आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या बेजबाबदार नेतृत्वाने आयती संधी गमावली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘रोम जळत असताना राजा नीरो फिडल वाजवत होता.’ अर्धेअधिक रोम जळून खाक झाले. ऐतिहासिक तथ्यांच्या खोलात न शिरता प्रतीकात्मक स्वरूपातील बोधकथा म्हणून या पहिल्या शतकातल्या उत्तरार्धात घडलेल्या घटनेकडे बघावे. या घटनेच्या विवेचनावरून दोन गोष्टी समोर येतात. एक म्हणजे नीरो हा अत्यंत बेजबाबदार आणि निष्काळजी होता आणि दुसरी म्हणजे आपत्कालीन परिस्थिती सांभाळायला तो असक्षम होता. अशीच काहीशी परिस्थिती आज काँग्रेसची झाली आहे. 

जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा हा सर्वच विरोधी पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा काळ होता. नोटाबंदीला ५० दिवस पूर्ण होऊन गेले होते. तेव्हा त्याविरुद्ध काँग्रेसने राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याच्या प्रयत्न केला. परंतु आपला मुखियाच आपल्यासोबत नसल्यामुळे आंदोलनादरम्यान कोणत्याही काँग्रेस नेत्यांमध्ये चैतन्य दिसत नव्हते. या आंदोलनाची कोणी फारशी दखलही घेतल्याचे दिसले नाही. राहुल गांधी दरवर्षीप्रमाणे नववर्षानिमित्त परदेशात गुप्त ठिकाणी सुटीवर गेले होते. नोटाबंदीसारख्या निर्णयात अनावश्यक गुप्ततेचा बाऊ केला, अशी टीका करणाऱ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने आपल्या परदेश सहलीत कमालीची गुप्तता पाळून काय साध्य केले, हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. उलटपक्षी पक्षाची हानीच झालेली दिसली. 
पक्षसंघटनेवर जबरदस्त पकड असणाऱ्या इंदिरा आणि सोनिया गांधींचा वारसा राहुलना मिळाला. त्यामुळे राहुल गांधींकडून अधिक कणखर नेतृत्वाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. यूपीए सरकारविरुद्धचा जनाक्रोश त्यांना ओघानेच मिळाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही काँग्रेसी शहाणे झाले नाहीत. जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये त्यांचा सातत्याने पराभव होत गेला. काँग्रेसच्या दुर्दैवाने ही सगळी परिस्थिती सांभाळायला राहुल नीरोसारखेच असक्षम ठरत गेले. परंतु नोटाबंदीचा ज्वलंत मुद्दा उचलून आणि पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करून आपल्या पक्षाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याची संधी असताना परदेश सहलीवर जाऊन त्यांनी आपल्या  निष्काळजी वृत्तीचेही प्रदर्शन केले. 

आजवरच्या काँग्रेसच्या इतिहासात गांधीघराण्यातील कोणाविरुद्ध एक शब्दही उच्चारण्याची हिंमत कोणी केली नव्हती. राहुलविरुद्ध आता पक्षातूनही नाराजी व्यक्त होतेय. प्रियांका गांधींचं नाव पुढे आणण्याची मागणी जोर धरतेय. काँग्रेस पक्षासाठी हा गंभीर संकेत आहे. १५ जानेवारीला पुन्हा चीन दौऱ्यासाठी राहुल जात आहेत. आपल्या पार्टीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाऱ्यावर सोडून कम्युनिस्ट पार्टीच्या निमंत्रणावर राहुल गेल्यास ते त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीच अजून एक उदाहरण ठरेल. 
 
ओमकार शौचे, २५
मास मीडिया, वायसीएमओयू 
इंजिनिअरिंग, मेट, नाशिक