आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुपीक पद्धतीच तारणहार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वावलंबी असलेला उत्पादक आज सर्वच अन्नधान्यासाठी परावलंबी बनला आहे. शेतीचे अर्थचक्र बिघडले असून त्याचा थेट राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होत आहे. सर्वात बिकट समस्या म्हणजे नैराश्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत सातत्याने वाढ हाेत आहे.

- एकल पिकाकडे अाेढा वाढल्याने शेतकऱ्यांची अार्थिक घडी विस्कटली
- घरगुती प्रक्रिया उद्याेगाकडे पुुन्हा वळण्याची गरज
- अनेक पिके कालबाह्य हाेत असल्याने महागाईत वाढ

साधारणपणे २० वर्षांपूर्वी ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तीळ, भुईमूग, कारळे, जवस, ताग, अंबाडी, एरंडी, मठ, कुळीथ, राजगिरा, रब्बीतील गहू, ज्वारी, सूर्यफूल, करडई, हरभरा, ऊस, भात, तूर, बाजरी, कापूस यासह अन्य काही बहुपिकांचे उत्पादन शेतकरी घेत असे.
ओला दुष्काळ असो की कोरडा दुष्काळ, यामध्ये बहुपीक पद्धती शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरत हाेती. शेतीच्या मशागतीसाठी बैलजोडी, पर्यायी व्यवसाय म्हणून गाय, म्हशी, शेळ्या, कुक्कट पालनालाही अतिशय महत्त्व होते. या अाधारावर बळीराजा दुष्काळासह अन्य अडचणींवर सहज मात करायचा.
काळाच्या बदलत्या प्रवाहानुरूप शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीला फाटा देत एकल पीक पद्धतीवर लक्ष केंद्रित केले विशेषत: मका, कापूस, सोयाबीन, कांदा, ऊस अशा नकदी पिकांनाच सर्वाधिक प्राधान्य शेतकऱ्यांकडून मिळते अाहे. खरिपात मका, कापूस, सोयाबीनचा ९० टक्के आणि रब्बीत मका व हरभऱ्याचा ६० टक्क्यांपर्यंत समावेश आहे. हीच प्रमुख पिके घेतली जातात. याचाच अर्थ राज्यात एकल पीक पद्धती जोमात केली जाते.
उत्पादन खर्च अधिक अाणि तुलनेने उत्पादन अत्यल्प होत असल्याने शेतकऱ्यांना पुरेसा नफा मिळेनासा झाला. शेती करणे हा अातबट्ट्याचा व्यवहार ठरू लागल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमालीची बिघडली.
पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा वाटादेखील कमालीचा घसरला. उल्लेखनीय म्हणजे अन्य पिकांचे उत्पादन नाममात्र होत असल्याने त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एकूणच अन्नधान्याचे उत्पादन, देशाची गरज अाणि बाजारू अर्थकारण यातील सांगड विस्कटल्यामुळे शेतकरी अाणि सरकारसमाेर विविध समस्या उभ्या राहिल्या अाहेत. त्याचा सर्वांनाच फटका सहन करावा लागताे आहे.

यापूर्वी कृषी मालाचा उत्पादक स्वावलंबी होता, गुरेढोरे भरपूर असल्याने सेंद्रिय खत त्याकडे मुबलक उपलब्ध होते. पर्जन्यमान चांगले राहायचे. जमिनीची सुपीकता टिकून होती. बहुपीक पद्धतीत नुकसान कमी व फायदा बऱ्यापैकी होता. घरच्या घरी नानाविध प्रक्रिया उद्योग चालवले जात असल्याने डाळी, बेसण, तेल, अन्नधान्य, बियाणे, दोरी, गूळ, भाजीपाला, फळे, सांडई, पापड, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्जेदार बियाणे, चारा, ढेप आदी घरच्या घरीच तयार हाेत.
अडीअडचणीत बहुपीक उत्पादनाचा शेतकऱ्यांच्या काैटुंबिक अर्थकारणाला हातभार लागायचा. कालांतराने आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी बहुपीक पद्धती बंद होत गेली. तेलाचे घाणे बंद पडले, संकरित बियाणे शिल्लक उरले नाही, घरच्या बियाण्यांचा वापर आपोआप थांबला. परिणामी आज सर्वच बाबतीत शेतकरी परावलंबी झाल्याचे स्पष्ट दिसून येते. रेशनच्या दुकानातून उत्पादकाला गहू, तांदूळ, डाळी, तेल आदी जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत, हा त्याचाच परिणाम नाही तर काय?

- कापूस... ५२ % वाढ : १९९५-९६ मध्ये कपाशीचे क्षेत्र केवळ ९ लाख ७६ हजार ६०० हेक्टर होते. ते आज १४ लाख ८६ हजार ६०० हेक्टरवर जाऊन पोहोचले आहे. मशागत, लागवड, बियाणे, अंतरमशागत, फवारणी, पीक व्यवस्थापन, पाणी, रासायनिक खतांचे डोस, वेचणी, साठवणूक असा ढाेबळ खर्च वजा जाता कपाशीच्या विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नसल्याने मोठा फटका बसताे, ही वस्तुस्थिती अाहे. हवामानातील बदल, एकल पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांबरोबरच सरकारही आर्थिक दुष्टचक्राच्या गर्तेत अडकले आहे, हे नाकारता येत नाही.

- सोयाबीन... ५३०१% वाढ : २३ वर्षांपूर्वी सोयबीनचा नुकताच शिरकाव झाला. त्यापूर्वी कुणी हे पीक घ्यायला तयार नव्हते. कृषी अधिकारी, आत्मा विभागाच्या वतीने जनजागृती केल्यानंतर १९९५-९६ मध्ये सोयाबीनला प्राधान्य मिळू लागले. प्रथम २८ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली. त्यानंतर हे पीक एवढे लोकप्रिय झाले की, आज १५ लाख २८ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनचे उत्पादन घेतले जात आहे. म्हणजेच ५३०१ टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली. याचाही उत्पादन खर्च कमी नाही. हवामान बदल व कीडरोगाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव होत असल्याने सोयाबीनने शेतकऱ्यांना ताेट्यात आणले. यंदा तर ७८ टक्के सोयाबीन परतीच्या अवकाळी पावसाने व जुलै ते ऑगस्टमध्ये पडलेल्या २५ दिवसांच्या खंडाने ३० टक्के सोयाबीन हातचे गेले.
- मका... ४० % वाढ : गेल्या २० वर्षांत विशेषत: औरंगाबादसह मराठवाडा मका उत्पादनाचे हब बनले आहे. खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यातही शेतकरी मक्याची लागवड करतात. खरीप मक्याच्या क्षेत्रात ४० टक्क्यांनी म्हणजेच १ लाख ८८ हजार २०० हेक्टरवरून ते २ लाख ६४ हजार ४०० व रब्बीचे, तर ८ हजार हेक्टरवरून ७४ हजार ५०० हेक्टरवर (८३१% वाढ) मक्याचे उत्पादन घेतले जाते. हमी भाव जाहीर करूनही योग्य भाव मिळत नाही. प्रक्रिया उद्योगांचा अभाव आहे. ग्रेडिंग, पॅकिंग, ब्रँडिंगचा अभाव असल्याने उत्पादकांच्या विकासासाठी याचा काहीच उपयोग होत नाही.
- हरभरा : २ लाख २२ हजार ४०० हेक्टरवर हरभऱ्याचे उत्पादन घेतले जात होते. कमी पाण्यात येणारे पीक असल्याने व सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे रब्बीतील गहू आणि ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली असून हरभराच्या क्षेत्रात १६८ टक्क्यांनी म्हणजे ५ लाख ९७ हजार १०० हेक्टरवर हरभऱ्याची विक्रमी पेरणी होते.
- सहकारातून समृद्धी हवी : लोकसंख्येत वाढ झाली. वाटणीत शेतीचे तुकडे झाले. राज्यात ८० टक्के अत्यल्प, अल्पभूधारकांची संख्या आहे. शेती करण्यासाठी स्वत:चे साधन उपलब्ध नाही. एका हंगामासाठी एक एकर शेतीच्या मशागतीसाठी पाच हजारांवर रुपये माेजावे लागतात.
लागवडीसाठी बी- बियाणे, खते, आंतरमशागत, काढणी व विक्री व्यवस्थापनाच्या खर्चात भरमसाट वाढ झाली. यावर मात करण्यासाठी कौटुंबिक समस्या, शेती, विक्री व्यवस्थापनासाठी गट स्थापन करून कामे केलीत, तर निम्म्याने उत्पादन खर्चात बचत होईल. संवादातून समस्याचे निवारण हाेऊ शकेल. कौटुंबिक सलोखा वाढेल. दोन पैसे जास्त मिळतील व घरोघरी अर्थक्रांती नांदेल. यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत.
असा झाला परिणाम...
एकल पीक पद्धतीने शेतीची सुपीकता नाहीशी झाली. सेंद्रिय कर्ब ०.८ टक्क्यांऐवजी केवळ ०.२ टक्केच शिल्लक राहिला. जमिनीचे आरोग्य बरोबर नसल्याने उत्पादन सातत्याने घटले. भात, गहू, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, जवस, कारळ आदी सर्वच धान्यांच्या बाबतीत आपण परराज्यावर अवलंबून राहत आहोत. विशेषत: गव्हासाठी. राजस्थान गहू उत्पादनात अग्रेसर बनला असून औरंगाबादसह महाराष्ट्रात तेथील गहू विक्रीसाठी येताे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरातवर मराठवाड्याची विशेष मदार आहे. गायी, म्हशींचे प्रमाण घटल्याने विकतचे दूध, तूप, दही खरेदी करावे लागत आहे.
रासायनिक खतांच्या माऱ्याने विषयुक्त अन्न निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अन्नसुरक्षेसाठी शेतकरी सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर अवलंबून आहे. कडधान्याचे उत्पादन घटल्यामुळे पोषण सुरक्षेसाठी डाळीच्या आयातीवर विसंबून आहोत. जी पिके कालबाह्य झालीत त्या सर्वच शेतमालाचे भाव गगनाला भिडले आहेत, हे इथे उल्लेखनीय ठरावे.
संताेष देशमुख
बातम्या आणखी आहेत...