आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनम्मा राज!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयललिता यांच्या निधनानंतर ‘एआयएडीएमके’मध्ये कोणाचे वर्चस्व असणार याचे उत्तर अखेर मिळाले. अपेक्षेप्रमाणे जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन यांच्याकडे पक्षाची आणि मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवण्यात आली. यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा तसेच शशिकला यांच्या नेतृत्वाखालील ‘चिनम्मा राज’चा मार्ग मोकळा झाला असला, तरी जयललिता बनण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा कितपत पूर्ण हाेते ते येणारा काळच सांगेल. जयललिता यांचे ५ डिसेंबर रोजी देहावसान झाल्यापासून मुख्यमंत्री पदासाठी शशिकला यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांच्याऐवजी ओ.पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. तथापि, शशिकला यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरूच ठेवली होती. 

अण्णा द्रमुकच्या महासचिव झाल्यानंतर अन्य महत्त्वाच्या पदांवर शशिकला यांनी निकटवर्तीयांची वर्णी लावत मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची काेंडी केली हा त्याचाच एक भाग. अखेर ओ. पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला आमदारांनी मंजुरी दिली. त्यापाठाेपाठ शशिकला या जयललिता यांची परंपरा पुढे नेतील असा विश्वास व्यक्त करीत तामिळनाडूतील सरकार हे नेहमी सर्वसामान्यांसाठी काम करेल, अशी ग्वाही पक्षाने दिली. या ग्वाहीचा अन्वयार्थ असा की, राजकारण हे लाेकांना विश्वासात घेऊन करण्याएेवजी जनतेचं कल्याण कशामध्ये अाहे, हे अाता नेतेमंडळी ठरवू लागली अाहेत. अर्थातच भारतीय राजकारणात अशांचीच भाऊगर्दी वाढत असून जयललिता त्यांच्यासाठी ‘अायडाॅल’ ठरणं स्वाभाविकच. हा मार्ग चाेखाळणं म्हणजे लाेककेंद्रित्वाचा अाभास निर्माण करून नेतृत्वकेंद्री व्यवस्था उभी करणं असं म्हटलं तर असंयुक्तिक ठरणार नाही. जयललितांचा कारभार हा अनिर्बंध अाणि एकाधिकारशाहीने संपन्न असाच हाेता, भारतीय राजकारणातील अन्य नेतेदेखील सत्ता तसेच अधिकाराच्या केंद्रिकरणासाठीच झटत असतात. अशातच ज्यांना संधी मिळाली त्यांना ‘जयललिता’ बनायला का नाही अावडणार? असे असले तरी एकाधिकारशाही राबवण्यासाठी लागणारा संयम, क्षमता अाणि काैशल्य जे जयललितांच्या व्यक्तित्त्वात ठासून भरलेलं हाेतं ते अन्य नेत्यांमध्ये अभावानेच अाढळते. मग ममता बॅनर्जी असाे की मायावती, करूणानिधी, लालूप्रसाद, मुलायमसिंग असाेत की चंद्राबाबू नायडू, प्रकाशसिंग बादल, फारूक अब्दुल्ला ही मंडळी तशी ‘जयललिता इन मेकिंग’च ठरावीत. दुसरा भाग म्हणजे या सगळ्याच नेत्यांनी जयललितांप्रमाणेच स्वत:च्या अस्तित्वासाठी साेयीनुसार हव्या तशा भूमिका बदलल्यात तरीदेखील त्यांना घवघवीत यश मिळवता अालं नाही, तरी अनिर्बंध सत्तेची हाव काही सुटली नाही. अाता या रांगेत शशिकला यांचा समावेश झाला अाहे. जयललिता यांच्यासाेबतच्या अनेक वर्षांच्या सहवासाने त्यांच्यातही अशी असाेशी येणं स्वाभाविकच असलं तरी जयललितांप्रमाणे मतदारांच्या मनात त्या ‘अनभिषिक्त सम्राट’ बनू शकतील का? हा कळीचा मुद्दा अाहे. 

देशातील अन्य मुख्यमंत्र्यांप्रमाणेच जयललिता यांनाही खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरणाच्या परिणामांशी प्रसंगाेपात दाेन हात करावेच लागत हाेते. परंतु लाेक कल्याणकारी राजकारण अाणि थेट लाेकसंपर्कातून घडवलेली स्वत:ची राजकीय कार्यशैली यांचा मिलाफ घडवत राज्यातील स्थिती नियंत्रणात ठेवण्याचा अाटाेकाट प्रयत्न त्या करीत राहिल्या. मात्र अन्य मुख्यमंत्री प्रभावीपणे काम करू शकले नाहीत, त्यामुळे साहजिकच जयललिता इतकी उंची गाठणे अनेकांना शक्य झाले नाही. अाता प्रश्न असा अाहे की, स्वत:च्या शैलीने कल्याणकारी राजकारण करणाऱ्या जयललितांचं काैतुक करायचं की तुलनेने कमी एकाधिकारशाही राबवणाऱ्या अाणि साेशल मीडियाला हाताशी धरून लाेककल्याणकारी इमेज उभी करणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवायचा? अाता शशिकला काेणत्या पठडीत बसू पाहतात ते येत्या काही महिन्यांत कळेलच. कारण हे दाेन्ही मार्ग लाेकशाही मजबूत करणारे नाहीत, हे कदाचित जयललितांच्या सहवासातून त्यांना एव्हाना उमगलेले असावे, असे गृहीत धरायला हरकत नसावी. 

शशिकला यांच्या विराेधकांनी राजकीय तलवारी तूर्त म्यान केल्यामुळे पाठराखण करणाऱ्यांचे तसेच व्यक्तिश: शशिकला यांचे फावले असले तरी नजीकच्या काळात या तलवारी उसळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत, हे तितकेच खरे. कारण शशिकला पुष्पा अाणि त्यांच्या समर्थकांचे सुप्त बंड, जयललिता यांची भाची दीपा जयकुमार हिचा तामिळनाडूच्या राजकीय पटलावर हाेत असलेला उदय या बाबी राज्यातील अन्य अाव्हानांपेक्षा अधिक महत्त्वाच्या ठरतात. शशिकला या अाव्हानांचा कसा मुकाबला करतात त्यावरच चिनम्मा राजचे भवितव्य अाणि ‘जयललिता’ बनण्याच्या त्यांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग निश्चित हाेणार अाहे, हे नक्की!
बातम्या आणखी आहेत...