आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला बोलूया, नैराश्य टाळूया!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक आरोग्य संघटनेने ७ एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला. आरोग्याचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणून नैराश्य या समस्येवर सर्वांचे लक्ष वेधण्याचा कार्यक्रम राबवला. नैराश्य ही मानसिक आरोग्याची समस्या आहे. निराशेला मन व्यापू दिले की माणूस खचतो. स्वप्नरंजनातच जगायची सवय लावून घेतली तर वास्तवात निराशाच वाट्याला येते. प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याला लागणारी इच्छाशक्तीच नाहीशी होते आणि आयुष्य उद्ध्वस्त होते. बालके उत्साहाने आणि आनंदाने बागडत असतात. त्यांच्यासारखीच फुलेसुद्धा कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी सौंदर्य आणि सुगंध यांचा आस्वाद आसमंताला देतच राहतात. म्हणूनच नैराश्याला मुले आणि फुले हा उत्तम उतारा आहे, असे मानले जाते. 

जसजसे वय वाढत जाईल तसतसा वास्तवाशी झगडा जास्त तीव्र होत जातो.  वृद्धापकाळात नैराश्याचा पगडा बसण्याचे प्रमाण अधिक वाढते. निराशेने मन खचू दिले तर ते दुबळे होत जाते. या दुबळेपणाचा शरीरावरही विपरीत परिणाम होऊन ते व्याधींची शिकार बनते. वृद्धांना आता आपल्याला भविष्य उरले नाही म्हणून निराश वाटणे साहजिकच आहे, पण भरतारुण्यातसुद्धा आता आपले भविष्य धोक्यात असल्याची जाणीव होऊन मन विषण्ण होते. म्हणजे वृद्धांना भविष्य नाही म्हणून तर तरुणांना समोर भविष्य भीषण रूप घेऊन उभे असल्याने निराश वाटते. 

खरे तर आपण आवश्यकतेपेक्षा जास्त आत्मकेंद्रित झाल्याचे हे लक्षण आहे. आपण आपले व्यक्तिमत्त्व आपल्या शरीरापुरतेच सीमित करून टाकतो आणि आपल्याप्रमाणेच इतरही दुःखीच आहेत याकडे लक्षही जात नाही. दुसऱ्याचे आसू पुसणे हाही नैराश्यावर उत्तम उतारा आहे. यासाठीच तर नाती-गोती आणि आणि मित्रपरिवार अतिशय उपयोगी पडतात. 

पण भारतात आत्मकेंद्रित लोकांचा भरणा जास्त आहे. त्यामुळे एखादा नैराश्याने ग्रासलेला असेल तर त्याच्यावर हा रडकाच आहे असा शिक्का बसतो. ज्याने त्याने आपले पाहावे हा दृष्टिकोन सार्वजनिक आरोग्याला घातकच आहे. इतरांशी संवाद साधता आला तर नैराश्याचा पगडा मनावर बसत नाही आणि बसला तर त्या संवादाने तो कमी व्हायला लागतो. पण इतरांचे सहानुभूतीने ऐकून घेतले तरच हे शक्य आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने ‘चला बोलूया, नैराश्य टाळूया’ हेच आरोग्य दिनाचे घोषवाक्य म्हणून जाहीर केले. तुमच्याजवळ एखाद्याला आपले मन मोकळे करावेसे वाटणे यात तुमचा फार मोठा सन्मान आहे.  

शरीर आणि इंद्रिये सुस्थितीत राहावीत यासाठी नियमित व्यायामाची गरज असते तर मानसिक संतुलन राखण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान अतिशय उपयुक्त असतात. या सवयी लावून घेतल्या तर आरोग्य उत्तम राहते आणि नैराश्याचा बागुलबोवा आपल्याला घाबरवू शकत नाही, पण विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आपल्यातली आरोग्याकडे लक्ष देण्याची प्रथाच नाहीशी झालेली आहे. दिखाव्याकडे आणि भपक्याकडे आकर्षित होण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे तरुणाई जिमकडे वळलेली आहे. त्या व्यायामाने शरीर गोटीबंद दिसते हे खरे, पण मनाच्या घडणीला पुरेसे महत्त्व दिले जात नसल्याने तरुणांमध्येसुद्धा नैराश्याचे आणि मानसिक संतुलन सुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

आम्हाला घरी लावल्या गेलेल्या शिस्तीमध्ये सकाळी लवकर उठून व्यायामशाळेत जाणे सक्तीचे असे. तिथेसुद्धा मल्लखांब आणि योगासने या गोष्टी शिकाव्याच लागल्या. कारण ते केल्याशिवाय पोहायला मिळत नसे. त्या वेळी याबद्दल खूप राग येत असे, पण पुढल्या ५०/६० वर्षांच्या आरोग्याचा भक्कम पाया त्यामुळे घातला गेला.  आम्ही हैदराबादला हनुमान व्यायामशाळेत जात असू. आपली शक्तीची आणि आरोग्याची देवता हनुमान हीच आहे. आता ११ एप्रिलला हनुमान जयंती आहे. तो आपण आरोग्य दिन म्हणून का पाळू नये? दर शनिवारी संध्याकाळी व्यायामशाळेत हनुमानाची पूजा होई. आमचे ख्रिस्ती आणि मुस्लिम शिक्षक आणि मुलेमुलीसुद्धा प्रार्थनेत सहभागी होत. 

शिस्तीत रांगेत उभे राहत आणि पूजा झाल्यावर प्रसादसुद्धा घेत. धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला त्या व्यायामशाळेत बालपणीच गिरवायला मिळाले. दुसऱ्यांच्या धर्मकल्पनांचा आदर करण्याने आपल्या धर्माला बाधा येत नाही हे शिकता आले. पुढे त्याचा पोलिस खात्यातल्या नोकरीत खूपच उपयोग झाला. आमची आई आणि शेजारपाजारच्या मावशी-काकू या हनुमानाला प्रदक्षिणा घालण्याचे व्रत करत असत. त्यामुळे त्या जवळजवळ सगळ्याच दीर्घायुषी झाल्या आणि त्यांच्या आशीर्वादाचे आणि कौतुकाचे भाग्य आमच्या वाट्याला जास्त वर्षे येऊ शकले. 

हनुमान ही नुसतीच पहिलवानांची देवता नाही. तो जितेंद्रिय आहे. बुद्धिमंतांमध्येसुद्धा वरिष्ठ आहे. म्हणून तर तो रामाचा सेनापती झाला. रावणाविरुद्ध युद्ध जिंकण्यात त्याचा खूप मोठा हातभार होता. स्वतः सर्वात शक्तिमान असूनही त्याचे आयुष्य रामाला समर्पित होते व त्याने चिरंजीवित्वाचा वर मिळवला. स्वामी रामदासांनी भीमरूपी स्तोत्रात, मनालाही आपल्या गतीने हनुमान मागे टाकू शकतो आणि त्याच्या पराक्रमाची तुलना केली तर मेरुमांदार हे जगातील सर्वात उंच पर्वतसुद्धा लहान ठरतील अशी त्याची स्तुती केलेली आहे. या बळाच्या देवतेची उपासना म्हणजे नुसतीच पूजा, आरती नाही, तर सूर्यनमस्कार आणि योगासनांचे व्यायाम यांचासुद्धा त्या उपासनेत समावेश आहे.  

जागतिक आरोग्य दिनाच्या व हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राखण्याचा संकल्प करूया. म्हणजे उज्ज्वल भविष्याची आपल्याला आशा करता येईल.
- भीष्मराज बाम, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ
बातम्या आणखी आहेत...