आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article About Devendra Fadnavis Government 100 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या सरकारची शंभरी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी बर्‍याच राजकीय गदारोळानंतर शपथविधी पार पडलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारला आज १०० दिवस पूर्ण होत आहेत. राज्यात तब्बल १५ वर्षांनी सत्ताबदल झाला आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील पहिलेच सरकार ठरले. पहिले १०० दिवस संपले, याचा अर्थ आता नवेपण संपले. आता खरी कसोटी सुरू झाली आहे. या शंभर दिवसांकडे तटस्थपणे पाहिल्यास असे दिसते की, महाराष्ट्रातील समस्यांचा डोंगर डोक्यावर घेऊनच सरकार सत्तेवर आले होते. पाठोपाठ गारपिटीने राज्याला झोडपून काढले. त्यामुळे शेतकर्‍यांना मदत जाहीर करणे भाग पडले. पण राज्याची तिजोरी रिकामी असल्याची जाणीव प्रकर्षाने झाली. या प्रश्नी श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी घोषणा झाली आणि त्यानंतर राज्यावरील कर्जाचे आकडे प्रसिद्ध होत राहिले. मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण एकदम वाढले आणि सरकारला त्या प्रश्नावर बोलणे भाग पडले. मात्र त्याचा सामना कसा करावा, हे सरकारच्या अजूनही लक्षात आलेले नाही. शहरी भागही गेली काही वर्षे खदखदतो आहे.

व्यापार्‍यांना एलबीटी नको आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे संकट पुढे येऊ घातले आहे. तर टोलनाके चालूच राहणार हे कटुसत्य सरकार आणि जनतेला पचवावे लागले आहे. प्रामुख्याने अशा आर्थिक प्रश्नांना गेल्या १०० दिवसांत सरकार सामोरे गेले आहे. फडणवीस सरकारचा कामाचा धडाका अपेक्षेप्रमाणे नसला तरी काही महत्त्वाचे निर्णय या काळात घेतले गेले. त्यात सरकारने शेतकर्‍यांना दिलेली मदत, पाच हजार गावांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी जलयुक्त शिवारसारखे ठळक उपक्रम, ‘मेक इन महाराष्ट्र’ सारखे सुरू असलेले प्रयत्न, शिक्षण संस्थांना वाढीव एफएसआय, जमिनीच्या व्यवहारांत पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न आणि ‘सीएमओ’ हा प्रशासकीय बदल, या निर्णयांचा उल्लेख करता येईल. पारदर्शकता, कार्यतत्परता आणि सर्वसमावेशकता या त्रिसूत्रीवर मुख्यमंत्र्यांचा भर असणार आहे, असे सांगण्यात येत आहे आणि त्यानुसार काही निर्णयही होताना दिसत आहेत, हे फडणवीस यांचे यशच म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांना अनुभव नाही, मंत्रिमंडळात एकमत नाही, असा राजकीय खोडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अतिअनुभवी नेत्यांनी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आरोपांना कोणी फारसे महत्त्व दिले नाही. अर्थात भाजप नेत्यांत जी धुसफूस चालली आहे, ती सरकारच्या प्रतिमेला अजिबात शोभणारी नाही. विरोधक म्हणून केलेल्या गर्जनांना फडणवीस प्रत्यक्षात कसे आणि कधी आणणार, यावर जनतेचे लक्ष आहे.