आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About First Prime Minister Pandit Jawaharlal Nehru

आदरांजली : पं. नेहरू : ध्येयवादी व द्रष्टे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - नवी दिल्ली येथील लोकप्रशासनाच्या नव्या इमारतीचे उद‌्घाटन प्रसंगी राष्ट्रपतीसमवेत पंडित नेहरु.
आधुनिक भारताचे शिल्पकार पं. जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंती आज देशभर साजरी होत आहे. त्याचे औचित्य साधून त्यांच्या कर्तृत्वाची मीमांसा करणारे तीन लेख आम्ही देत आहोत.

पंडित जवाहरलाल नेहरूंना संस्था उभ्या करणे आणि त्यांना जोपासणे याचा जणू काही छंदच होता. त्यामुळे देशात विविध क्षेत्रांतील संस्थात्मक पायाभरणीच्या कामात त्यांनी स्वतः विशेष लक्ष घातले होते. देशाला मागासलेल्या अवस्थेतून पुढे नेण्यासाठी आवश्यक अशा संस्थांची उभारणी करण्याकडे नेहरूंचा कल होता. आज ज्या अनेक संस्था त्यांच्या गुणवत्तेसाठी आणि देशाच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी ओळखल्या जातात त्यांची पायाभरणी नेहरूंच्या काळात झालेली आहे. अशा संस्थांची जर यादी करायची झाली तर ती बरीच मोठी होईल. नेहरूंच्या संस्थात्मक उभारणीच्या कामाला कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्राचे बंधन नव्हते. त्यांना राजकारणापासून ते संस्कृत वाङ््मयापर्यंत अनेक विषयांत रुची आणि गती दोन्ही होती. त्याचेच प्रतिबिंब त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांमध्येही दिसून येते. त्यामुळेच नेहरूंच्या काळात अर्थकारणापासून ते साहित्यापर्यंत अनेकविध क्षेत्रांत संस्था उभ्या राहिल्या.

स्वातंत्र्योत्तर भारत कसा असावा याविषयी नेहरूंनी फार पूर्वीपासूनच विचार सुरू केलेला होता. देशाच्या जडणघडणीच्या दृष्टीने उपयुक्त अशी माणसे निवडणे आणि त्यांच्या क्षमतांचा देशासाठी उपयोग करून घेणे यावर त्यांचा कटाक्षाने भर होता. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासूनच नेहरूंचा डॉ. होमी भाभा, व्ही. के. आर. व्ही. राव, डी. एस. कोठारी, एम. विश्वेश्वरय्या, धनंजयराव गाडगीळ अशांशी संपर्क होता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी या माणसांना महत्त्वाच्या जबाबदा-यांबरोबरच कामाचे स्वातंत्र्य दिले. त्यापैकी डॉ. होमी भाभांच्या नेतृत्वाखाली भारताने अणु संशोधनात प्रगती केली, कोठारी विद्यापीठ अनुदान आयोग (यू.जी.सी) चे अध्यक्ष बनले, तर गाडगीळ पुढे १९६७ मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बनले. नेहरूंनी स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाहीची पायाभरणी केली हे तर सर्वश्रुत आहे. त्यांनी केवळ लोकशाहीच्या संस्था उभ्या केल्या असे नव्हे, तर त्या जोपासल्या, तिथे वागायचे कसे, बोलावे कसे याचे मापदंड स्वतःच्या वर्तनातून सतत घालून दिले. त्यांनी वेळोवेळी दिलेली भाषणे, मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रे, वर्तमानपत्रांना दिलेल्या मुलाखती हादेखील अशा लोकशिक्षणाचाच भाग होता. ते दिल्लीत असताना नियमितपणे लोकसभेत जात असत आणि अनेकदा खासदारांची भाषणे तासनतास बसून ऐकत असत.

स्वातंत्र्योत्तर भारतात पहिली दोन दशके काँग्रेस पक्षाचे वर्चस्व इतके होते की ज्याला रजनी कोठारींनी ‘काँग्रेस व्यवस्था’ असे नाव दिले ती व्यवस्था इथे अस्तित्वात आली होती. या काँग्रेस व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे डावे-उजवे-मधले असे विविध विचारप्रवाहांचे कार्यकर्ते त्या वेळेस काँग्रेसमध्ये होते. नेहरूंचा स्वतःचा जाती-धर्मावर आधारित संकुचित राजकारणावर विश्वास नव्हता. त्याचेच प्रतिबिंब पक्षात पडलेले दिसून येते. नेहरूंच्या काळात पक्षात अंतर्गत निवडणुका नियमितपणे होत असत. नेहरूंनी काँग्रेस पक्ष देशात सर्वव्यापी केला.वेगवान आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञ आणि व्यवस्थापक लागतील हे ओळखून त्यांनी देशात आय.आय.टी. आणि आय.आय.एम.ची उभारणी केली. मात्र, तंत्रशिक्षणात प्रगती करीत असताना मूलभूत वैज्ञानिक संशोधनाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी टाटा मूलभूत वैज्ञानिक संस्थेचीही (TIFR) मुंबईमध्ये स्थापना केली होती. त्याचप्रमाणे एकूण विद्यापीठीय शिक्षणाचे नियमन करता यावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

देशाच्या आर्थिक विकासाला दिशा देण्यासाठी त्यांनी १९५० मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली (जो आता नरेंद्र मोदींच्या सरकारने बरखास्त करण्याचे ठरवले आहे). नेहरूंच्या काळातील पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांच्या आखणी आणि अंमलबजावणीमध्ये आयोगाची भूमिका महत्त्वाची होती. नियोजन आयोगाचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे म्हणजे स्वत:कडे घेऊन त्यांनी तिथे जातीने लक्ष घातले. नेहरू पंतप्रधान असताना विविध विद्यापीठांच्या दीक्षांत समारंभांना आवर्जून जात असत. तिथे जाऊन मुलांशी बोलणे, त्यांना काही विचार देणे, आपली स्वप्ने त्यांच्यापुढे मांडणे नेहरूंना मनापासून आवडायचे. असाच एक किस्सा प्रणव मुखर्जींनी मला एकदा सांगितला होता. देशाचे पंतप्रधान हे ‘शांतिनिकेतन'चे पदसिद्ध कुलपती (Chancellor) असतात. त्यांच्या कुलगुरुपदाच्या नेमणुकीवर नेहरूंचे बारकाईने लक्ष असायचे. कारण काय तर टागोरांनी उभी केलेली ही इतकी महत्त्वाची आणि वेगळी शिक्षण संस्था योग्य व्यक्तींच्या नेतृत्वाखाली असावी.

कलाक्षेत्रात संगीत नाटक अकादमी आणि पुढे दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली साहित्य अकादमी, तर सिनेमा निर्मितीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देता यावे यासाठी (पुण्यातली) फिल्म institute या संस्था नेहरूंच्या काळातील आहेत. या सर्व संस्था आज त्यांच्या गुणवत्तेसाठी, दर्जेदार कामासाठी ओळखल्या जातात. नेहरूंचे लक्ष जसे देशाच्या अंतर्गत संस्था उभारणीवर होते तसेच ते आंतरराष्ट्रीय राजकारणात पण संस्था उभ्या करण्याबाबत आग्रही होते. त्यांनी काश्मीर प्रश्नावरून आलेली कटुता बाजूस ठेवून संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात उत्साहाने सहभाग घेतला होता. भारताने स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश कॉमनवेल्थ (राष्ट्रकुल) संघटनेत राहू नये असा मोठा जनमताचा रेटा बाजूस ठेवून नेहरूंनी त्यावेळी राष्ट्रकुलात राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांनी नवस्वतंत्र आशियाई आणि आफ्रिकी राष्ट्रांचे प्रश्न जगाच्या समोर मांडण्यासाठी पुढाकार घेऊन परिषदा भरवल्या. मार्च १९४७ मधील आशियाई संबंध परिषद, १९५५ मधील बांडुंग येथील आफ्रो-आशियाई परिषद आणि १९६१ मधील बेलग्रेड येथील अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली परिषद या सर्व ठिकाणी नेहरूंची भूमिका महत्त्वाची होती. अलिप्ततावादी चळवळीला संस्थात्मक रूप देण्यात नेहरूंचा वाटा मोलाचा होता.आंतरराष्ट्रीय राजकारणाचा देशात उत्तम रीतीने अभ्यास करता यावा म्हणून इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स (ICWA), इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (ISIS) ज्याचे रूपांतर पुढे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज मध्ये झाले, यांची स्थापना नेहरूंच्या पुढाकाराने झाली होती. विविध देशांशी असणारे भारताचे सांस्कृतिक संबंध जोपासता यावेत यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स नेहरू युगात सुरू करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर संस्था उभ्या करताना नेहरूंनी संस्था उभारणीची देशाच्या निर्मितीशी सांगड घातली होती. त्यांना असे वाटे की या संस्था देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचे योगदान देतील. नेहरूंच्या या कामाची तुलना करायची तर ती एकोणिसाव्या शतकातील न्यायमूर्ती रानडेंच्या कामाशी करता येईल. रानडेंचा असा विश्वास होता की जुन्या संस्था लयाला गेल्या तरी चालतील पण नव्या संस्थांची सतत उभारणी होत राहिली पाहिजे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी प्रार्थना समाज, वक्तृत्वोत्तेजक सभा, मराठी साहित्य संमेलन, हुजूरपागासारख्या शाळा अशा अनेक संस्था उभ्या केल्या.

आजच्या काँग्रेस पक्षाकडे पाहून नेहरूंच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करणे चूक आहे असे मला वाटते. गेल्या पाच दशकांतील नेहरूविरोधी विषारी प्रचारामुळे नेहरूंच्या विषयीचे असंख्य गैरसमज तयार झाले आहेत. आज आपण एक आधुनिक, सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून जे उभे आहोत त्याचा पाया नेहरूंनी घातला होता. त्यामुळे खरे पाहू जाता आपण नेहरूंच्या खांद्यावरच उभे आहोत!
(आंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्राध्यापक असणारे राजन हर्षे २००५ ते २०१० या काळात अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू होते.)
rgharshe@gmail.com