आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Challenges Before Devendra Fadanvis

अन्वयार्थ - पक्की मांड आणि घोडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवेंद्र फडणवीसांचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. मखमली पायघड्यांखालीही काटे कधी रुततील, सांगता येत नाही. जनतेला दिलेली आश्वासने आणि निवडणूक प्रचारात त्यांनी केलेली भाषणे लक्षात ठेवून जे बोलले, तेच करावे लागेल.

सरकारवरील विश्वासदर्शक ठरावानंतर बाण लक्ष्यभेद करील असे समजायला हरकत नाही. सत्तादेवीच्या पायाशी धनुष्यबाणाच्या टोकावर कमळाचे फूल वाहायला भाजप तयार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी घड्याळात दाखवलेला मुहूर्त साधायची भाजपची मूक तयारी दिसते. नेमके हेच सेनेला नको आहे. आधी महाराष्ट्रातील स्थिती स्पष्ट करा, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाणाची प्रत्यंचा खेचली तर आहे; पण त्यातून बाण सोडायची त्यांचीही फारशी तयारी दिसत नाही.

राज्यात अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कमळ फुलले. ‘शहर शहर बात चली है, पता चला है. चड्डी पहनके फूल खिला है’ म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आले. भाजपचे एवढ्याचसाठी की अजून शिवसेनेचा सत्तेतील सहभाग निश्चित झालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या झाडावर ठेवलेला धनुष्यबाण बऱ्याच उशिराने का होईना बाहेर काढला आणि भाजपच्या दिशेने रोखला आहे. अजून बाणातून तीर साेडलेला नाही. बुधवार, १२ च्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावानंतर बाण लक्ष्यभेद करील असे समजायला हरकत नाही. मात्र, सत्तादेवीच्या पायाशी धनुष्यबाणाच्या टोकावर कमळाचे फूल वाहायला भाजप तयार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी घड्याळात दाखवलेला मुहूर्त साधायची भाजपची मूक तयारी दिसते. नेमके हेच सेनेला नको आहे. आधी महाराष्ट्रातील स्थिती स्पष्ट करा, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाणाची प्रत्यंचा खेचली तर आहे; पण त्यातून बाण सोडायची त्यांचीही फारशी तयारी दिसत नाही. इकडे भाजपही तुटेपर्यंत ताणून धरत आहे -
हे जुने संबंध आता खोल वारासारखे!
सोबतीला फक्त माझे दु:ख यारासारखे!
अशी सेनेची स्थिती आहे; पण तुटेपर्यंत ताणू नये, हे फडणवीसांनी लक्षात घेतले पाहिजे.
देवेंद्र फडणवीसांच्या या सरकारला पक्षांतर्गत धगधगत असलेल्या असंतोषाची, अस्वस्थतेची एक किनारही आहे. ही अस्वस्थता वरवर शांत वाटणाऱ्या डोहासारखी आहे. डोहाच्या खोलीचा अंदाज घेता येत नाही. तसा हा असंतोष आहे. या असंतोषाचे एक टोक म्हणजे एकनाथ खडसे आहेत. ज्या पंढरपूरच्या वाळवंटात अठरापगड जातींच्या संतांनी जाती-धर्मापलीकडे जाऊन सामाजिक समरसता प्रवाहित केली, त्याच पंढरपुरात नाथाभाऊंनी जातीयवादाचे गरळ ओकून इंद्रायणीचे पाणी प्रदूषित केले. बहुजन हा शब्द कितीही व्यापक अर्थाने वापरला, तरीही बहुजन म्हणजे ब्राह्मणेतर हा अर्थ त्यातून स्पष्ट होतो.

सांग, मला दळणा-या जात्या, जात नेमकी माझी!
ज्यांचे झाले पीठ मला, ते कुठले दाणे होते?
पंढरपुरात महसूलमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी जातीच्या नावाने उघड केली. त्या पार्श्वभूमीवर देवेंंद्र फडणवीस यांची कारकीर्द उजळून निघणारी आहे. मंगळवार, ४ रोजी रामगिरी येथे फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देणा-या अठरापगड जाती, धर्माच्या लोकांनी खडसेंच्या विखारी मानसिकतेला सणसणीत चपराक दिली.

प्रशासन चालवण्यासाठी आणि मंत्रिमंडळ हाताळण्यासाठी पकड असणे गरजेचे असते. घोड्यावर स्वाराची मांड पक्की असली की घोडे सुतासारखे सरळ चालते. विशेष म्हणजे स्वाराची पारख घोडाच आधी करतो. घोडे स्वाराची मांड बरोबर जोखते. मांड पक्की नसली की घोडे स्वाराला उधळून देते. माेतदारानंतर घोडे फक्त स्वाराशीच इमानी असते. देवेंद्र फडणवीसांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अनेक महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या सहकाऱ्यांना घेऊन वाटचाल करण्यासाठी आणि नाठाळ नोकरशाहीला वठणीवर आणण्यासाठी फडणवीसांना आधी घोड्यावरची मांड पक्की करावी लागेल. नाहीतर काय होते हे त्यांनाही माहीत असावे.

खातेवाटपावरून मंत्रिमंडळातील सहकारी नाराज असल्याच्या बातम्या सध्या थांबल्यासारख्या वाटत असल्या तरी पुढे त्या झिरपणारच नाहीत, याची हमी कोणीही देऊ शकत नाही. भविष्यातही अशा बातम्या पेरणे सुरू राहू शकते. देवेंद्र फडणवीसांना याचाही बंदोबस्त करावा लागेल. याशिवाय देवेंद्र फडणवीसांचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. मखमली पायघड्यांखालीही काटे कधी रुततील, सांगता येत नाही. जनतेला दिलेली आश्वासने आणि निवडणूक प्रचारात त्यांनी केलेली भाषणे लक्षात ठेवून जे बोलले, तेच करावे लागेल. हमखास गोरेपणा देणारी क्रीम लावून कोणी गोरे होत नाही, हे जनतेलाही कळते; पण निदान क्रीम लावून चेहरा उजळावा एवढी अपेक्षा निश्चितच असते. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारकडूनही जनतेची एवढी अपेक्षा जरूर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारी धोरणाने केलेल्या हत्या आहेत, अशी भाषणे भाजप नेत्यांनी निवडणुकीत केली. शेतमालाला भाव देण्याच्या बाबतीत, लागवडीचा खर्च अधिक ५० टक्के नफा, असा तोडगा काढल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले; पण आज केंद्रात सत्तेवर येऊन सहा महिने होऊनही शेतकरी आत्महत्या करीतच आहेत, हार-तुरे आणि स्वागत-सत्कार स्वीकारण्यात दंग असलेल्या मंत्र्यांना त्याची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही, हे दुर्दैव आहे. "पार्टी विथ डिफरन्स' म्हणताना आणि शिवबाचे नाव घेऊन सरकार चालवताना शेतकऱ्यांप्रति थोडे तरी संवेदनशील राहिले पाहिजे. सरकारी कामासाठी एखादे झाड हवे असेल तर रयतेची परवानगी घेऊन आणि त्याला त्याचा उचित मोबदला देऊनच तोडावे. त्याची इच्छा नसेल तर जबरदस्ती करू नये, हे शिवबाने आज्ञापत्रात लिहून ठेवले आहे. देवेंद्र फडणवीसांचे वाचन चांगले आहे. निदान भाषणासाठी संदर्भ काढण्यासाठी तरी वाचतात. त्यांनी शिवबाचे हे आज्ञापत्रही पुन्हा वाचावे. नमोंच्या आज्ञावलीपेक्षा शिवबाचे आज्ञापत्र शतपटीने चांगले आहे.

घोडा का अडला, भाकरी का करपली, पान का सडलं, तर फिरवलं नाही म्हणून ही कथा सर्वश्रुत आहे. राजकारणातही अनेक अडलेल्या गोष्टी अशा फिरवता आल्या पाहिजेत. २०-२५ वर्षे राजकारणात राहिलेल्या फडणवीसांना ही गोष्ट माहीत नसेल, असे कोणी म्हणणार नाही; पण नोकरशाही अनेक गोष्टी अडवते आणि सामान्य माणसाला म्हणजे शिवबाच्या रयतेला मात्र साध्या साध्या कामांसाठी फिर फिर फिरवते. फडणवीस नोकरशाहीचा अडलेला घोडा फिरवून त्याला पुन्हा गतीने चालायला लावतील, असा विश्वास माझ्या मनात नक्कीच आहे.
घडी आणि शिवसेना
भाजप शिवसेनेसोबत खेळत असलेला खेळ पाहिला की घडी डिटर्जंट पावडरची जाहिरात आठवते. ‘पहले इस्तेमाल करें, फिर विश्वास करे’ हे जाहिरातीचे स्लोगन. सध्या शिवसेनेला लागू होते. कारण विश्वास प्रस्ताव पारित झाल्याशिवाय सेनेला मंत्रिमंडळात
सहभागी करून घ्यायचे नाही, हे भाजपने ठरवले आहे. शिवसेनेने धनुष्य ताणलेले असले तरी त्यात फरक पडलेला नाही. म्हणजे पहले इस्तेमाल आणि नंतर विश्वास आणि पावडर कोणते तर घडी...! हरिश्चंद्र तारामतीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शरदचंद्र बारामती आहे, हेच खरे म्हणायचे.
atul.pethkar@dbcorp.in