आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Condition Of Urdu Language In Pakistan

पाकिस्तानात उर्दूला धुत्कार, पाकिस्तानमध्ये उर्दूऐवजी इंग्रजीचे वाढते आकर्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युनेस्कोच्या एका अहवालाचा संदर्भ देत दैनिक जंगने म्हटले आहे की, उर्दू ही जगातील दुसरी सर्वात मोठी भाषा आहे. लेखकाचे म्हणणे आहे की, आपणच उर्दूला घालवण्याचा चंग बांधला आहे.

पाकिस्तानातील दैनिक जंगच्या ३० जानेवारी २०१५ च्या अंकात एक धक्कादायक लेख प्रसिद्ध झाला आहे. पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दूच्या संदर्भातील हा लेख आहे. भारताची फाळणी करून पाकिस्तानला काय मिळाले, यावर भारताप्रमाणेच तेथेही अनेकदा चर्चा झडतात. पाकिस्तानातील मूठभर लोक फाळणीबद्दल खेदही व्यक्त करतात. मात्र, पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू ही भारतीय भाषा असल्याने त्यावर वाद घालणे सहसा ते टाळत असतात.

पाकिस्तानच्या निर्मात्यांनी उर्दूला इस्लामशी जोडून टाकले आणि ही भाषा पाकिस्तानशी जोडली गेली. इस्लामच्या नावाने राजकारण करण्यासाठी उर्दूला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला; पण आजही ही भाषा पाकिस्तानातील सर्वसामान्यांची भाषा बनू शकलेली नाही. उलट उर्दूला तेथील अनेक प्रांतांमध्ये धुत्कारले जाते, हे वास्तव आहे. इस्लामचे नाव घेत भारताची फाळणी करून पाकिस्तान बनवण्यात आले आणि नंतर उर्दूलाही धार्मिक बुरख्यात ओढून धर्मांधपणा दाखवला गेला. आज त्याच वृत्तीमुळे पाकिस्तानातील प्रत्येक प्रांतात उर्दूची हेळसांड होताना दिसत आहे. इतकेच नाही, तर शिकलेसवरलेले लोक उर्दूला आपल्या प्रगतीतील धोंडा मानत आहेत. त्यामुळे आज तेथे उर्दू कोणत्या अवस्थेत आहे, यावर दैनिक जंगने लेख प्रकाशित केला.

लेखक आसिफ नागी यासंदर्भात लिहितात, "संरक्षणाशी संबंधित भागातील एका मोठ्या दुकानात आम्ही खरेदीसाठी गेले होतो. तेथे एक चार वर्षांचा मुलगा आपल्या आईसोबत आला होता. आई दुकानदाराशी उर्दूतून बोलत होती आणि आपल्या मुलाशी मात्र इंग्रजीतून. त्याच वेळी त्या मुलाचा पिता तेथे आला. तोही पाकिस्तानीच होता. त्याने आपल्या मुलाशी इंग्रजीतून संवाद केला आणि बायकोला म्हणाला, बच्चे को ऐसे क्षेत्र में मत लाया करो, जहां लोग पंजाबी और उर्दू में बात करते हों. इससे बच्चे की जबान खराब हो जाएगी.'
हे ऐकून लेखकाचे मन व्यथित झाले. ज्यांच्या आई-वडिलांनी पाकिस्तान बनवण्यासाठीच्या आंदोलनात भाग घेतला ते आज आपल्या मुलांकडून राष्ट्रभाषेला धुत्कारले जाताना पाहून काय विचार करत असतील? लेखक म्हणतो की, आमच्या देशात पंजाबी आणि उर्दू बोलणाऱ्यांना गावंढळ समजले जाते, हे वास्तव आहे. परंतु याच्या नेमके उलट सिंध प्रांतात सिंधी आणि बलुचिस्तानात बलुची बोलण्याचा लोकांना अभिमान वाटतो. पाकिस्तान बनवण्यासाठी आंदोलन करताना सर्वसामान्य जनतेला इंग्रजीतून संबोधित केले जात होते काय, असा लेखकाचा प्रश्न आहे. जिना हे उर्दू बोलत नसले तरी उर्दूची सेवा म्हणजेच देशाची सेवा, असे ते म्हणायचे; परंतु आज पाकिस्तानची संस्कृतीच बदलली आहे. प्रत्येकाला इंग्रजीचे आकर्षण आहे.

लेखकाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. चीन, जपान, कोरिया, फ्रान्स आणि अरब देशांनी आपापल्या देशात इंग्रजीचेच शिक्षण दिले काय? तेथील शिक्षण इंग्रजी माध्यमाचे आहे काय? परदेशातील मोठे नेते पाकिस्तानात येतात तेव्हा ते स्वत:च्याच भाषेतूनच संवाद करत नाहीत काय? यासाठी ते अनुवादकांची मदतही घेतात. संपूर्ण जगात जेथे कोठे मेकअप आणि इलेक्ट्राॅनिक साहित्याची निर्मिती होत असेल, ते साहित्य कोणत्या देशात निर्यात होणार त्या देशातील भाषा पॅकिंगवर वापरत नाहीत काय? पाकिस्तानात पर्यटक म्हणून येताना किंवा व्यापार – उद्योगाशी संबंधित संवाद करताना ते स्वत:च्याच भाषेत बोलतात. त्यांची परदेशी भाषा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोच ना? आपण आपल्या भाषेतून त्यांच्याशी संवाद करत नाही, याहून लाजिरवाणी गोष्ट ती काय असेल? ते त्यांची भाषा आपल्यावर लादतात आणि आपण मात्र आपल्या भाषेचा एक शब्द त्यांच्यासमोर उच्चारू शकत नाही, याहून वाईट काय असेल? युनेस्कोच्या एका अहवालाचा संदर्भ देत दैनिक जंगने म्हटले आहे की, उर्दू ही जगातील दुसरी सर्वात मोठी भाषा आहे. लेखकाचे म्हणणे आहे की, आपणच उर्दूला घालवण्याचा चंग बांधला आहे. शिक्षण व्यवस्थेवर दोन भगिनींचा प्रभाव आहे. त्या भाषांतून केवळ ५०० शाळा आहेत; पण या शाळांमध्ये उर्दू बोलायला, लिहायला बंदी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानात एक शाळा अशीही आहे की जिथे उर्दू बोलल्यास विद्यार्थ्यांना दंडित केले जाते.

किती आश्चर्याची गोष्ट आहे पाहा, काही दिवसांपूर्वी जपानमधील सर्व विद्यापीठांमध्ये उर्दूची शताब्दी साजरी झाली आणि पाकिस्तानात मात्र लाेकांना उर्दू बोलायलाही लाज वाटते. लेखक विचारतो, बिचारी उर्दू; अब्दुल हक स्वर्गात काय म्हणत असतील बरं ? जपानच्या टोकियो विद्यापीठात उर्दूतून डाॅक्टरेट होऊन किती तरी विद्यार्थी देश-विदेशात सेवा देताहेत. खूप आधीपासूनच लंडनमध्ये उर्दू शिकण्याची सोय आहे. तेथून डाॅक्टरेट करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. संपूर्ण पाकिस्तानात १६ आॅगस्ट १९८८ पर्यंत उर्दू शिक्षणाची व्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते; परंतु आजही हे काम पूर्ण होऊ शकले नाही. पाकिस्तानच्या राज्यघटनेतील कलम २५१ नुसार उर्दू ही त्यांची राष्ट्रभाषा आहे. १९७३ पर्यंत उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून विकसित होणे अपेक्षित होते; परंतु आजवर तेथील अनेक राज्यांमध्येही उर्दूला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळू शकला नाही.

लेखकाचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशातील उर्दूची स्थिती चांगली आहे. सर्व व्यवहार बंगालीतून होतात, तरीही बांगलादेशात उर्दू चित्रपटांची चलती आहे; परंतु सरकारी कामकाजात मात्र केवळ इंग्रजीचेच साम्राज्य आहे. भारतीय उपखंडात आपला साम्राज्यविस्तार करताना इंग्रजांनी उर्दूचाच आधार घेतला होता. फोर्ट विल्यम काॅलेज आणि १९१८ मध्ये त्यांनी उस्मानिया विद्यापीठाची सुरुवात उर्दू माध्यमातूनच केली होती. त्यातूनच त्यांनी आपल्या साम्राज्याचा पाया भक्कम केला.

उर्दूवर काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा ब्रिटिशांनी तर्क मांडला की, जर टोकियो विद्यापीठात १९३५ पासून वैद्यकीय शिक्षण उर्दूतून देण्यात येते तर भारतात का नाही? भारतात सर्वप्रथम मेडिकल कौन्सिलची स्थापना झाली तेव्हा तिचे माध्यम उर्दूच होते. १८०७ मध्ये कोलकाता मेडिकल काॅलेजात इंग्रजीसोबतच उर्दूतूनही वैद्यकीय शिक्षण देण्यात येत होते. १८५९ मध्ये आॅक्सफर्ड आणि १८६० मध्ये केंब्रिजमध्ये उर्दू माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था करण्यात अाली होती. १०० वर्षांपूर्वी उर्दूतून शिक्षण दिले जात होते तर आज का नाही, असा प्रश्न लेखकाचा आहे. आज तर देशात अनेक तज्ज्ञ अनुवादक आहेत, तरीही उर्दूला का धुत्कारले जात आहे?
m_hussain1945@yahoo.com