आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजनिष्ठेचा कहर (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघ परिवाराची आणीबाणीच्या काळातील भूमिका ही संदिग्ध व तडजोडीची राहिलेली असूनही प्रत्यक्ष काँग्रेसविरोधी प्रचारात या कालखंडाची आठवण परिवार व भाजपचे नेते वारंवार करून देत असतात. त्यात प्रसारमाध्यमांची गळचेपी व मतस्वातंत्र्याचा संकोच हे मुद्दे तर  भलतेच जिव्हाळ्याचे. संघ परिवाराची लोकशाहीबाबतची मते ही जगजाहीर आहेत. देशाच्या शीर्षस्थानी कणखर वगैरे नेतृत्व (सरसंघचालकांच्या शब्दांत ‘ठेकेदार’) असेल तर देश प्रगतीची घोडदौड करतो, असा (भाबडा) आशावाद ते सातत्याने राजकारणात रेटत आले आहेत. आता देशाचे नेतृत्वच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्था आस्तेआस्ते संघ परिवाराच्या हाती आली आहेच. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकातील बदलापासून देशातल्या सर्व नामवंत शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक संस्थांवर हिंदुत्व विचारसरणीचा ठेका धरणारी मंडळी बसवण्याचा उद्योग गेले तीन वर्षे सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी बी ग्रेड चित्रपटांत व हिंदी मालिकांमधील दुय्यम दर्जाचा एक अभिनेता गजेंद्र सिंग यांना एफटीआयआयच्या प्रमुखपदी नेमून सरकारने हसे करून घेतले. नंतर केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डावर पहलाज निहलानीसारख्या तद्दन गल्लाभरू चित्रपटांच्या निर्माता-दिग्दर्शकाला संचालकपदी बसवून बॉलीवूडमधल्या समंजसांची नाराजी ओढवून घेतली. किंबहुना, मोदींचे समर्थक असलेल्या निर्माता-दिग्दर्शक मधुर भांडारकरांच्या आगामी ‘इंदू सरकार’मध्येही काटछाट सुचवून त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे. पण त्यात नि:पक्षपातीपणा दाखवण्यापेक्षा सत्तेची मर्जी सांभाळण्याचाच हेतू अधिक आहे. निहलानींची चित्रपट माध्यमाविषयीची एकूण समज आणि त्यांच्या हिंदू संस्काराच्या अट्टहासामुळे ते वादग्रस्त ठरले आहेच. (ते स्वत:ला ‘मोदी भक्त’ही म्हणवून घेत असतात.) आता ‘द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ या लघपुटातील ‘गुजरात’, ‘काऊ’ (गाय), ‘हिंदुत्व व्ह्यू ऑफ इंडिया’, ‘हिंदू इंडिया’ हे शब्द निहलानींच्या सेन्सॉर बोर्डाला आक्षेपार्ह वाटू लागले आहेत. हे शब्द आक्षेपार्ह वाटू लागण्यामागची कारणे स्पष्ट आहेत. कारण या लघुपटात २००२च्या गुजरात दंगलीपासून देशातील व जगभरातील वाढत्या धर्मांध लाटेची समीक्षा प्रख्यात अर्थतज्ज्ञ व नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी केली आहे. ही मुलाखत त्यांचे माजी विद्यार्थी व यूपीए-२ सरकारमधील माजी अर्थ सल्लागार कौशिक बसू यांनी घेतली आहे. वर उल्लेख केलेले चार शब्द अमर्त्य सेन यांच्या तोंडी असल्यामुळे सेन्सॉर बोर्डाला ती मोदी सरकारवरची टीका वाटत असावी. वास्तविक सेन यांची कडव्या हिंदुत्वावरची मते जगजाहीर आहेत. त्यांनी या अगोदर अनेकदा सरकारच्या आर्थिक व सांस्कृतिक धोरणांवर मते व्यक्त केली आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या नोटबंदीच्या निर्णयावर त्यांनी आपले आर्थिक मत दिल्यानंतर दुखावलेल्या मोदी यांनी ज्या हार्वर्ड विद्यापीठात सेन शिकवत होते त्या विद्यापीठावर ‘हार्वर्डपेक्षा हार्ड वर्क हे पॉवरफुल्ल असते’ असे टीका कम प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तराला सेन यांनी काही उत्तर दिले नाही, पण मोदींच्या सर्वच क्षेत्रांतील समर्थकांना तेव्हापासून सेन आद्यशत्रू वाटू लागले आहेत. निहलानी व त्यांचे सेन्सॉर बोर्ड त्यापेक्षा वेगळे नाहीत. त्यांना हा लघुपट अडकवण्याची संधी तर मिळालीच, पण आपल्या मालकाची हुजरेगिरी करण्याचेही उद्दिष्ट साध्य झाले. महत्त्वाचे म्हणजे हे चार शब्द का वगळावेत, यावर सेन्सॉर बोर्डकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.  
 
प्रश्न पुन्हा मतस्वातंत्र्याचा उपस्थित होतो, ज्याचा २५ जून रोजी मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये आणीबाणीचा निमित्ताने उल्लेख केला. मात्र, सध्याचे वातावरण त्याच दिशेने जात आहे का अशी आशंका घेण्यास असल्या निर्णयामुळे जागा मिळू लागली आहे. ज्या बौद्धिक वर्तुळातून इतिहासाची मीमांसा वा दाखले दिले जातात त्यावर केवळ समर्थकांकडून नव्हे, तर राजकीय नेते व व्यवस्थेकडून जोरदारपणे आसूड ओढले जातात. गेल्या तीन वर्षांत सरकारचा देशातील बौद्धिक वर्तुळाशी बेबनावच आहे व तो मिटेल अशी शक्यता दिसत नाही. आपल्याला विरोध करणारा काँग्रेसी, डावा, सेक्युलर, समाजवादी, उदारमतवादी असा हल्ला करून पुढच्याचे मत ऐकण्याचीही सरकारची इच्छा दिसत नाही. लोकशाहीत वाद व संवाद आवश्यक असतो, असे सत्ताधारी पक्षाचे नेते जाहीर भाषणात म्हणत असतात, पण प्रत्यक्षात कोणतीच टीका वा मतांतर यांच्याकडून खपवून घेतले जात नाही. प्रशासकीय रचना असो वा अन्य शैक्षणिक-सांस्कृतिक सरकारी संस्था असो, येनकेन प्रकारे कडवे हिंदुत्व रेटण्याचे उद्योग सुरु झाल्याने सरकारची विश्वासार्हता धोक्यात येत आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष या नात्याने निहलानी आपणही त्याच मिशनचा भाग असल्याचे सूचित करत आले आहेत.  इंदिरा गांधींच्या चुका काढणाऱ्यांनी तरी त्यांच्या पावलावर पाऊल टाकू नये.
बातम्या आणखी आहेत...