात गुंतवायला आवडेल. लग्न समारंभावर पैसा खर्च करूच नये, असे कुणीही सांगणार नाही. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतो. दोन जीवांचे मिलन असते, तसा तो दोन परिवारातील उत्सवही असतो. आप्तेष्ट नातेवाईक येण्याचा आणि नातं जपण्याचा तो एक संस्कारही असतो. पण लग्नाला सोहळ्याचे स्वरूप असले तरच संस्कारही जपले जातात. लग्नाचे समारंभ होऊ नयेत. समारंभ आला की प्रतिष्ठा येते आणि प्रतिष्ठा आली की पाण्यासारखा पैसा वाहतो. अर्थात, ज्याच्याकडे पैसा आहे, त्यांनी तो लग्नात गरजेएवढा खर्चही केला पाहिजे. कारण लग्न सोहळ्यांवर मोठे अर्थकारणही घडत असते. लग्न दोघांचे असते, पण त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे लग्न सोहळ्याला कुणीही विरोध करणार नाही. पण लग्न समारंभातून जो भपका दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे, ती बहुतांशी तरुणांना नको आहे. नोटबंदीच्या निमित्ताने तरुणांनी मांडलेला हा विचार देशाला निश्चितच पुढे नेणारा आहे. या विचाराचे पाईक होण्याचा प्रयत्न पालकांनीही करावा आणि लग्नात भपकेबाजीसाठी काढून ठेवलेला पैसा अन्य कुठेही गुंतवल्यास तोही मुलांच्या भवितव्याचा आणि देशहिताचाच विचार असेल, हे मात्र तेवढेच खरे आहे.
त्र्यंबक कापडे
निवासी संपादक, जळगाव
बातम्या आणखी आहेत...