आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिर्र...नादखुळा थरार !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
बैलगाडा शर्यतींचा थरार महाराष्ट्राच्या शिवारांमधून पुन्हा एकदा अनुभवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शर्यती कायदेशीर करण्यासाठी सरकारने पाऊल टाकले आहे. राज्यात सर्वदूर बैलांच्या शर्यतींची परंपरा नसली तरी कर्जबाजारीपणा आणि शेतमालाच्या किमतींमुळे कोंडलेल्या ग्रामीण जीवनात तेवढीच एक गार झुळूक म्हणून याकडे पाहता येईल. प्राण्यांच्या हक्कासाठी आततायीपणा करणारा एक मोठा वर्ग समाजात आहे. या वर्गाने बैलांच्या शर्यतीवर क्रौर्याचा शिक्का मारला आहे. या मंडळींचा दावा निराधार नसला तरी फार अतिरंजित आहे. मुद्दा तारतम्याचा असतो. ‘मुक्या प्राण्यांचे हाल’ अशी भावनिक चर्चाच करायची तर मग रोजच्या चहाच्या कपातल्या दुधाला पहिल्यांदा सुटी द्यावी लागेल. जन्मदात्रीखेरीज इतर प्राण्यांचे दूध पिणारा माणसासारखा दुसरा प्राणी जगात नसावा. (माणसाच्या संगतीत राहून अनैसर्गिक वागणाऱ्या कुत्र्या-मांजरांचा अपवाद वगळता.) दूधनिर्मितीची व्यवस्था निसर्गाने केवळ नवजात जीवाच्या मर्यादित काळाच्या पोषणासाठी केलेली आहे. माणसाने मात्र दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणत गाय-म्हैस, शेळी-मेंढी, उंट वगैरे दिसेल त्या प्राण्यांच्या धारा काढायला सुरुवात केली. गायी-म्हशी जास्तीत जास्त पिळल्या जाव्यात म्हणून अत्याधुनिक डेअऱ्यांमधून जे ‘शास्त्रीय’ प्रकार केले जातात ते पाहिल्यानंतर त्याला ‘क्रौर्य’ का म्हणू नये, हा प्रश्न अनाठायी ठरणारा नाही. नवजात वासराला चिकाचेही चार थेंब अशा डेअऱ्यांमधून मिळू दिले जात नाहीत. मांसाहाराची चटक भागवण्यासाठी सर्रास होणाऱ्या नानाविध प्राण्यांच्या कत्तलींकडे ‘जिवो जीवस्य जीवनम्’ असे म्हणत डोळेझाक केली तरी यातले क्रौर्य कसे नाकारणार? ओझी वाहायला-ओढायला प्राणी वापरतात. शेतीकामाला प्राणी लागतात. करमणुकीसाठी प्राण्यांना ‘पाळीव’ बनवतात. प्राण्यांची चक्क ‘संग्रहालये’ थाटतात. हे सर्व प्रकार क्रौर्याचे ठरत नाहीत? तेव्हा अगदीच मनापासून प्राणिप्रेमाचे उमाळे येत असतील तर मग यात ‘निवडकता’ असणार नाही याची तरी किमान काळजी घ्यायला हवी. 
 
नपेक्षा व्यावहारिक पर्याय शोधला पाहिजे. बैलांच्या शर्यती पारंपरिक आहेत. पशू-पक्षी पालन हा कृषी जीवनाचा अविभाज्य भाग. ज्या पशू-पक्ष्यांच्या संगतीने शेतकरी आयुष्य काढतो, ते त्याच्या कुटुंबाचा भाग बनतात. रेड्यांच्या टकरी, कोंबड्यांच्या झुंजी, बैलांच्या शर्यती, दसरा-पाडव्याला म्हशी पळवणे वगैरेतून आनंदाचे चार क्षण मिळवण्याची माणसाची सवय जुनी आहे. हार-जितीच्या टोकाच्या इर्षेतून या पारंपरिक आनंदात काही कुप्रथा घुसल्या असतील तर त्यांना जरूर आक्षेप घ्यावा. बैलांच्या शर्यतीचे असेच आहे. शर्यत जिंकण्यासाठी बैलांना मद्य पाजणे, जखमा करणे, मारहाण करणे याचे समर्थन कोणी करणार नाही. त्याच वेळी ही वस्तुस्थितीदेखील लक्षात घेतली पाहिजे की असे अघोरी प्रकार करणारे रानटी लोक मुळात अत्यल्प आहेत. अन्यथा शर्यतीचा बैल सांभाळणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. शर्यतीच्या जातिवंत खिलारी बैलाची किंमत युरोपियन कारच्या किमतीपेक्षा कमी नसते. शर्यतीच्या खोंडाचा व्यायाम-खुराकावरचा खर्च लाखांमध्ये असतो. शर्यतीचा बैल “तयार’ करण्यासाठी दूध, अंडी, पेंड, गव्हाचे पीठ, हरभरा-उडीद असा खुराक दिला जातो, शिवाय अगदी काजू-बदाम आणि मांस खाऊ घालणारेसुद्धा मालक आहेत. धावण्याचा सराव, तेल मालिशसाठी वेळ द्यावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे बैलाला जीव लावावा लागतो. त्याशिवाय इशाऱ्यासरशी प्रतिस्पर्ध्याला शिंगावर घेत, बैल बाणासारखा सुसाट उधळत नसतो. शर्यत ही ग्रामीण जीवनातली हौस आहे. यात्रा-जत्रा, उरुसाच्या निमित्ताने वर्षातून फार तर चार-सहा वेळा अनुभवण्याची मौज आहे. ही शर्यत एक-दीड मिनिटात संपते. त्यावर सरसकट क्रौर्याचा शिक्का मारणे हा शुद्ध आततयीपणा आहे. प्राणिप्रेमींनी विरोध करण्याऐवजी शर्यतींना शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा. स्पेनमधल्या ‘बुल फाइट्स’चे जगाला कुतूहल आहे. तसे ‘मार्केटिंग’ आपल्या बैल शर्यतींचे का होऊ नये? घोड्यांच्या ‘रेस’इतक्याच बैलांच्या शर्यतीही व्यावसायिक झाल्या तर यातून नवी ‘इंडस्ट्री’ उदयास येऊ शकते का, याचा विचार व्हावा. शतकानुशतके चालत आलेल्या लोकोत्सवावर शिंतोडे उडवण्यापेक्षा या शर्यती सुरक्षित आणि अधिक आकर्षक करण्याचे प्रयत्न व्हावेत. सरकारी विधेयकामुळे कत्तलखान्याच्या वाटेवरील स्थानिक गोवंशांची जपणूक करण्याचा नाद वाढीस लागेल. बैलांच्या शर्यतीवरील प्राणिप्रेमींचे आक्षेप निराधार ठरवण्याची जबाबदारी बैलगाडा चालक-मालकांनी यापुढे कसोशीने पेलली पाहिजे. कारण विधेयकाविरोधात कोणी प्राणिप्रेमी सर्वोच्च न्यायालयात जाणारच नाही, असे नाही. 

- विशेष प्रतिनिधी, पुणे
बातम्या आणखी आहेत...