बराक ओबामा यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदाची पहिली कारकीर्द ही कसोटीची होती. एक म्हणजे त्यांनी २००८ मध्ये अध्यक्षीय निवडणूक प्रचारात अमेरिकेला महामंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन त्यांनी अक्षरश: चार वर्षांत पुरे करून दाखवले. शिवाय अल कायदा या संघटनेचा बिमोड करण्याची व या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला जिवंत पकडून त्याला गुपचुप हिंदी महासागरात जलसमाधी देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी कोणताही गाजावाजा न करता पार पाडली. या कारवाईचे राजकीय श्रेय त्यांनी २०१२च्या ते लढवत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत घेतले नाही. पण अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणल्यानंतर अमेरिकेतील सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर त्यांनी
आपले लक्ष अधिक केंद्रित केले आणि त्यामुळे अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय पटलावरील दादागिरी-महत्त्व कमी झाले. असे म्हणतात की, राजकारणात कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्यांदा मिळालेला जनतेचा कौल हा तसा धोकादायक असतो. कारण जनतेच्या अपेक्षा (लोभ!) पूर्वीपेक्षा अधिक वाढलेल्या असतात. त्याचबरोबर विरोधी पक्ष हे अधिक आक्रमक झालेले असतात. सत्तेच्या खुर्चीखाली अनेक सुरुंग पेरले जाऊ लागतात. आपल्याकडे डॉ. मनमोहन सिंग यांना जनतेने दुसऱ्यांदा पंतप्रधानपदासाठी दिलेला कौल ही काँग्रेससाठी दिलासादायक बाब असली तरी केवळ दीड वर्षांत यूपीए-२ सरकार व व्यक्तिश: डॉ. मनमोहन सिंग हे विरोधकांच्या रडारवर आले. पुढचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. तशी काहीशी परिस्थिती ओबामा यांच्या वाट्याला आली. ओबामा यांच्या प्रत्येक धोरणाला प्रतिस्पर्धी विरोधी पक्ष रिपब्लिकन पार्टीने विरोध करण्यास सुरुवात केली. शटडाऊनसारखे प्रसंग ओबामा यांच्या सरकारला झेलावे लागले, सामाजिक आरोग्याचे ओबामा केअर धोरण गटांगळ्या खाऊ लागले, समलैंगिक संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असली तरी त्याच्यामुळे अमेरिकी समाजात दोन गट पडले. स्वत:च्या भूमीत तेल उत्खननास सुरुवात केल्याने अरब राष्ट्रांमधील अमेरिकेचा हस्तक्षेप कमी झालेले मन्वंतर विरोधकांना रुचले नाही, सिरियातील यादवीत जातीने लक्ष न घातल्याने आणि चीन-रशियासारख्या महासत्तांना रोखण्याचे प्रयत्न न केल्याने ओबामा यांच्या प्रतिमेवर जहरी टीका झाली. त्याचा फटका डेमोक्रॅटिक पक्षाला २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकांत बसला. अमेरिका हा एक दुभंगलेला देश आहे याची प्रचिती ओबामा यांच्या दुसऱ्या कारकीर्दीत अधिक स्पष्ट झाली ती रिपब्लिकन पक्षाच्या विखारी व विषारी प्रचारामुळे. त्यात या पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पसंती दिल्याने हे दुभंगलेपण अधिक विस्तारत गेले. निर्वासित विरुद्ध अमेरिकी माणूस, मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन असा थेट प्रचार ट्रम्प यांनी हाती घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला आपणच वाचवू शकतो व या देशाला पुन्हा वैभवशाली बनवू शकतो, अशी भूमिका घेतल्याने अमेरिकी जनमताचे वेगाने ध्रुवीकरण झाले.
ओबामा यांची ८ वर्षांची कारकीर्द ही जगाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. या प्रदीर्घकाळाचे मूल्यमापन पुढे केले जाईलच; पण अमेरिकेची युद्धखोर प्रतिमा ओबामा यांनी पारंपरिक कट्टर शत्रू असलेल्या इराण व क्युबाशी दोस्ती करून पुसून टाकली. हे धोरण अत्यंत कठीण होते. कारण अमेरिकेची एस्टॅब्लिशमेंट, त्यांचे हितसंबंध, कॉर्पोरेट कंपन्यांची धोरणे व अमेरिकेचे संरक्षणहित यांची गुंतागुंत पाहून ओबामा यांनी हे ऐतिहासिक निर्णय घेतले. सिरियाच्या यादवीत अमेरिकेने प्रत्यक्ष भाग घेतला नाही त्याबद्दलची ओरड त्यांनी निमूटपणे झेलली. कारण अमेरिकेचे यापूर्वी व्हिएतनाम, अफगाणिस्तान-इराकमध्ये हात पोळले होते. त्या इतिहासाची पुनरावृत्ती त्यांना टाळायची होती. अफगाणिस्तान व इराकमधील फौजा माघारी घेण्याचा त्यांचा निर्णय हासुद्धा दूरदृष्टीचा होता. म्हणून त्यांच्या काळात अमेरिकेवर एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. अमेरिकेचा युद्धांवरचा अब्जावधी डॉलरचा खर्च वाचला व अमेरिकी समाजमन सततच्या युद्धामुळे बेचैन असे. त्याला तूर्त तरी विराम बसला. ओबामा यांच्या व्यक्तिमत्त्वात कमालीची विनयशीलता, संयमीपणा, अदब होता. अध्यक्ष असावा व तो ओबामा यांच्यासारखा ग्रेसफुल असावा असे कुणालाही वाटेल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या राजकीय कौशल्याचे कसब अनेक ठिकाणी दिसून आले. अमेरिकेचे जगाशी मैत्री व शांततापूर्ण संबंध असावेत याकडे त्यांचा कल होता. नोबेल समितीने त्यांच्या केलेल्या गौरवाला ते अखेपर्यंत जागले. त्यांचा वारसा ट्रम्प पुढे किती नेतात याबद्दल साशंकताच आहे. म्हणून अखेरच्या भाषणात ओबामांनी अमेरिकेच्या एकतेला धोका असल्याचा इशारा दिला आहे. तो महत्त्वाचा आहे.
सुजय शास्त्री
उपवृत्तसंपादक, मुंबई