आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पक्षाची समस्या काय आहे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांच्याकडे सशक्त आणि जोमदार असा कुठलाही कार्यक्रम नाही ही त्यांची शोकांतिका आहे. त्यांच्यामध्ये ऊर्जेचा अभाव आहे. गोष्ट दुय्यम, पण खरी बाब अशी की वक्ता म्हणून ते फारच दुबळे आहेत. मोदींनी मनरेगा किंवा आधारसारखे काँग्रेसचे कार्यक्रम जसेच्या तसे वापरले, पण राहुल गांधी यांना तेही लोकांना समजावून देता येत नाही.  
 
या देशातील हा सर्वात जुना पक्ष, पण इतिहासात कधी नव्हता इतक्या वाईट अवस्थेत आहे. त्याला त्याचे पुनरुज्जीवन करताच येत नाही. प्रश्न असा आहे की, आता यानंतर आणखी घसरण होणार आहे की यानंतर एखादा नवा नेता त्याला संजीवनी देणार आहे? नेमका प्रश्न काय आहे ते पाहूया.  

पहिली गोष्ट दिसते ती म्हणजे ती प्रश्नालाच नकार, समस्येलाच नकार. म्हणजे असे की, अशी काही समस्या आमच्याकडे नाहीच आहे, असेच काही काँग्रेसवाले बोलताना दिसतात. अर्थात यामागे दोन कारणे संभवतात. ३४ महिन्यांपूर्वी काँग्रेस देशावर राज्य करत होता आणि काँग्रेसच्या नेत्याने सलग दहा वर्षे राज्य केले होते आणि इंदिरा गांधींचा सत्तरीतला काळ सोडला तर पहिल्यांदा हे घडले होते. जेव्हा असा काळ संपतो तेव्हा साहजिकच असे वाटते की, हे एक क्षणिक आहे आणि कुठल्याही निवडणुकीत पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकेल. दुसरे कारण असे की, एका कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नेहमीच अकार्यक्षम व भाट लोक असतात. जे स्वतः लोकप्रिय नसल्याने त्यांना कोणाला सत्य सांगायचे नसते तसेच जमिनीवरील वास्तवही जाणून घ्यायची इच्छा नसते.  

प्रश्न नेता नाही एवढाच नाही आहे, तर समोर काही कार्यक्रम नाही हा खरा प्रश्न आहे. आता हे खरे आहे की, नरेंद्र मोदी हे एक करिष्मा असलेले नेते आहेत आणि त्याचा अर्थ असा होतो की, असा नेता इतरांमध्ये भक्तिभाव जागवतो. ते संवादकुशल आहे. पण त्यांचे मोठे बुद्धिवैभव आहे ते समस्यांचे सुलभीकरण करणे. ते प्रचंड व्यामिश्र समस्या घेतात आणि त्या सोप्या तसबिरीत मांडून दाखवतात. उदा : ते असे सांगायचे की देशात दहशतवाद फोफावला त्याचे कारण केंद्रातले नेतृत्व कच्चे आहे आणि आपण सत्तेवर आल्यास ते निपटून काढू. आता वास्तव असे आहे की ते सत्तेत असूनही दहशतवाद निपटू शकलेले नाहीत. पण याला विरोध करील असे कोणतेही घटित काँग्रेसकडे नाही. मोदी राजकीय वाद आपल्याला हवे तसे वळवून घेऊ शकतात. इतके की, ज्या गोष्टीचा प्रत्येकावर नकारात्मक परिणाम होणार होता तिच्याही बाजूने त्यांनी लोकांना वळवले.   

राहुल गांधी यांच्याकडे सशक्त आणि जोमदार असा कुठलाही कार्यक्रम नाही ही त्यांची शोकांतिका आहे. त्यांच्यामध्ये ऊर्जेचा अभाव आहे. गोष्ट दुय्यम, पण खरी बाब अशी की, वक्ता म्हणून ते फारच दुबळे आहेत. मोदींनी मनरेगा किंवा आधारसारखे काँग्रेसचे कार्यक्रम जसेच्या तसे वापरले, पण राहुल गांधी यांना तेही लोकांना समजावून देता येत नाही.  

काँग्रेसची तिसरी समस्या आहे ती जमिनीवर झोकून देणारे कार्यकर्ते नाहीत. भाजपकडे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत, जे जमिनीवर राहून काम करतात आणि ते अक्षरशः लाखोंच्या संख्येने आहेत. त्यातले अनेक पक्षावर श्रद्धा ठेवून आहेत किंवा मोठ्या प्रमाणावर प्रेरित आहेत. काही वर्षांपूर्वी आपण स्वातंत्र्यसैनिक ही संज्ञा ऐकायचो. स्वातंत्र्यसैनिक म्हणजे ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढलेले आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढलेल्या व्यक्ती. १९३० च्या दशकात जे जन्मले ते साहजिकच नेहरू आणि इंदिरा यांना मानणारा समाज होता, कारण या पक्षाचा स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंध होता. १९८० च्या सुमारास असे काँग्रेस कार्यकर्ते नाहीसे होऊ लागले आणि आता ते अस्तित्वात नाहीत. काँग्रेसला हिंदुत्व किंवा कम्युनिझमसारखी विचारसरणी नाही. मायावती व ओवेसीसारखे नेते दलित आणि मुस्लिम समाजामध्ये आहेत, तसा दृढ सामाजिक पाया काँग्रेसकडे नाही. काँग्रेसने हात दिल्यावर धावून येतील असे फारच कमी भारतीय आहेत. या वस्तुस्थितीमुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची, अनुयायांची बांधणी स्वतःच्या पैशाने करावी लागते.  

यातून चौथी समस्या उद्भवते ती आहे स्रोतांची. निवडणुकीसाठी रोख रक्कम मिळते, ती रोख रक्कम निवडणुकीच्या राजकारणात दोन प्रकारे येते, एक पक्ष देणग्या गोळा करतो. त्या अधिकृत देणग्या असतात. सदस्यत्व देऊन आलेल्या असतात तसेच भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा उमेदवारांना दिला जातो. हा पैसा राष्ट्रीय स्तरावरच्या जाहिरातीबाजी, प्रवास, मोर्चे इ.साठी वापरला जातो. दुसरा स्रोत असतो तो उमेदवाराकडे असलेला व्यक्तिगत पैसा. आता विधानसभेसारख्या निवडणुकीतही १० कोटी रु. इतकी रक्कम लागते. लोकसभेसाठी ही रक्कम प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. 

काँग्रेस आज पंजाब व कर्नाटक या दोन राज्यांत सत्तेवर आहे. पंजाबात त्यांनी सत्ता मिळवली; पण कर्नाटकात ते पुढच्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये हरतील. या दोन राज्यांतील काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर चालवण्यासाठीचा पैसा उभा करू शकणार नाही.  तसेच ज्यांना काँग्रेसचे तिकीट मिळेल तेही मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करणार नाहीत. कारण जो पक्ष हारतोच आहे त्याच्यावर कोण पैसा खर्च करेल!  

यातून एक सतत घसरगुंडी सुरू आहे. काँग्रेस अनेक राज्यांत हरल्यामुळे तो राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष राहणार नाही. शिवाय ज्याच्यात दोन पक्षच आहेत अशा गुजरातसारख्या राज्यातही तीस वर्षे तो जिंकलेला नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेस पंधरा वर्षे विरोधी पक्ष आहे. तेथे तो कायमच विरोधी पक्ष म्हणून राहणार आहे. ओरिसा, प. बंगाल, उ. प्रदेश, बिहार, तामिळनाडू या राज्यांत तो समर्थ विरोधी पक्ष म्हणून संपलेला आहे.  

अशा परिस्थितीतले पक्ष काही नव्या नेतृत्वाने पुनरुज्जीवित होऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी नवा संदेश हवा, अस्तित्वाला नवे कारण हवे.
बातम्या आणखी आहेत...