आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इधी धरी जो हृदयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ वर्षांपूर्वी पाकिस्तानात चुकून गेलेल्या गीताला इधी फाउंडेशनने नुकतेच भारताच्या स्वाधीन केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटल्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तान यांचीच ती मुलगी आहे. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती उपकारे’ हेच त्यांचे ब्रीद आहे.

काय विसंगती आहे पाहा, यापुढे आमच्या हाती एके-४७ असायला हव्यात, अशी मागणी जाहीररीत्या मुंबईत केली जात असतानाच ८७ वर्षांच्या अब्दुल सत्तार इधी या पाकिस्तानी मसिहाने त्या देशात १५ वर्षांपूर्वी चुकून गेलेल्या एका भारतीय कन्येला आपल्या हाती सोपवले आहे. या कन्येचे नामकरण गीता हेही त्यांची पत्नी बिल्किस बानो यांनी तिचा धर्म लक्षात घेऊन केले आहे. गीता ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही. अशा स्थितीत ती लाहोरमध्ये समझोता एक्स्प्रेसमध्ये सापडली. ती तिथे कशी गेली, तिच्याबरोबर कोण होते, हे काही कळलेले नाही.

प्रारंभी पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीत सापडलेल्या आणि नंतर त्यांच्याकडूनच इधींकडे सोपवलेल्या गीतेला त्यांनी इतकी वर्षे तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपलेले आहे. तिला तिचा धर्म त्यांनी पाळू दिला इतकेच नाहीतर त्यांनी आपल्या संस्थेतच तिच्यासाठी एक छोटे मंदिर बांधून दिले. याखेरीज कराचीमध्ये बिल्किस तिला मंदिरात घेऊन जात असत. विशेष म्हणजे पाकिस्तानातले हे जोडपे एकाच वेळी तीनशेपेक्षा जास्त ठिकाणी ‘ज्यांसी आपंगिता नाही। त्यासि धरी जो हृदयी। दया करणे जे पुत्रासी। तेचि दासा आणि दासी।। या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आणि भगवद्गीतेतल्या कर्मयोगाच्या सिद्धांताप्रमाणे झपाटल्याप्रमाणे काम करत असते. गीता हे नाव त्यांनी सार्थकी ठरवले आहे. ऊठसूट धर्माच्या नावाखाली आपल्याकडे धिंगाणा घालणाऱ्यांनी तो अधिकार कधीच गमावलेला आहे. स्वत: इधी पैसे कमी पडले तर रस्त्यावर बसकण मारतात आणि आपली टोपी लोकांपुढे पसरतात. मदतीची याचना करतात. कोणत्याही एका दिवशी त्यांच्या संस्थेत दोन-अडीच लाख रुपये जमा होतात. त्याखेरीज शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि अन्नधान्य असेही मदतीच्या स्वरूपात गोळा होत असते. इधी फाउंडेशनच्या माध्यमातून इधी पती-पत्नी पाकिस्तान व्यापून राहिलेले आहेत. पाकिस्तानात भूकंप झाला तर त्यांच्या या संघटनेचे कार्यकर्ते क्षणार्धात त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. अस्ताव्यस्त फेकली गेलेली छिन्नविच्छिन्न प्रेते उचलून आणण्याच्या कामी शासकीय संघटना एकवेळ कचरतील, पण यांचे कार्यकर्ते मागे हटणार नाहीत.

एकदा तर अब्दुल सत्तार इधी हे हेलिकॉप्टरने महत्त्वाच्या मदतकार्यावर लक्ष ठेवायला जात असताना ईप्सित स्थळापासून काही मिनिटांच्या अंतरावर त्यांचा नातू गेल्याची बातमी त्यांना हेलिकॉप्टर चालकाने दिली. पण त्यांनी परत मागे न फिरता तिथेच नातवाला श्रद्धांजली वाहिली. अखंड ध्येयासक्ती ती हीच. असेच एकदा काही प्रेतांना वाहून नेताना त्या शववाहिकेत बसण्याचा तेव्हा सहा-सात वर्षे वय असलेल्या त्यांच्या मुलाने-फैजलने हट्ट धरला, ‘मला पण यायचं आहे तुमच्याबरोबर.’ अब्दुल सत्तार इधी म्हणाले, ‘चल बेटा, तुला तरी हा अनुभव कधी घ्यायला मिळणार?’ पत्नी नको म्हणत असताना त्यांनी त्याला बरोबर घेतले आणि शववाहिकेने प्रवास सुरू केला. वाटेत पोराला सटासट उलट्या होऊ लागल्या, पोटात डचमळू लागले, तरी यांची गाडी काम फत्ते करूनच मागे फिरली.

ते मक्केला जातात, मदिनेला जातात; पण त्यांना मौलाना म्हटलेले आवडत नाही. पाकिस्तानात राहूनसुद्धा ते नमाज नियमित पढत नाहीत. त्यांना त्यासाठी धर्मबुडवे म्हणून टीकाही झेलावी लागते. हाजींना ते विचारतात की, तुम्ही जकात (धर्मादाय कर) देता का? एकदा तर साडेतीनशे हाजींपैकी फक्त एकाने आपण तसे करत असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी त्या समुदायाला बोधामृत पाजूनच परत पाठवून दिले. पाकिस्तानमध्ये सर्वप्रथम अय्युब खानांची लष्करी राजवट आली तेव्हा त्यांना त्यांच्या तोंडावर ‘तुम्ही खोटे बोलता आहात’ असे सांगण्याचे धाडस इधींनी केले होते. पुढे झुल्फिकार अली भुट्टो यांची पीपल्स पार्टी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाली तेव्हा त्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात दोन मतदारसंघांतून ते उभे राहिले आणि सपाटून पराभव स्वीकारला. हेच भुट्टोे एका प्रसंगी मदतकार्य चालू असताना पंतप्रधान या नात्याने तिथे पोहोचलेले होते. त्यांनी इकडेतिकडे पाहिले आणि आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी विचारले, ‘इधी कुठे दिसत नाहीत ते.’ इधी तिथेच होते आणि अगदी न ओळखू येण्याजोग्या अवस्थेत मदतकार्यात मग्न होते.

‘इधी : ए मिरर टू द ब्लाइंड’ हे त्यांचे तेहमिना दुर्राणी यांनी लिहिलेले चरित्र आहे. हे पुस्तक आंधळ्या समाजासमोर धरलेला आरसा आहेच; पण तो अंधश्रद्धावाल्यांसमोरही धरलेला आरसा आहे. मनोरुग्ण झालेल्या, पीडित महिलांना ते आश्रय देतात, मदत करतात. वेळप्रसंगी संडास साफ करायचे, आजाऱ्यांची घाण काढून टाकायची, मनोरुग्णांसह सर्वांना अंघोळ घालायची आणि अगदी क्षयी किंवा हातापायाची बोटे झडलेला कुष्ठरोगी आला तरी त्याची योग्य दखल ते घेतात. म्हणूनच सत्तार पती-पत्नी आज असंख्य पाकिस्तान्यांचे आई-वडील आहेत.

इधी कुटुंबापैकी एकही जण फाउंडेशनमधून पगार घेत नाही. एकदा एका मशिदीबाहेर एका नवजात बालकाला दगडांनी ठेचून मारल्याचे त्यांना कळले. त्यांना कळले की तो धार्मिक फतवा होता म्हणून. त्याबरोबर ते उसळले आणि म्हणाले, ‘इतक्या लहान बाळाला ठार करण्याचा दोषी ठरवायची हिंमत कुणाची झालीच कशी? त्याला दगडांनी ठेचून मारणाऱ्या समाजाने तरी आपली बुद्धी एवढी गहाण टाकावी हे कल्पनेच्या बाहेरचे आहे. त्यांनी आपल्या सर्व इधी केंद्रांमध्ये फलक लावलेले आहेत, ‘आणखी पाप करू नका, आपल्या बाळाला आमच्या देखरेखीखाली ठेवा.’ गीताला समजा इधींनी आपल्या संस्थेत स्वीकारले नसते तर आज ती कुठे असती, या प्रश्नाने तर आपले डोके भणाणून जाते.

त्यांना नोबेल पारितोषिक द्यायचे २०१३ मध्ये घाटत होते, पण ते जाहीर झाले नाही. महात्मा गांधीजींनाही १९४८ मध्ये नोबेल पारितोषिक दिले जायचे होते, पण ते घडले नाही. दोघेही काठियावाडी गुजरातीच, पण धर्म भिन्न असूनही त्यांनी मानवता हाच आपला श्रेष्ठ धर्म असल्याचे मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इधी फाउंडेशनला दिलेली एक कोटी रुपयांची देणगी त्यांनी नाकारलेली आहे. कोणत्याही सरकारी निधीतून मदत स्वीकारायची नाही या फाउंडेशनच्या धोरणाला चिकटून त्यांनी त्यास विनम्र नकार दिला आहे. झिया-उल-हक यांच्या कारकीर्दीतही त्यांनी मोठ्या प्रमाणातली सरकारी मदत नाकारलेली आहे. गीता भारतात आली हे मानवतेचे कार्य एका पाकिस्तानी संस्थेकडून पार पडले.
arvindgokhale@gmail.com
बातम्या आणखी आहेत...