दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान(एम्स)चे पॅथॉलॉजी विभागातील प्रा. डॉ. अमितेशकुमार डिंडा यांचे विद्यार्थिदशेपासून एकच उद्दिष्ट होते, देशासाठी स्वस्त चिकित्सा पद्धती व्यवस्थेचा विकास झाला पाहिजे. त्यातही त्यांचा स्वस्त लस तयार करून रोगावर प्रतिबंध आणण्यावर भर होता. यासाठी त्यांनी पॅथॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर कॅन्सर बायोलॉजी हा विषय संशोधनासाठी निवडला. शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेचा खोलवर अभ्यास करता यावा, असा उद्देश यामागे होता. त्यांचे सर्व कार्य रोगप्रतिबंधक विज्ञान, पेशीशास्त्र, जैव पदार्थ आणि नॅनो मेडिसिनवर झाले आहे. नॅनो मेडिसिनमध्येही त्यांचे सर्व प्रकल्प नॅनो कणांच्या माध्यमापासून औषधे पोहोचवणाऱ्या आणि डीएनए डिलिव्हरी सिस्टिमशी संबंधित होते. भारतात स्वस्त आणि उपयोगी उपचार व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने त्यांनी नॅनो इंजिनिअरिंगवर भारत-अमेरिका कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यांच्या संशोधन कार्यात त्यांच्यासमोर वारंवार एकच तथ्य येत होते की, देशात हिपॅटायटिस बीच्या संक्रमणामुळे विविध आजार झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी इतकी आहे, तर दरवर्षी १ लाख रुग्ण लिव्हर सिरोसिस, लिव्हर कॅन्सर आणि हिपॅटायटिस व्हायरसमुळे लिव्हर खराब होण्याने मृत्युमुखी पडतात. त्यांचा भर रोगप्रतिबंध करण्यावर असल्याने त्यांनी लसनिर्मितीवर जास्त लक्ष दिले. आता इंजेक्शनद्वारे दिली जाणारी लस उपलब्ध आहे. ही लस अनुक्रमे एक आणि सहा महिन्यांनंतर दोन बुस्टर इंजेक्शन द्यावे लागतात. भारतातील लोकसंख्या प्रामुख्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय इंजेक्शनने लस देणे जोखमीचे आहे. इंजेक्शन जंतुविरहित केले नाही, तर हिपॅटायटिससह एचआयव्ही होण्याचा धोका जास्त आहे, तरीसुद्धा एकही बुस्टर डोस चुकला तर लशीचा कोणताही परिणाम जाणवत नाही. अशा विविध समस्यांमुळे हिपॅटायटिस बीचा प्रसार थांबवण्यात अपयश येत होते. अशा प्रकारच्या समस्या टाळून लस तयार करण्याची गरज डॉ. डिंडा यांना वाटू लागली. यावर एकच उपाय म्हणजे तोंडावाटे दिली जाणारी लस तयार करणे. डिंडा यांच्या नेतृत्वाखाली एम्सच्या संशोधकांनी कामास सुरुवात केली. याच वर्षी ओरल हिपॅटायटिस बी लस शोधून काढण्यात यश मिळाले. नॅनो इंजिनिअरिंगपासून विकसित झालेल्या या तंत्रज्ञानाचा प्रयोग उंदरावर करण्यात आला. तोंडावाटेही दिली जाणारी लस २ ते ६ तासांत लिम्फ नोडमध्ये पसरते. यामुळे शरीरात रोग प्रतिबंधक कण पसरतात. येत्या ५ वर्षांत ही लस बाजारात येण्याची अपेक्षा आहे. या लशीचा वापर टीबीच्या नव्या प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी करता येऊ शकतो.