आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्य आणि जागतिकीकरण परस्परविरोधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा लेखक स्वत: देश, धर्म, परंपरा, भाषा ह्या इतरांना पवित्र वाटणार्‍या गोष्टी मानत नसेल; परंतु जगातल्या करोडो लोकांच्या ह्या श्रद्धांची टिंगलटवाळी करण्याचं स्वातंत्र्य त्याला कोणी दिलं? कित्येक गरीब लोक दिवसभर खायला काही मिळालं नाही तरी अल्लाचं, देवाचं नाव घेऊन उद्या काहीतरी बरं होईल, ह्या श्रद्धेवर झोपी जातात. जगात सगळ्यांना नवनव्या अॅडव्हान्स रॉयल्ट्या, नवीन नवीन नोकर्‍या, नवीन नवीन बायका किंवा इंग्लंड-अमेरिकेसारख्या नवनव्या देशांचं नागरिकत्व मिळत नाहीत. टाचा घासूनही रोजचं जगणं कठीण झालेलं असतं. अशा करोडो लोकांना ह्या जुन्या परंपरा आवश्यक असतात, त्या त्यांना प्राणापलीकडे प्रिय असतात.

या अंधश्रद्धा मिटवायच्या तर त्यांना वेगळ्या संधी उपलब्ध होणं आवश्यक असतं. त्यांच्यात राहूनच त्यांची दु:खं वाटून घेऊन, मुख्य म्हणजे त्यांच्याच भाषेत लिहून, सआदत हसन मंटोसारखं त्यांच्या संकल्पना थोड्याफार बदलवणं लेखकांना शक्य असतं. त्याची काही किंमत ही त्या त्या भाषेत ज्ञानेश्वर, तुकाराम, दांती, पुष्कीन वगैरे लेखक चुकवत आले. असे हळूहळू समाज बदलत आले. पण रश्दीसारख्याचं एका समाजात श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी दुसर्‍या समाजातल्या श्रद्धांची टिंगल करणं हे लेखकांच्या परंपरेत बसत नाही. त्याचं "करमणुकी'पलीकडे काही वाङ््मयीन मूल्य आहे, असंही वाटत नाही. अशा भारतीय इंग्रजी लेखकांमुळे एकूण साहित्यात तर सोडाच, पण एखाद्या समाजातल्या मूल्यनिर्मितीच्या प्रक्रियेत इंचभरसुद्धा भर पडत नाही. उलट लेखकाच्या स्वातंत्र्याचा हा गैरवापर ठरतो. मुख्य म्हणजे आपल्यालाच नावं बदलून, गुप्त रीतीनं जगून, पोलिस पहार्‍यात जन्म घालवावा लागणं, हे कुठल्याही अस्सल लेखकाला श्रेयस्कर नाही. आज जागतिकीकरणाचा हा एक धडा आपल्यासमोर आहे. स्वत:चं गाव, समूह, स्वत:चा समाज समोर न ठेवता दुसर्‍यांसाठी "जागतिक' कसरती करत राहणं, हे लेखकांना परवडत नाही. जगातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या इतिहासात रशदींसारखे लोक मार्तीरसुद्धा होऊ शकणार नाहीत.

आता जागतिकीकरणामुळे सामाजिक स्थैर्य कसं धोक्यात येतं, याचं उदाहरण म्हणून गुजरातमधल्या दंगलीचा विचार करू. हिंदुस्थानात स्वातंत्र्योत्तर काळात अतिशय आंतरराष्ट्रीय झालेला हा समाज फिजी बेटांपासून आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका या सर्व खंडांत सर्वत्र प्रस्थापित झालेला आढळतो. झवरचंद मेघाणी, पन्नालाल पटेल, महात्मा गांधी अशा लेखकांमधल्या देशी जाणिवा हळूहळू फालतू युरोपी-इंग्रजी समीक्षेत गुरफटल्याचं गुजराती साहित्यातही दिसतंच. जगभर व्यापारी जाळं असलेले हे लोक कुठल्याही अर्थाने हिंदू किंवा मुसलमान नाहीत. परंतु गेल्या काही वर्षांत जुनाट धार्मिक संघटनांनी जागतिक पातळीवर हे लोक बांधून त्यांना स्थानिक पातळीवर सुटं सुटं करून टाकलं.

परदेशातून कोट्यवधी रुपये गुजरातकडे पोहोचतात, हे जसं कच्छच्या भूकंपात उघड दिसलं, तसं दंगे घडवणार्‍या धार्मिक संघटनांना आर्थिक पाठबळही नक्कीच पोहोचलं असणार. सतत नमतं घेणारा हा समाज एकदम इतका हिंसक होऊ शकतो, याचं मूळ ह्या स्थानिक एकोप्याची केंद्रं नाहीशी करून टाकणार्‍या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहे. जागतिकीकरणामुळे दूरदूरचे समाज जवळ येतात, हे अगदी खरं आहे. यामुळे अर्थात जवळजवळ नांदणारे समाज मात्र एकमेकांना दुरावतात. टीव्ही, इंटरनेट, कॉम्प्युटरांवर अमेरिका व आफ्रिका मला जास्त जवळ आली. पण शेजारच्या वस्तीचा माझा संबंध पूर्वी होता तितकाही राहू नये, अशी ही अवस्था झाली. ह्यातून प्रचंड नरसंहाराची शक्यता निर्माण होते. गुजरातच्या दंगली या पूर्वीसारख्या तात्पुरत्या नक्कीच नसणार. त्या लवकर संपतील, असं समजायलाही काही तार्किक पाठबळ नाही. फार काय, हा नरसंहार उद्या मुंबईत, कोल्हापुरातसुद्धा केव्हाही सुरू करता येईल, अशी परिस्थिती वाढत जाईल. बहुसांस्कृतिक समूहांनी एकत्र नांदण्याचं काव्य नव्या जागतिक लोंढामाध्यमांमुळे संपुष्टात आलं आहे.

इथे आपण जागतिकीकरणाचं एक सूक्ष्म आणि एक स्थूल समीकरण मांडायचा प्रयत्न केला. खरं तर साहित्य आणि जागतिकीकरण या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत, असं म्हणता येईल. अगदी अलीकडे वसाहतवाद सुरू झाल्यावर साहित्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्याचे प्रयत्न हेतुपूर्वक सुरू झाले. पूर्वीही पंचतंत्र, रामायण, महाभारत हे निर्मितिस्थळाच्या बाहेर देशोदेशी पसरले, पण त्यामागे आंतरराष्ट्रीयतेचे तत्त्व नसे. चॉसर किंवा शेक्सपिअर हे हिंदुस्थानी गोष्टी कुठून तरी हिंदुस्थानातून केव्हातरी युरोपात भाषांतरित होत गेल्या, त्या आपल्याशा करून बिनदिक्कत स्वत:च्या पुस्तकांमध्ये वापरत असत. "एका' संस्कृतीनं "दुसर्‍या' संस्कृतीवर काहीतरी लादल्याचं आंतरराष्ट्रीयत्व त्यामागे नव्हतं.
मौखिक साहित्य तर संस्कृतीच्या जन्मापासून अत्यंत देशी राहिलं आहे.

सुमेरियन काळातल्या लिखित पुराव्यांपासून वसाहत काळापर्यंत म्हणजे १८व्या शतकापर्यंत साहित्य हे जागतिक तत्त्वावर कुठेही निर्मिलं किंवा वापरलं जात नव्हतं. बौद्ध साहित्य भूमध्य समुद्रापासून जपानपर्यंत जगभर पसरलं ते हिंदुस्थानी संस्कृती पसरवण्यासाठी नव्हे तर स्वतंत्रपणे "बौद्ध' संस्कृती पसरवण्यासाठी. परंतु वसाहतवादी युरोपी लोकांनी, विशेषत: इंग्रजी साम्राज्यवाद्यांनी अशी चाल सुरू केली, की अमुक शेक्सपिअर आमचा असल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा आहे. मग यात जॉन मिल्टनचाही नंबर लागला. मिल्टन फक्त इंग्लंडमध्येच मोठा असेल, पण तो महाकवी? त्यानं म्हणे "महाकाव्य' लिहिलं. हे पॅराडाइज लॉस्ट महाकाव्य म्हणजे आपल्या एकनाथांच्या "भावार्थ रामायणा'च्या पलीकडे फार मोठं नाही आणि ते वाचवतही नाही, जबरीनंच वाचावं लागतं. आपण होऊन वाचक "एन्जॉय' करतील, असं हे मौलिक-ओरिजिनल-महाकाव्य नाही, हे खुद्द इंग्लंडमधल्या सॅम्युअल जॉन्सन या मोठ्या समीक्षकानं म्हटलं होतं. परंतु हे असं "महाकाव्य' केवळ इंग्रजी असल्यानं आपल्यावर लादलं गेलं. शिवाय ते इंग्रजी म्हणून "जगप्रसिद्ध' असतंच, हेही एक मूल्य लादलं गेलं आणि मग महाभारताच्या आपल्या या देशात इंग्रजीच्या वर्गातून इंग्रजीचे हिंदुस्थानी प्राध्यापक टाय वगैरे लावून "एपिक' म्हणजे काय, चर्चा करत करत पॅराडाइज लॉस्टच्या आधारे चुकीचे उच्चार, चुकीचं वाचन करत ते महाकाव्य जगप्रसिद्ध आहे, म्हणून आपल्याला धुंद होऊन शिकवत आले आणि आपण मिल्टन हा किती थोर कवी आहे, असं म्हणत आलो.

या गफलती गेल्या दीडदोनशे वर्षांतच झाल्या. त्या अर्थात वसाहतीकरणाखालील शिक्षणव्यवस्थेमुळे झाल्या. अशाच गफलती मानवी शास्त्रांमध्ये अर्थशास्त्रात, राज्यशास्त्रात, विशेषत: इतिहासात आणि समाजशास्त्रात झालेल्या आहेत. अशा चुकीच्या संकल्पना आपल्या मेंदूमध्ये कायमस्वरूपी झालेल्या आपल्याला दिसतील. दोन वर्षांपूर्वी रा. भा. पाटणकर यांनी "अपूर्ण क्रांती' हे पुस्तक लिहिलं. त्याच्यात देशीवादावर एक प्रकरण आहे. त्याच्यात त्यांनी देशी प्रमाणकं अशी काही नसतातच, ती परदेशातून आणलेली असतात, असं सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न केला आहे. ही विचारवंत मंडळी प्रमाणकं ही इंटरनॅशनलच असतात असं मानणारी आहेत. आता याबद्दल थोडक्यात आपण विचार करूया, की हे International Standards कुठून आले ? तर हेही कुठूनतरी निर्माण होतातच Fifty World Classics अशी एखाद्या एव्हरीमन किंवा मॅकमिलनसारख्या प्रकाशकांची ग्रंथमाला जाहीर होत राहते. या मालेत अडिसन, स्टील अशांसारखे किरकोळ लोकसुद्धा असतात. दुय्यम दर्जाचे ग्रंथसुद्धा क्लासिक म्हणून छापलेले असतात. या यादीत मृच्छकटिक नसतं. लीळाचरित्र नसतं. रामायणही नसतं, गाथा सप्तशती नसते, दशकुमारचरित, तुकाराम किंवा गालिब, प्रेमचंद हे तर लांबच. खरं तर चिनी, तिबेटी, मराठी अशी जगातली मोठी पंधरा क्लासिक्सल असू शकतील. त्याची वार्ताही जगातल्या वाङ‌्मयीन विश्वाला अजूनपर्यंत नाही. पण बेयवुल्फ टेनिसन, ब्राउनिंग, डिकन्सपर्यंत सगळे दुय्यम तिय्यम दर्जाचे लेखक ह्या इंग्रजांच्या वर्ल्ड क्लासिक याद्यांमध्ये असतातच. एवढं धैर्य फक्त अडाणी लोकांमध्येच असू शकतं, हे आपण लक्षात ठेवायला हवं.

वसाहतवादाची आणि साम्राज्यवादाची हीच खरी बाजू आहे की, त्यांना हे कळलेलं नाही की रॉबर्ट क्लाइव्हसारखी चौथी नापास झालेली उनाड पोरं पाहता पाहता जवळपास दोनतृतीयांश जगावर राज्य प्रस्थापित करतात आणि ह्या अमानुष शोषणावर मुलामा म्हणून नंतर आपल्याला विद्वत्ता शिकवू लागतात. मानवी इतिहासात जे अक्षम्य असे महाभयंकर गुन्हे घडले आहेत, अशांपैकी हा गुन्हा आहे. वसाहतवादाच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा मोठमोठ्या विचारवंतांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे. रामकृष्ण विश्वनाथ यांनी इ.स. १८४३मध्ये आकडेवारीनं सिद्ध केलं की, इंग्रज लोक हिंदुस्थानात सव्वा पेनीला एक रत्तल म्हणजे साधारणत: ४५० ग्रॅम कापूस खरेदी करतात आणि इंग्लंडमध्ये तो ३ शिलिंगला विकतात. म्हणजे शेकडा पाचशे टक्के वाढवून! हे तर सोडाच, पण रामकृष्ण विश्वनाथ पुढे मांडतात, की याच कापसाच्या मूळ किमतीवर शेकडा अडीच हजार टक्के इतक्या रकमेची विक्री तिकडून कापड करून आणून इकडे हिंदुस्थानात हे इंग्रज करतात. हा व्यापार म्हणायचा की लूटमार?