आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडवलशाहीचा झटका (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयफोनच्या जगभरातील विक्रीत घट झाल्यामुळे त्याची उत्पादक कंपनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांच्या २०१६ च्या वेतनामध्ये १५ टक्क्यांची कपात केल्याची घडामोड शुद्ध भांडवलशाही तत्त्वाला धरूनच आहे. भांडवलशाहीमध्ये नफ्याची प्रेरणा जशी महत्त्वाची मानली जाते, त्याचप्रमाणे उद्योगातील यश-अपयशाला त्या उद्योगाची धोरणे ठरवणारा व राबवणारा संबंधित प्रमुख किंवा  विशिष्ट कर्मचारी वर्ग यांनाच थेट जबाबदार धरले जाते. ज्याचे माप त्याच्या पदरात घालायचे हेदेखील भांडवलशाहीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. हे तत्त्व अॅपल कंपनीच्या विद्यमान कर्त्याधर्त्यांनी टीम कुक यांच्याबाबत पाळले आहे. या कारवाईमध्ये अमेरिकी सरकारनेही हस्तक्षेप केलेला नाही की कुक यांचीही तक्रार नाही. स्टीव्ह जॉब्ज यांनी काही सहकाऱ्यांसोबत घरगुती संगणक बनवणाऱ्या अॅपल या कंपनीची स्थापना १९७६मध्ये केली. आपल्या संकल्पनांच्या बळावर त्यांनी अॅपलला जी भरारी घ्यायला लावली ती विलक्षणच होती. यश मिळू लागले की तिथे हेवेदावेही असतात. अॅपल कंपनीही यातून सुटली नाही. स्टीव्ह जॉब्ज यांना अॅपलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, त्यामुळे अॅपलला आणखी उतरती कळा लागल्याने पुन्हा जॉब्जना सन्मानाने बोलावून त्यांच्या हाती अॅपलची सूत्रे देण्यात आली. अॅपल कंपनीने जॉब्ज यांच्या नेतृत्वाखाली नवनवीन ‘अाय’ उत्पादनांची निर्मिती करून आपला आलेख चढता ठेवला. ५ ऑक्टोबर २०११ रोजी स्टीव्ह जॉब्जचे निधन झाल्यानंतर मात्र अॅपल कंपनीचा मोठा तोटा असा झाला की संगणक, फोन या क्षेत्रातील उत्पादनांबाबतच्या नवनवीन संकल्पनांचा जादूगार असलेला माणूसच ते हरपून बसले. स्टीव्ह जॉब्जच्या मनात आय उत्पादनांविषयी असंख्य संकल्पना होत्या. तो गेल्यानंतर ती पुंजी अॅपल कंपनीच्या प्रमुखांना आयती मिळाली. त्या संकल्पनांवर अॅपलने आपला कारभार सुरू ठेवला होता. मात्र, कधीतरी या संकल्पना तंत्रज्ञानाच्या रेट्यात जुन्या ठरणार होत्या. त्याची जागा नवनवीन संकल्पनांनी घेणे आवश्यक होते. स्टीव्ह जॉब्जच्या निधनानंतर नेमकी तिथेच अॅपल कंपनी कमी पडत आहे. त्याचा फटका साहजिकच आय उत्पादनांना बसला आहे. आयफोन उत्पादने ही पूर्वीपासून आपली वैशिष्ट्ये जपत आली होती. इतरांप्रमाणे त्यांनी आपल्या वैशिष्ट्यात वारंवार बदल केले नव्हते. पण बाजारपेठेतील रेटाच एवढा मोठा आहे की आयफोनसह अॅपलच्या बाकी उत्पादनांनाही बदलावे लागले. कंपनीच्या वार्षिक विक्रीत १५ वर्षांत पहिल्यांदाच घसरण झाल्याने त्याची गंभीर नोंद अॅपलच्या संचालकांनी घेतली. स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन होण्याच्या दोन महिने आधीच अॅपलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे टीम कुक यांनी स्वीकारली होती. २०११ मध्ये अॅपल कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये २९ टक्के वाढ झाली होती. नफाही चांगला झाला होता. त्यामुळे त्या वर्षी टीम कुकच्या वेतनात उत्तम वाढ झाली होती. २०१६ मध्ये अॅपल कंपनीला तोटा सहन करावा लागल्याने आता कुक यांच्या वेतनातही कपात झाली. 

या निर्णयाविरोधात अमेरिकेमध्ये फारसे बोलले जाणार नाही. अमेरिकेमध्ये जितकी भांडवलशाही सक्रिय आहे त्याच्या पावपटही भारतात नाही. १९९१ मध्ये भारतात आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर २६ वर्षे उलटली, परंतु अद्यापही ही प्रक्रिया रांगतच आहे. ती उभी राहून धावायला लागावी म्हणून काँग्रेस सरकारने जे जोरकस प्रयत्न करायला हवे होते त्या इच्छाशक्तीचा नंतर मनमोहनसिंग यांच्याकडेच अभाव दिसला. या उणिवेवर बोट दाखवत नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचे गाजर दाखवून केंद्रात सत्ता मिळवली खरी; मात्र गेल्या अडीच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेतील सरकारी नियंत्रणे किमान पातळीवर आणण्यासाठी जी जोरकस पावले उचलली जायला हवीत ते धारिष्ट मोदींनी दाखवले नाही. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदींनी जो नोटबंदीचा निर्णय अमलात आणला त्याविषयी अनेक मंडळी साशंक आहेत. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेने भारताची प्रगती  नक्कीच झाली, पण ती अपेक्षित वेगाने कधीच होऊ शकली नाही. ती मिश्र अर्थव्यवस्था मोडीत काढून आर्थिक उदारीकरणाचे पर्व सुरू झाले तरीही भांडवलशाहीची तत्त्वे खऱ्या अर्थाने अंगी बाणवायला भारत अजूनही कमी पडतो आहे. अॅपलच्या अपयशामुळे टीम कुकच्या वेतनात कपात झाली तशी कारवाई भारतातील कंपन्यांतील प्रमुख अधिकाऱ्यांवर होणे सध्या तरी संभवत नाही, हे त्याचेच निदर्शक आहे. भांडवलशाहीच्या तोट्यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी किमान पातळीची सरकारी नियंत्रणे हवीतच. मात्र, भांडवलशाही अधिकाधिक रुजण्याची अपरिहार्यता अटळ आहे. त्या वस्तुस्थितीकडे भारत पाठ फिरवून बसू शकत नाही.
बातम्या आणखी आहेत...