आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायतळीचा अंगार (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सांगलीतील स्त्री भ्रूणहत्येचे प्रकरण जागतिक महिला दिनाच्या आसपासच उघडकीस यावे, हा योगायोगच. या दोन घटनांचा परस्परांशी काहीही कार्यकारणभाव नाही, संबंध नाही आणि तरीही या योगायोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एकविसाव्या शतकातले सतरावे वर्ष सुरू आहे. प्रगत समजल्या जाणाऱ्या भारतातील एक विकसित राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे प्रकरण घडावे, याचे अनेक अर्थ निघतात. एक, मुली अजूनही नकोशा आहेत. दोन, पोटातला गर्भ मुलीचा आहे हे ओळखता येणारे तंत्रज्ञान कायदा धाब्यावर बसवत सर्रास उपलब्ध हाेत आहे. तीन, याच कायद्याकडे दुर्लक्ष करून वैद्यकीय क्षेत्रातील कुशल/अकुशल मंडळी बेधडक गर्भपाताच्या शस्त्रक्रिया करत आहेत. चार, ज्या मातांचे गर्भपात केले जातात त्या याविरुद्ध दाद मागू शकत नाहीत किंवा त्यांना हे कृत्य त्याविरुद्ध आवाज उठवण्याएवढे चुकीचे वाटत नाही. यातून कायदा जास्त महत्त्वाचा वाटू शकतो, परंतु आपली, या राज्यातील सर्व नागरिकांची मागासलेली, रूढीवादी मानसिकता त्याहून अधिक महत्त्वाची आहे. 

स्त्री मुक्ती संघटनेतर्फे सादर केले जाणारे ‘मुलगी झाली हो’ हे क्रांतिकारी नाटक तीस वर्षांहून अधिक जुने आहे. त्याचे हजारो प्रयोग आजवर झाले. त्यातले शंभर टक्के संवाद आजच्या समाजाला जसेच्या तसे लागू पडतात. म्हणजे आपण तीस वर्षांत बदललो नाहीच का? की आपली लोकसंख्याच इतकी अफाट आहे की बदल घडला तरी तो दिसायला शतके लोटावी लागतात? वरवरचे बदल खूप घडलेत. नऊवारीची जागा पाचवारीने घेतली, पाचवारीची जागा ज्या सलवार-कुडत्याने घेतली, त्याची जागाही जीन्स-टीशर्ट घेऊ पाहताहेत. अधिक स्त्रिया नोकरी करू लागल्यात, अधिक स्त्रिया स्वत: उद्योजक बनून नोकऱ्या निर्माण करू लागल्यात. पण तरीही त्यांचे पगार मात्र पुरुषांच्या पगाराच्या ७५ टक्केच असतात, काम सारखेच असले तरीही. 
मुलींचे शिक्षणाचे प्रमाण जरूर वाढले आहे, परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली अजूनही मुलग्यांच्या मागेच आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी अशा क्षेत्रांमध्ये जाण्याची इच्छा मुलींनी दाखवली तर ती हाणून पाडण्याकडेच आजही कल दिसून येतो. त्यांनी मोबाइल वापरू नये, घराबाहेर पडू नये, जीन्स घालू नये, असे फतवेयुक्त आदेश वेळोवेळी निघतच राहतात. आणि तरीही, या सगळ्या विपरीत परिस्थितीच्या नाकावर टिच्चून मुली शिकत आहेत, महत्त्वाकांक्षा बाळगत आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार मेहनतही घेत आहेत. एअर इंडियाने महिला दिनाचे औचित्य साधून एका विमानाचे उड्डाण व प्रवासात सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल असा उपक्रम नुकताच यशस्वीपणे राबवला, त्यात वैमानिकापासून जमिनीवरच्या तंत्रज्ञांपर्यंत महिलाच होत्या हे विशेष. महिला दिन हा समारंभ झाला आहे, त्याचा चंगळवादी कंपन्यांनी इव्हेंट केला आहे, अशी टीका गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कानावर पडू लागली आहे. इव्हेंट झाला असेलही. पण या निमित्ताने एअर इंडियासारख्या स्फूर्तिदायी महिलांच्या कथा समाजासमोर येतात, खेडोपाडी अनवाणी मैलोन् मैल चालत शाळा गाठावी लागणाऱ्या मुलींना या कथा दिशा देतात. त्यांनी वैमानिक व्हायचे स्वप्नेच पाहायची आवश्यकता नसते. अनेक वर्षे पुरुषांची मक्तेदारी असलेली इतकी सारी कामे, ज्यांत शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य, सामर्थ्य, सहनशक्ती, परिश्रम, शारीरिक व मानसिक क्षमता आदी गुणांची आवश्यकता असते, ती क्षेत्रे त्यांच्यासाठी मोकळी होतात, दिशादर्शक ठरतात. एखादे काम पूर्ण करायचे म्हटले की, बाकी सगळ्या चिंता मागे सारून फक्त त्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागते. तरच विमान उडवणे शक्य होते, कल्पनेतले नव्हे, खरेखुरे. घर, स्वयंपाक, नातलग, सणसमारंभ, इतर प्रापंचिक जबाबदाऱ्या म्हटल्या तर पुरुषांवर असतातच की, परंतु त्या त्यांच्या अर्थाजर्नाच्या आड येताना दिसत नाहीत.

आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी या गाेष्टी काही काळासाठी मागे टाकाव्या लागतात, समाज काय वाट्टेल ते म्हणो, ही धारणा स्वीकारावी लागते. हे सगळे धडे अशा महिला दिनानिमित्तच्या वैशिष्ट्यपूर्ण, कर्तृत्ववान महिलांच्या कहाण्यांमधून मिळत असतात. एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, ही स्थिती काही निव्वळ कुसुमाग्रजांच्या मनातल्या क्रांतिकारकासमोरची नव्हे. आजच्या युगातली प्रत्येक स्त्री अशाच पायतळीच्या अंगाराला  सामोरी जात आहे. मात्र त्याला न जुमानता, त्या समोरच्या लखलखणाऱ्या ताऱ्याच्या दिशेने  तिचा धैर्याने प्रवास सुरू आहे, हा अंगार कमी झाला तर कदाचित तिच्या त्या प्रवासाची खुमारी कमी होईल.
बातम्या आणखी आहेत...