आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात प्रियंका-डिंपलची जोडी चमत्कार घडवणार का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीमधी निवडणूक प्रचारात दिसणाऱ्या प्रियंका गांधी आता उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरत आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकप्रियतेने धास्तावलेल्या काँग्रेससाठी हा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो. आजवर फक्त रायबरेली आणि अमेठीत सक्रिय असलेल्या प्रियंका प्रचारात सक्रिय झाल्या तर भाजप आणि बसपाच्या अडचणी वाढतील हे निश्चित. याची अनेक कारणे आहेत. 

पहिले म्हणजे राजकारणात फार सक्रिय नसतानाही त्या नेतृत्वास पात्र मानल्या जातात. जनतेत वेळोवेळी त्यांच्याबाबत उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे. दुसरे म्हणजे रायबरेली आणि अमेठीत त्या स्वबळावर निवडणूक जिंकत आल्या आहेत. तिसरे म्हणजे जनता त्यांच्यामध्ये इंदिराजींची कल्पना करतात. इंदिरा गांधींप्रमाणे त्या जनतेत फार पटकन मिसळून जातात. संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकतात.  चौथे-  बहुतांश काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींऐवजी प्रियंकांकडे नेतृत्व देण्याची मागणी करत असतात.   प्रियंकांच्या या सर्व गुणवैशिष्ट्यांसह सपा आणि काँग्रेसच्या युतीत सक्रिय भूमिका निभावणाऱ्या डिंपल यादव यांची भर पडल्यास ही जोडी निवडणुकीची समीकरणेच बदलू शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतीय राजकारणात महिलांचा दबदबा. इंदिरा गांधी, मायावती, जयललिता ही यशस्वी उदाहरणे आहेत. सध्या चार मोठ्या पक्षांची धुरा महिला सांभाळत आहेत. त्यामुळे प्रियंका- डिंपल यांची जोडी निदान महिला मतदारांवर प्रभाव टाकू शकेल हे नक्की. या दोघी एकत्र आल्यास महिला सबलीकरणाचा मोठा मुद्दा हाती घेता येईल. पण त्यांचे पक्ष याबाबतीत गंभीर आहेत का, हा खरा प्रश्न आहे.  

मोठ्या पक्षांनी महिलांना ३३ टक्के भागीदारी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे, मात्र त्यावर अंमलबजावणी अजून दूरच आहे. विशेष म्हणजे प्रियंकांच्या काँग्रेसमध्ये ९१ पैकी ०८ महिला उमेदवार आहेत, तर डिंपल यांच्या समाजवादी पार्टीत आतापर्यंत फक्त २४ महिला उमेदवारांची घोषणा केली आहे, हा खूप मोठा विरोधाभास आहे. भाजपने ३६, तर मायावतींनी ४०३ पैकी १८ महिलांना संधी दिली आहे. घोषणापत्रात महिला सबलीकरणाचा मुद्दा मांडणारे पक्ष वास्तवापासून कोसो दूर आहेत, हेच यावरून दिसून येते. पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या महिलाच महिलांना संधी देण्यास का घाबरतात? महिलांचा वाटा आणि महिला सक्षमीकरणाचे मुद्दे कुठवर चर्चा आणि सेमिनार्समध्ये अडकून राहतील? प्रियंका आणि डिंपल यांच्या जोडीकडे आता महिला सबलीकरणाच्या संकल्पनेस योग्य दिशा देण्याची सुवर्णसंधी आहे. स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही केवळ दुर्लक्षामुळे महिलांची ही स्थिती आहे, ही बाब त्यांनी विसरू नये. त्यामुळेच या दोन तरुण महिला नेत्यांनी आपल्या हाती आलेली संधी अजिबात दवडू न देता तिचे सोने केले पाहिजे.
 
रिझवान अन्सारी, २५
जामिया मिल्लिया इस्लामिया, नवी दिल्ली 
बातम्या आणखी आहेत...