आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्यविकासाचा प्रारंभ शाळेतून!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील सरकारी तसेच खासगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांत दिल्या जाणाऱ्या शिक्षणांतून केवळ पढतपंडित तयार करण्यापेक्षा त्यांना कौशल्याधारित अभ्यासक्रमही शिकविले जावेत याकडे शिक्षणधुरीणांचाही कल आहे. देशामध्ये उच्चविद्याविभूषितांबरोबरच कौशल्याधारित कामे करणा-या लक्षावधी लोकांचाही एक वर्ग आहे. या दोन्ही स्तरांतील लोकांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शालेय शिक्षणस्तरापासूनच काही बदल आवश्यक आहेत.
कौशल्य व उद्यमतेचा विकास मुलांमध्ये व्हावा यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रमांवर आधारित शिक्षण देणाऱ्या सुमारे २५०० शाळा देशभरात सुरू करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा विचार असून त्यावर येत्या काही दिवसांतच ठोस निर्णय घेतला जाईल. या शाळा सरकारी व खासगी क्षेत्रातील सहकार्यातून उभारण्यात येणार आहेत. मोदी सरकार विकसित करीत असलेल्या स्मार्ट सिटींमध्ये उद्यमविकासाला चालना देणा-या उच्च शिक्षणसंस्था उभारण्यात येणार आहेत.
कौशल्य व उद्यमतेचा विकास हा केवळ शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील अभ्यासक्रमांचाच केंद्रबिंदू राहील असे नाही, तर देशातील पूर्वांचल राज्यांसह प्रत्येक विशिष्ट ठिकाणी कौशल्याधारित अभ्यासक्रमांमध्ये अधिक प्रगत शिक्षण देणारी विद्यापीठे स्थापन करण्याचा विचार आहे. अाता प्रश्न असा उभा राहतो की, विविध उद्योगसमूहांना कुशल कामगार उपलब्ध व्हावेत म्हणून खूप आधीपासून स्थापन करण्यात आलेल्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्सचे (आयटीआय) या नव्या प्रक्रियेत नेमके काय स्थान असणार आहे? सध्या देशभरातील आयटीआयची अवस्था फारशी चांगली नसून त्यांच्या कार्यशैलीत सुधारणा करण्यात येऊन त्यांना या कौशल्याधारित शाळा, शिक्षणसंस्था, विद्यापीठे यांच्याशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)मधून शिकलेल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना स्वविकासासाठी खूप मोठ्या संधी उपलब्ध होतात. पण कुशल कामगार तसेच लघु-मध्यम उद्योजकांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी यापुढे जाणीवपूर्वक निर्माण कराव्या लागतील. याचे नेमके भान मोदी सरकारने राखून शालेय स्तरापासून कौशल्यविकासाला अग्रक्रम द्यायचे ठरविले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रत्येक केंद्र सरकारने कौशल्यविकासासाठी काही चांगला विचार केला म्हणून देशाची दखलपात्र प्रगती होऊ शकली. त्यापुढची चार पावले मोदी सरकार चालणार आहे इतकेच.