आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गोपचारावर भर देणारा अवलिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गाच्याच सान्निध्यात राहून उपचार करता येतात, या विचाराने झपाटलेल्या दशरथ सूर्यवंशी यांनी हमिंग टेबलचे पेटंट मिळवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.
मा नवजातीचीच नव्हे, तर सर्व सजीव पक्षी तसेच प्राण्यांची रचनाच अशा प्रकारची आहे की त्यांच्यावर निसर्गाच्या उपाययोजना चालतात, असा विश्वास निसर्गातील बारीकसारीक घडामोडींचे निरीक्षण व अभ्यास करणारे संशाेधक-अभ्यासक दशरथ सूर्यवंशी यांना वाटतो. मराठवाड्यातच जन्मलेल्या दशरथ सूर्यवंशी यांना निसर्गातील पशू, पक्षी, प्राण्यांच्या हालचाली, त्यांची भाषा अवगत करून घेण्याचा छंद अाहे. लौकिक अर्थाने त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवीचे शिक्षण किंवा कोणता कोर्स केलेला नाही. त्यांचे शिक्षण फक्त ७ वीपर्यंत झाले आहे, पण गेल्या २५ -३० वर्षांपासून विविध संशोधन करून त्यांनी अनेक आजारांवर अॅक्युप्रेशर पद्धतीने उपचार शोधून काढले आहेत. रक्तदाब, हृदयविकार, लकवा, हातापायाचे दुखणे, स्नायू आखडणे, रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण होणे अशा विविध आजार किंवा व्याधींवर नैसर्गिकरीत्या उपचार करून मात करता येते, असा त्यांचा दावा आहे. केवळ नैसर्गिक उपचार पद्धतीवर त्यांचा भर आहे.

मराठवाड्यातील उदगीर जिल्ह्यातील रावणकोळ या गावचे रहिवासी असून १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळात नोकरीच्या शोधात त्यांनी गाव सोडले आणि औरंगाबादला येऊन येथील एका कंपनीत नोकरी करू लागले. नोकरीत असताना त्यांची अंगभूत सुतारकामाची कला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे लाकडापासून विविध प्रकारच्या खेळणी बनवणे, नक्षीदार दरवाजे, विविध देव-देवतांच्या सुंदर आणि सुबक मूर्ती बनवण्याचा दशरथ यांना लहानपणापासूनचा छंद आहे. त्यातून अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी, व्यावसायिकांनी सूर्यवंशी च्या इंटेरिअर डेकोरेटिंगसाठी बनवलेल्या विविध वस्तंूचे व त्यांच्या कामाचे कौतुकच केले; पण फारसे शिक्षण झालेले नसताना त्यांनी शरीरातील रक्ताभिसरण वहन व्यवस्थेचा अभ्यास केला. अापल्या तळपायाच्या मध्यभागी स्किट असतात. त्यात संवेदनशीलता असते. त्याला सुई टोचून किंवा तेथे हॅमरिंग केले तर मेंदूला त्वरित संवेदना पाेहोचतात. या पद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. त्यातून त्यांनी औषधीचा वापर न करता, मानवाला निरोगी ठेवणारा आणि अनेक व्याधींपासून सुटका करणारा लाकडी पलंग तयार केला आहे. या पलंगावर झोपल्यानंतर १० मिनिटांत शांत झाेप लागते. दिवसातून अर्धा तास या पलंगावर झोप घेतल्यास व्याधी कमी होतात. हृदयावर येणार दबाव टळतो, डोक्यात-हातापायात मुंग्या येणे थांबते, असा त्यांचा दावा आहे. आतापर्यंत ६ हजार लोकांनी या पलंगाचा अनुभव घेतला असून याचे रिझल्ट्स चांगले असल्याचे अनेक जण म्हणतात. या पलंगाला त्यांनी हमिंग बेड असे नाव दिले असून याचे सहा महिन्यांपूर्वी कोलकात्यास पेटंटही केले असल्याचे त्यांनी सांगितले.

या पलंगावर झोपून राहिल्यास याच्या कंपन प्रणालीमुळे व वाफेमुळे शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्या कार्यरत होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो. तसेच पचनसंस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होतो. अतिरिक्त वाढलेले वजनही कमी होते, असा त्यांचा दावा आहे. या पलंगावर पूर्ण कंपन प्रणाली सुरू करून अॅक्युप्रेशर रोलवर गुडघे दुमडून पाय लटकते ठेवल्यास त्याला विशिष्ट असा शेक मिळतो. त्यामुळे गुडघे व तळापर्यंत पाय मोकळे होतात, असे त्यांनी सांगितले. या पलंगावर ठेवण्यात आलेल्या लाकडी रोलला अॅक्युप्रेशरची अणकुचीदार टोके असल्याने सूक्ष्म धमन्यांना व मणक्याला अंतर्गत व्यायाम होतो, असे सूर्यवंशी सांगतात. या अॅक्युप्रेशर रोलवर आपले तळहात ठेवल्यास वृद्धापकाळात होणारा कंपवायूचा त्रासही कमी होतो, असे त्यांनी सांगितले. अॅक्युप्रेशर पद्धती नैसर्गिक असल्याने मानवी शरीरावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; पण लोकांना आजाराला तोंड द्यावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. आरामदायी खुर्चीही तयार केली असून त्यावर बसल्यानंतर १० मिनिटांत शांत झोप लागते अाणि तणाव नाहीसा होतो, असेही त्यांनी म्हटले.

आपल्याकडील पारंपरिक कलेचा ध्यास जोपासत असताना त्यांनी काष्ठ शिल्पावरील काेरीव मूर्ती तयार करण्याचे काम अनेक तरुणांनाही शिकवले आहे. आतापर्यंत ३ हजार विद्यार्थ्यांनी या कलेचे शिक्षण घेतले आहे. १९७९ मध्ये दशरथ सूर्यवंशी यांनी पाण्यावर चालणारी लाकडाची चक्की तयार केली आहे. लाकडाचे घड्याळ, पाण्यावर चालणारी रेल्वेही तयार केली आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व प्राण्यांच्या हालचाली व त्यांची भाषा अवगत असल्याचाही त्यांचा दावा आहे. त्यामुळे पशू, पक्षी, प्राणी या नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण व्हावे, यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा दशरथ सूर्यवंशी यांचा मानस आहे.
बातम्या आणखी आहेत...