आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"ब्लू मोर्मोन'च्या राज्यात... (विशेष)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"ब्लू मोर्मोन' फुलपाखरांना"राज्य फुलपाखराचा' दर्जा देऊन सरकार निसर्ग संरक्षणाकडे किती सकारात्मकदृष्ट्या पाहते आहे हे दाखवून दिले आहे. या निर्णयाबरोबर सरकारने दुर्लक्षित पण पर्यावरण संवर्धनातील महत्त्वाच्या अशा किडे, कीटकांच्या प्रजातीबाबतही लक्ष देण्याची गरज आहे.
फुलपाखरू छान किती दिसते! मी धरू जाता उडू पाहते!!
फुलपाखरू छान किती दिसते!!!
खरंच फुलपाखरांशी मैत्री करणे ही संकल्पनाच किती सुंदर, मनाला मोहून टाकणारी आहे नाही? फुलपाखरांशी मैत्री करणे किंवा त्यांचा अभ्यास करणे, त्यांचे छायाचित्रण करणे किंवा त्यांच्यासाठी खास प्रकारचे उद्यान तयार करून त्यांचा, त्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास करणे ही संकल्पना "विल्यम ब्लिथ' या इंग्रज संशोधकाने भारतात रुजवली. त्याने चक्क भारतातल्या १२०० फुलपाखरांच्या जातींवर संशोधन करून एक पुस्तकही लिहिले व येथे आढळणाऱ्या फुलपाखरांना पदव्यांप्रमाणे नावेही दिली. त्याचपैकी एक फुलपाखरू म्हणजे सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ठरलेले "ब्लू मोर्मोन' ( Blue Mormon) हे फुलपाखरू...

भारतात १५०३ फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. अरुणाचल प्रदेशमधील "जयरामपूर' येथे जगातील सर्वात जास्त म्हणजे ९६७ जाती दिसतात, तर सिक्कीममध्ये ७०० फुलपाखरे आढळतात. ३३० प्रजाती या दख्खन घाटात एकवटल्या आहेत, तर महाराष्ट्रात साधारणपणे ३०० प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात "सदर्न बर्ड विंग' हे जगातले आकाराने सर्वात मोठे फुलपाखरू व "ग्रास ज्वेल' हे जगातले सर्वात छोटे फुलपाखरूही आढळते. "सदर्न बर्ड विंग' नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातले फुलपाखरू म्हणजे "ब्लू मोर्मोन' फुलपाखरू.

एखाद्या ठिकाणी जितके जास्त जैववैविध्य तितकी तिथे फुलपाखरांची विविधता अधिक. फुलपाखरांचा वावर त्या त्या ठिकाणच्या तापमानावरही अवलंबून असतो. अंडी, त्यातून बाहेर येणाऱ्या खादाड अळ्या, अळ्यांनी विणलेले कोश आणि मग कोशातून हळुवारपणे ओलावल्या पंखांनी बाहेर येणारे फुलपाखरू हे असते फुलपाखरांचे जीवनचक्र. काही फुलपाखरे ठरावीक उंचीवरच्या हवामानात राहतात. काही फुलपाखरे घोळक्याने स्थलांतरही करतात. पश्चिम घाटातल्या जंगलांमध्ये मोठमोठ्या वृक्षांवर रात्री स्थलांतरित फुलपाखरांचा मुक्काम असतो. दिवस उजाडून उन्हं वर आली की फुलपाखरांनी लगडलेले झाड त्यांच्या भिरभिरणाऱ्या पंखांनी लखलखायला लागते. असेच स्थलांतर "ब्लू मोर्मोन'ही करते. फुलपाखरांचे जीवनमान हे अवघ्या २ ते ३ महिन्याचं, त्यामुळे उंच पर्वतमाथ्यावर परतताना ते आलेले फुलपाखरू घरी जात नाही तर त्याची दुसरी-तिसरी पिढी परत जाते. त्यामुळे "ब्लू मोर्मोन' फुलपाखरांचीही दुसरी-तिसरी पिढी आपल्या मूळ ठिकाणी परतते.

ही ब्लू मोर्मोन फुलपाखरे साधारण ९० मि. मी ते १२० मि. मी. एवढ्या आकाराची असतात. त्यांचा रंग साधारण नेव्ही ब्लू रंगासारखा जर्द मखमली असतो व त्यावर पांढऱ्या व लाल रंगांच्या ठिपक्यांची सुंदर मन मोहून घेणारी नक्षी असते. बरेचदा पावसाळ्यात ही फुलपाखरे बागांमध्ये, माळरानांवर रुंजी घालताना दिसून येतात. महाराष्ट्रात विदर्भ, कोकण, सह्याद्रीच्या पर्वतरांगा व पायथ्याची ठिकाणे तसेच मुंबई व इतर समुद्री किनारपट्टीच्या भागांमध्ये आढळून येतात.
फुलपाखरांचे संशोधन, निरीक्षण, छायाचित्रण हा आनंद देणारा प्रवास आहे. हल्ली त्यामुळे फुलपाखरू उद्यानांची संकल्पना रुजतेय. फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी लागणारी "फूड प्लांट' बागेत लावल्यास फुलपाखरांचे पूर्ण जीवनचक्र जवळून अनुभवता येते. अशा फूड प्लांटमध्ये कडुनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब, अशोक, अशी झाडे येतात. सोनटक्का, पानफुटी अशा झाडांवरही फुलपाखरे वाढतात. या झाडांमध्ये, पानांमध्ये लपलेल्या अळ्या शोधायच्या, पाळायच्या, त्यांना खाद्य द्यायचे आणि मग कोशातून बाहेर येणाऱ्या फुलपाखराला निसर्गात सोडायचे... हेही एक तंत्र आहे.

फुलपाखरांशी मैत्री करण्याच्या आणखी काही मजेशीर गमतीजमतीही आपण करू शकतो. यातलीच एक गंमत "बेटिंगची'! फुलपाखरांच्या मागे धावण्यापेक्षा त्यांनाच आपल्याकडे बोलवायचे असेल तर संशोधक ही शक्कल लढवतात. फुलपाखरांना फुलांचा मधुरसच नव्हे तर सडकी-कुजकी फळे, बिअर, आंबट ताडी, पपई, पेरू यासारखी आंबटगोड चवीची फळे आवडतात. याचा फायदा घेऊन आपण या फळांचा गर, आंबट ताडी किंवा बिअरमध्ये मुरवून एखाद्या बाऊलमध्ये घेऊन ते मिश्रण ४ ते ५ दिवस मुरवून अंगणात ठेवल्यास सुंदर प्रजातींची फुलपाखरे त्या ठिकाणी झेपावतात व त्यांची अक्षरशः झुंबड उडते. अशा वेळी आपण त्यांच्या जवळ जाऊन जरी छायाचित्रण केले तरी सराईत "रॅम्प वॉक' करणारे मॉडेल जसे फोटोशूटसाठी पोझ देतात तसेच ही फुलपाखरेही छान पोझ देतात. अशा अनेक गमतीजमती फुलपाखरांच्या आयुष्यात घडत असतात. पण फुलपाखरांचे कोशातून बाहेर येणे हा कसोटीचा क्षण असतो. कारण ती भल्या पहाटे कोशातून बाहेर येताना त्यांचे पंख ओलावलेले असतात. त्यांना भक्षकांनी गाठू नये म्हणूनच ही निसर्गाने योजना केली असावी. फुलपाखरांना पदव्यांसारखी नावे इंग्रजांनी दिली. त्यांच्या रूपावरून व त्यांच्या काही विशिष्ट सवयींमुळे. इंग्रजांनी जेव्हा आपल्याकडची फुलपाखरे पाहिली तेव्हा ते अक्षरशः वेडे झाले. एवढे कौतुक वाटण्याचे कारण म्हणजे पूर्ण इंग्लंडमध्ये केवळ ५७ जातींची फुलपाखरे आढळतात, तर जगभरात १८००० प्रजाती आढळतात आणि आपल्या भारतात १५०३ प्रजाती आढळतात.

फुलपाखरे ही समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक मानली जातात. तसेच फुलपाखरे ही तापमानवाढीच्या बदलाचेही निदर्शक मानली जातात. या सर्व गोष्टींमुळे फुलपाखरांचे निसर्गाच्या साखळीतील स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींमुळेच राज्य सरकारने "ब्लू मोर्मोन' फुलपाखरांना"राज्य फुलपाखराचा' दर्जा देऊन सरकार निसर्ग संरक्षणाकडे किती सकारात्मकदृष्ट्या पाहते आहे हे दाखवून दिले आहे. निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमींसाठी ही आनंदाची बाब ठरावी.

फुलपाखरांच्या पंखांवर एक प्रकारची रंगांची पावडर भुरभुरलेली असते. जेव्हा आपण त्यांना स्पर्श करतो तेव्हा तो रंग आपल्या हाताला लागतो. रंग हे त्यांचे सौंदर्य आणि सर्वस्व असते आणि या रंगांच्या माध्यमातून ते आपल्याला त्यांचे सर्वस्व देत असतात. आपल्याला जणू काही हाच संदेश देत असतात की तुम्ही जे निसर्गाकडून शिकता, मिळवता, पाहता ते ज्ञान तरल वृत्तीने, उदारपणे दुसऱ्यालाही देत जा, त्याने हे जग समृद्ध होईल. जणू काही फुलपाखरे सांगतात, "गिव्ह युवर कलर्स टू अदर्स'...

} - फुलपाखरे ही समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक मानली जातात.
बातम्या आणखी आहेत...