आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीसांचे अभिनंदन आणि...(अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भाजप आणि संघनायक देवेंद्र फडणवीस यांचे मोकळेपणाने अभिनंदन करावे लागेल. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशी अनेकपदरी आव्हाने समोर असताना भाजपने मिळविलेला हा विजय संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यशासारखे दुसरे काहीच नसते, असे म्हणतात. ते अन्य क्षेत्रांना अगदी तंतोतंत लागू पडत असले तरी दोन अधिक दोन बरोबर चार असा सरळ हिशेब कधीच न जमणाऱ्या राजकीय क्षेत्रात यशालासुद्धा अनेक कंगोरे असतात. त्यानुसार आता मतदारांच्या अपेक्षा वाढल्या असल्याने त्यांच्या पूर्ततेचे अधिक मोठे आव्हान येत्या काळात मुख्यमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. राज्यातील तब्बल १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा हा टप्पा राजकीयदृष्ट्या मोठा तर होताच; पण ही निवडणूक एरवीपेक्षा सर्वार्थाने वेगळी होती. नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट पद्धतीने होणार असल्याने वैयक्तिक करिष्म्यापेक्षा पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आले होते. राज्य सरकारच्या कामगिरीचे बरे-वाईट परिणाम या निवडणुकीच्या निकालांवर दिसतील, असे सांगितले जात असल्याने एकप्रकारे फडणवीस सरकारच्या कारभाराची मध्यावधी चाचणी म्हणूनही त्याकडे पाहिले जात होते. गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेले जंगी मराठा मोर्चे, त्यापाठोपाठ अशाच प्रकारे आयोजित केले गेलेले विविध समाजघटकांचे प्रतिमोर्चे यामुळे सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली होती. दुष्काळ, नापिकी, बाजार समित्यांची नियमनमुक्ती, रोजगारवाढीचा मंदावलेला दर आणि त्यातच नोटाबंदी अशा आर्थिक स्वरूपाच्या अडचणींचा डोंगर समोर होता. त्यातच विरोधकांसोबतच स्वपक्षीयांकडून फडणवीस यांची संधी मिळेल तेथे राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. कोणत्याही निवडणुकीसाठी काहीशी प्रतिकूल म्हणावी अशीच ही पार्श्वभूमी. साहजिकच भाजपला पालिका निवडणुकांमध्ये कितपत यश मिळते त्याबाबत सारेच साशंक होते. परंतु प्रत्यक्ष निकालांत भाजप अन्य पक्षांहून किमान दुपटीने पुढे निघून गेल्याने फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे, यानिमित्ताने आपल्यामागेही मोठा ‘मास बेस’ असल्याचे दाखवून देण्यात फडणवीस यशस्वी झाले आहेत. निवडणुका जेथे झाल्या तो भाग शहरी अथवा निमशहरी होता. अगदी ग्रामीण भागातील जनतेपेक्षा शहरी भागातील प्रश्न, लोकांच्या आशा-आकांक्षा काहीशा वेगळ्या असतात. झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे अगदी सुरुवातीलाच ताडले असावे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत गुंतवणूक असो, औद्योगिकीकरण असो, रोजगारनिर्मिती असो की समृद्धी महामार्गासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असोत, मुख्यमंत्र्यांनी आपला प्राधान्यक्रम त्या दिशेनेच ठेवला. सरकारच्या दोन वर्षांच्या पूर्तीबद्दल ‘दिव्य मराठी’द्वारे केलेल्या शास्त्रीय पाहणीतदेखील सरकारचा तोंडवळा शहरी असल्याचे पुढे आले होते. पालिका निवडणुकीचे निकालसुद्धा नेमके याच मुद्द्याशी साधर्म्य दर्शवणारे आहेत. प्रभागनिहाय निकालांमध्ये भाजप अव्वल असला तरी पक्ष म्हणून खरी कसोटी होती थेट नगराध्यक्षांच्या निवडीत. त्यामध्ये तर या पक्षाने निर्विवाद यश मिळवत अन्य पक्षांना चितपट करून टाकले. याचाच अर्थ शहरी भागातल्या लोकांनी भाजपवर आणि पर्यायाने फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखविला आहे. मोदी ज्याप्रमाणे डिजिटायझेशन, मेक इन इंडिया, कॅशलेस सोसायटी वगैरेच्या माध्यमातून नागरीकरणावर भर देत आहेत त्याच धर्तीवर फडणवीस राज्यात वाटचाल करत आहेत. सर्वसामान्यांना ते रुचत असेल व त्यानुसार ते मतदान करत असतील तर राज्यकर्त्यांची दिशा योग्य असल्याचे म्हणावे लागेल. पण त्याचबरोबर जी आव्हाने वा अडचणी केंद्रात मोदींसमोर आहेत त्यांचाच सामना येथे फडणवीस यांना करावा लागणार आहे. राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती भले कितीही चांगली असो, प्रश्न असतो तो चांगल्या धोरणांच्या अंमलबजावणीचा. ज्या प्रशासनामार्फत ही अंमलबजावणी होते ती यंत्रणा सुधारण्याचे, किंबहुना प्रशासनाच्या कार्यपद्धतीत अामूलाग्र बदल घडवून आणण्याचे सर्वात मोठे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आता असणार आहे. कारण लोकांच्या अपेक्षांमध्येही भर पडणार आहे. या अपेक्षांची पूर्तता कशा पद्धतीने व किती जलद गतीने होते त्यावर लोकांचे समाधान अवलंबून असेल. नगरपालिकांमधील यश हा एक टप्पा झाला. येत्या दोन महिन्यांत पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील दहा प्रमुख महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर पक्षाचा पाया अधिक मजबूत करावा लागेल. केवळ शहरी मतदारांना खुश करून भागणार नाही, तर ग्रामीण जनतेच्या इच्छा-आकांक्षांचाही विचार करून त्यानुसार झटपट निर्णय घ्यावे लागतील. एकुणात, नेतृत्व आणखी खोलवर रुजविण्यासाठी शहरी आणि ग्रामीण हा तोल सांभाळण्याच्या आव्हानाला आता फडणवीस यांना सज्ज व्हावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...