आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रवाह : बुरसटलेल्या मानसिकतेची आरोग्य यंत्रणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया महिलांवरच्या संततिनियमन शस्त्रक्रियेच्या तुलनेत अधिक निर्धोक व परिणामकारक असतानाही छत्तीसगडला दुर्दैवी घटना घडून १२ महिलांचा मृत्यू झाला.

छत्तीसगडमधील विलासपूर येथे एका सरकारी आरोग्य शिबिरात संततिनियमन शस्त्रक्रियेत निष्काळजीपणामुळे १२ महिलांचा झालेला मृत्यू हृदयद्रावक असाच आहे. आरोग्यविषयक तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत असताना अशा घटना आजच्या काळात घडणे हे आपल्या आरोग्य व्यवस्थेचे केवळ अपयश नसून पुरुषी मानसिकतेचा पगडा कुटुंब नियोजन योजनेवर कसा दबाव आणतो, हे दर्शवणारा आहे. छत्तीसगड राज्यात भाजपची सत्ता आहे व केंद्रातही भाजपची सत्ता आहे. या घटनेच्या विरोधात दोन्ही सरकारे व बडी प्रसारमाध्यमे मूग गिळून बसली आहेत. वास्तविक केंद्र सरकारच्या नियमांनुसार सरकारी डॉक्टरांना एकाच दिवशी ३० हून अधिक संततिनियमन शस्त्रक्रिया करण्यास परवानगी नाही. या शस्त्रक्रिया करणा-या लॅप्रोस्कोप मशीनद्वारे एकाच दिवशी १० शस्त्रक्रिया करण्याचे बंधन आहे, पण सरकारी डॉक्टरांनीच सर्व नियम धाब्यावर बसवून एकाच दिवशी ८३ शस्त्रक्रिया केल्या. प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर लॅप्रोस्कोप मशीन काळजीपूर्वक जंतुविरहित करावे लागते. त्यामुळे पुढील शस्त्रक्रियेत जंतुसंसर्ग होऊ शकत नाही; पण तशी कोणतीही काळजी न घेता शस्त्रक्रिया उरकण्यात आल्या. या बेजबाबदार कारभारामुळे १२ महिलांच्या जिवावर बेतले व ५० महिला अजून रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी २५ महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. वास्तविक पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया महिलांवरच्या संततिनियमन शस्त्रक्रियेच्या तुलनेत अधिक निर्धोक व परिणामदायक असते; पण या शस्त्रक्रियेविषयी समाजात रुजलेले गैरसमज थेट पुरुषत्वाशी निगडित असल्याने देशातील कुटुंब नियोजन कार्यक्रम फारसा उल्लेखनीय कामगिरी करू शकलेला नाही. २०११-१२ या वर्षात छत्तीसगडमध्ये एक लाख २७ हजार ११४ महिलांनी संततिनियमन शस्त्रक्रिया करून घेतल्या होत्या, तर ६,७६५ पुरुषांनी नसबंदी करून घेतली होती. देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, प. बंगाल, मध्य प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू या राज्यांमध्ये हे प्रमाण बहुतांश अशाच पद्धतीचे आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने नसबंदी अधिक व्हाव्यात म्हणून माणशी दोन हजार रुपयांचे अनुदान देण्यास सुरुवात केली होती, पण सरकारी डॉक्टरांना नसबंदी शस्त्रक्रिया नव्हे, तर संततिनियमन शस्त्रक्रिया कागदावर अधिक दिसाव्यात या हेतूने उद्दिष्ट दिले होते. हा विरोधाभास पुरुषी मानसिकतेला अधिक बळ देणारा आहे. छत्तीसगडची घटना हेच दर्शवते.