आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाशातील कचऱ्याचा गहन प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रोने नुकतेच विविध देशांचे एकशेचार लहान मोठे उपग्रह अवकाशात पाठवून इतिहास घडवला. सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन व भारत या फक्त सहा देशांकडे स्वत:च्या अग्निबाणामधून स्वत:चे अथवा दुसऱ्या देशांचे उपग्रह पाठवून ते अपेक्षित कक्षेत स्थिर करण्याची क्षमता आहे. नेमके किती उपग्रह अवकाशात आहेत हे ठाऊक नाही, कारण दुसऱ्या देशाच्या भूमीवर काय चालले आहे हे शोधण्यासाठी पाठवलेले स्पाय सॅटेलाइट ‘हेर उपग्रह’ किती आहेत हे कधीच समजत नाही. सध्या दुसराच एक प्रश्न निर्माण झाला आहे तो अवकाशातील कचऱ्याचा. 

मानवाने या ना त्या निमित्ताने अवकाशात पाठवलेला तसेच परत न आणता येण्यासारखा कचरा म्हणजे अंतराळातील कचरा. या कचऱ्यामध्ये ज्यांचे काम थांबले आहे असे उपग्रह, रॉकेटची निरुपयोगी नळकांडी, उपग्रहाचे विखुरलेले भाग, झीज झालेले भाग आणि परस्परांवर आदळून अपघात झालेले उपग्रह. डिसेंबर २०१६ पर्यंत पाच उपग्रह परस्परावर आदळलेले आहेत. जुलै २०१३ मध्ये केलेल्या पाहणीत केलेल्या अंतराळातील कचऱ्यामध्ये १७० दशलक्ष एक सेंमीपेक्षा लहान, ६ लाख ७०,००० एक ते दहा सेंमी आकाराच्या आणि २९,००० त्याहून मोठ्या आकाराच्या कचऱ्याचा समावेश आहे. त्यात काम करत असलेले १४१९ उपग्रह आहेत. या सर्व कचऱ्याचे एकत्रित वजन साडेपाच हजार टन आहे.  
 
या सर्व कचऱ्याचा परिणाम उपग्रहांचे सोलर पॅनेल निकामी होण्यात होतो. वेगाने पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाच्या सोलार पॅनेलवर तेवढ्याच वेगाने फिरणाऱ्या कचऱ्यामुळे सूक्ष्म ओरखडे पडून ते निकामी होतात. सोलार पॅनेल निकामी होणे म्हणजे उपग्रहाला होणारा विजेचा पुरवठा थांबणे. उपग्रह अकार्यक्षम होण्यात हे कारण प्रमुख आहे. अवकाशात सोडलेल्या दुर्बिणीच्या भिंगांना याचा धोका अधिक आहे. पृथ्वीभोवती असलेला सर्वाधिक कचरा पृष्ठभागापासून दोन हजार किलोमीटर कक्षेत आहे.
 
हा कचरा घन रॉकेट इंधनामुळे, रॉकेटच्या रंगाच्या खपल्या आणि अणुऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहातील कूलंटचा आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक तीनशे ते चारशे किलोमीटर कक्षेत फिरत राहते. २००९ मध्ये घडलेली उपग्रहांची धडक ८०० ते ९०० किलोमीटर उंचीवर झाली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक येणाऱ्या कचऱ्यापासून स्वत:ची कक्षा बदलून बिघाड टाळू शकते. अंतराळातील कचरा स्थिर नाही.
 
तो सुमारे ताशी २८,००० किलोमीटर वेगाने ध्रुवीय कक्षेत फिरत राहतो. पुणे-मुंबई मार्गावर जशी वाहनांची गर्दी आहे आणि एखाद्या वेळी दोन वाहनांची धडक लागून पूर्ण वाहतूक बंद पडते तशा धडकेनंतर अपघाताने उपग्रह निकामी होण्याची शक्यता नेहमी असते. उपग्रहाच्या कक्षेत एखादी अपरिचित वस्तू आली तर पृथ्वीवरून त्याचे नियंत्रण नेहमी करता येईलच असे नाही.  
 
सध्या दररोज एक या वेगाने कक्षेभोवती फिरत राहिलेल्या वस्तू पृथ्वीच्या वातावरणात शिरतात आणि घर्षणाने जळून नष्ट होतात. सध्या काळजी करण्यासारख्या वस्तू गोळा करणे व खाली आणून त्यांची विल्हेवाट लावणे यावर वैज्ञानिकांनी लक्ष दिले आहे. हे वाटते तेवढे सोपे नाही. अंतराळात यानातून बाहेर येऊन काही वस्तू गोळा केल्या आहेत. पण अगदीच लहान वस्तू जसे आजपर्यंत सहापेक्षा अधिक कॅमेरे अंतराळात चुकून नाहीसे झाले आहेत. अगदी सुनीता विल्यम्सचा कॅमेरा तिच्या हातातून निसटून गेला. लहान अवजारे अंतराळ स्थानकाच्या किंवा पॅनल दुरुस्तीच्या वेळी हरवणे नेहमीचे आहे.  
 
त्यामानाने भूस्थिर कक्षेत म्हणजे ३६,००० किलोमीटर उंचीवर असलेला कचरा संख्येने कमी, पण आकाराने मोठा आहे. आपले बरेच उपग्रह आपल्या कक्षेत भारतावर भूस्थिर कक्षेत फिरत आहेत उदा. इन्सॅट वन, बी वगैरे. त्यातही निकामी उपग्रह परत आणणे म्हणजे दुसऱ्या यानातून ते गोळा करावे लागतात. यासाठी २८ फेब्रुवारी २०१४ या दिवशी जपान एरोस्पेस एक्प्लोरेशन एजन्सीने अवकाशातील जाळे ‘स्पेस नेट’ नावाचा उपग्रह पाठवला. डिसेंबर २०१६ मध्ये काउनोटोरी सिक्स नावाचा सातशे मीटर लांबीच्या कंगव्याने कचरा विंचरून गोळा करण्यासाठी पाठवलेल्या यानाचा कंगवा उघडला गेला नाही. त्यामुळे हे मिशन अपयशी झाल्याचे जाहीर करण्यात आले. २०१२ पासून युरोपियन स्पेस एजन्सी अवकाशातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मागे लागली आहे. ईडी ऑर्बिट या खास कचरा मोहिमेसाठी २०२१ मध्ये पाठवण्यात येणारे यान चार हजार किलो कचरा गोळा करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. तोपर्यंत आणखी किती कचरा अवकाशात गोळा होतो ते पाहूया.
बातम्या आणखी आहेत...