आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूड इंडस्ट्रीला मारक प्रवृत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी बॉलीवूडवाल्यांनी सिनेमासाठी पैसा हवा त्यासाठी मदत करा, अशी विनवणी केली होती. याचे कारण त्यावेळी बँका चित्रपट निर्मात्यांना कर्ज देत नव्हत्या. बँकेच्या दृष्टीने जे काही भांडवल लागते ज्याला कोलॅटरल (Collateral) म्हणतात. त्यामध्ये स्क्रिप्ट आणि अभिनेत्यांच्या शूटिंगच्या तारखा हा भाग बसत नव्हता. बँका त्याला भांडवल मानत नव्हत्या किंवा त्यांना तारणही मानता येत नव्हते. याचाच अर्थ चित्रपट निर्मात्यांवर इतर ठिकाणांहून पैसे जमवणे आलेच. मग पर्याय म्हणून निर्माते अंडरवर्ल्डकडून पैसा घेत असत. अनेकदा निर्माते आणि बॉलीवूड स्टार यांचे गुन्हेगारी जगतातील मंडळींशी साटेलोटे असल्याच्या बातम्या येत असत.
अलीकडे हे सारे थांबले आहे याचे कारण पैसे जमवण्याचे नवे मार्ग चित्रपट निर्मात्यांना उपलब्ध झाले आहेत. याचाच अर्थ असा की, बॉलीवूड ही आता एक मोठी आणि महत्त्वाची इंडस्ट्री बनली आहे आणि ती अत्यंत वेगाने वाढते आहे, असा त्यातून समज होऊ शकतो, पण प्रत्यक्षातील वस्तुस्थिती वेगळी आहे. काही आठवड्यांपूर्वी सुप्रसिद्ध निर्माता करण जोहर याने सिनेमा व्यवसायाबद्दलची आपली मते व्यक्त केली. त्याला या व्यवसायाची आतली आणि बाहेरची सगळी माहिती आहे. त्याने असे म्हटले की, ‘भारतातील सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या दर दिवसागणिक घटत आहे.’

याचे महत्त्वाचे कारण चित्रपट व्यवसायाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे. भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे केवळ एक सिनेमा पडदा आहे उलट अमेरिकेत हेच प्रमाण १२ आहे तर चीनमध्ये हेच प्रमाण लाखामागे २.५ आहे. चीनने हाँगकाँगमध्ये एक मोठा सिनेउद्योग निर्माण केला आहे. भारतामध्ये सध्या मोठ्या शहरांमधून जुनी सिनेमाघरे पाडून तिथे मॉल बांधायचे सुरू आहे. याचाच अर्थ पर्यायाने सिनेमा पडद्यांची संख्या आणखी कमी होणार. दुसरी समस्या ही आहे की, मल्टिप्लेक्स मॉलमध्ये जे काही सिनेमे दाखवले जातात ते मध्यमवर्गीयांच्या खिशाबाहेरचे असतात. तिकीटच अडीचशे रुपयांचे असते त्यामुळे नियमितपणे सिनेमा पाहणे हे घरातील उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात बाधक आहे. या सिनेमा घरामधील सेवा कर आणि मनोरंजन कर खूप असतो. त्यामुळे तिकिटांचे दर कमी ठेवणे शक्य नसते.

याचा अर्थ निर्माते आणि स्टुडिओ कंपन्या या पैसे कमवण्यासाठी हपापलेल्या आहेत, असा नव्हे. वॉल्ट डिस्नेसारख्या महत्त्वाच्या निर्माता कंपनीने अलीकडे जाहीर केले की, बॉलीवूड चित्रपट निर्मिती उद्योगातून ते आता बाहेर पडणार आहेत. याचे कारण त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मग प्रेक्षकांना सिनेमा हवा तसा पाहायला का नाही मिळत? याचे एक कारण बॉलीवूड उद्योगाच्या तंत्रात पण आहे. अलीकडे मला एका मित्राने सांगितले की, बॉलीवूडचे जे स्टार आहेत ते आता जास्त सिनेमे बनवत नाहीत. त्यामुळे बहुतांश प्रेक्षक सिनेमागृहात जात नाहीत. अामिर, शाहरुख, सलमान हे नायक केवळ वर्षाकाठी एखादा सिनेमा करतात आणि अधिकाधिक पैसा ते टीव्हीवरील विविध कार्यक्रमांतून मिळवतात. यामुळे लोकप्रिय अभिनेत्यांनी अधिकाधिक चित्रपट केले तर प्रेक्षक आकर्षिले जातील.

आता यातील महत्त्वाचा प्रश्न आहे बॉलीवूडमध्ये सर्वाधिक सिनेमे बनत असले तरीही भारतीय भाषात बनणारे तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम यांनाही यात घेतले तर दर वर्षाकाठी बनवणारी चित्रपटांची संख्या खूपच मोठी आहे, पण एवढ्या मोठ्या संख्येमागे स्टार्सची संख्या मात्र फारच कमी आहे. हॉलीवूडमध्ये असे कितीतरी सुपरस्टार आणि अन्य अभिनेते आहेत, जे मोठ्या सिनेमामध्ये काम करू शकतात. दुसरा प्रश्न आहे तो विचित्र आहे आणि तो हाँगकाँगसारख्यांनी सोडवला आहे. तो म्हणजे वैश्विकतेचा. बॉलीवूडचे चित्रपट वैश्विक नाहीत. याचे कारण काय हाँगकाँगमध्ये मार्शल आर्ट असते जी अर्थातच जिच्यात शारीरिक द्वंद्व असते. त्यामुळे ब्रूस ली किंवा जॅकी चॅनचे सिनेमे जगभर पाहिले जातात. अमेरिकेत आणि भारतात ते नावाजलेले आहेत. या अॅक्शन सिनेमामुळे हाँगकाँगचे सिनेमा जरी देशी भाषेत डब केले तरी सर्वांना कळू शकतात. आणि त्याचा दर्जावर परिणाम होत नाही.

भारतीय सिनेमा अॅक्शनवाले नसतात. बरं अॅक्शन असली तरी ती हाँगकाँगच्या चित्रपटांच्या दर्जाची नसते. आपला भर हा गाणी आणि नृत्यावर असतो त्यामुळे असे सिनेमे जर डब केले तर त्याच्या दर्जाला मोठी हानी पोहोचते. याच कारणामुळे आपले सिनेमे हॉलीवूड आणि हाँगकाँगच्या मागे पडतात. आपले सिनेमे केवळ दक्षिण आशियायी लोकांनाच आवडतात.

आता गंमत अशी आहे की, जरी प्रेक्षकांची संख्या कमी होत असली तरी पाकिस्तानसारखे मोठे मार्केट त्यांच्या मल्टिप्लेक्समुळे भारतीय सिनेमाला उपलब्ध आहे. अनेक वर्षे आपण हा पैसा गमावत होतो. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी सर्व प्रथम सिनेमा दाखवायला परवानगी दिली. याचा दोन्ही देशांना फायदा झाला. आज सारे बॉलीवूड चित्रपट पाकिस्तानात दाखवले जातात दुर्दैवाने दोन देशांमधील संबंध आता बिघडत चालले आहेत. त्यामुळे मुशर्रफ यांचा शहाणा निर्णय आता उलटतो आहे. त्यामुळेच बॉलीवूड सर्व शक्यता असूनही हवे तितके विस्तारत नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये क्षमता आहेत अशा डरकाळ्या फोडल्या जातात, पण प्रत्यक्षात या क्षमतांचा उपयोगच केला जात नाही.
आकार पटेल
लेखक विविध विषयांचे जाणकार आहेत
(अनुवाद - शशिकांत सावंत)
बातम्या आणखी आहेत...