आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रेच्या नावाने लूट, ६९ इस्लामी देशांचे सौदीच्या राजाला पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत सरकार हज यात्रेसाठी सबसिडी देते अन् तेलसंपन्न सौदी राजा लूट करतो. हजच्या नावाने दुसऱ्याने कोणी अशी लूट केली असती तर जगातील साऱ्या मुल्लांनी मिळून त्याचे जगणे हराम केले असते. परंतु, सौदीच्या कृत्याबद्दल कोणीही आवाज उठवत नाही, ही मोठ्या आश्चर्याचीच गोष्ट आहे.

जगात सर्वात अधिक कमाई करणारा राजा म्हणून सौदीच्या राजाची ओळख आहे. बेहिशेबी कमाईमुळे मुस्लिमांमध्ये त्याचा थाटमाट आणि ऐटही आहे. तो भले खलिफा नसेल, पण त्याचे स्थान खलिफाच्याही वरचे आहे. गरीब आणि अशिक्षित मुसलमान ईश्वराकडे सदैव करुणा भाकत असतो की, हे परवरदिगार, तुझ्या या भक्ताला आयुष्यातून एकदा तरी मदिनेला बोलावून घे. बिचारा श्रद्धावान मुसलमान आपल्या संसारातून पै-पै जोडून येनकेन प्रकारे हजसाठी मक्का-मदिनेला जातो. मक्केत हज यात्रा संपन्न होते आणि मदिनेत पैगंबर हजरत मोहंमद साहेब यांची तुरबत अर्थात समाधी आहे.

भारत सरकार धर्मनिरपेक्ष आहे, तरीही हज यात्रेसाठी सबसिडी देते. भारतीय यात्रेकरूंची मक्का - मदिनेत राहण्याची व्यवस्था करते. मक्केपर्यंतच्या प्रवासावर मोठे अनुदान देते. हज कमिटीच्या विशाल वास्तूत आणि इतरत्र राहण्याची सोय करते. परंतु जगातला तेलसंपन्न राजा मात्र हज यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात लूट करत असतो. हज यात्रेकरूंच्या लुटीतून आलेल्या पैशात त्याचा भला मोठा परिवार सुरा आणि सुंदरींच्या सान्निध्यात जीवन व्यतीत करत असतो.

हज यात्रेसाठी सुविधा देण्याच्या नावाखाली सौदी सरकार मक्का-मदिना परिसरात सदान््कदा भरपूर सुविधा, सुधारणा बांधकामे करीत असते. जगभरातील मुस्लिम समुदायाला या कामांची माहिती नसते असे नाही. हज यात्रेच्या नावाने होणाऱ्या या सुविधा, सुधारणा कामांमुळे मुस्लिम जगत खरे तर चिंताग्रस्त आहे. परंतु सौदी राजाच्या हुकूमशाहीपुढे कोणाचेच काही चालत नाही. सारे लाचार आहेत. त्याच्या अधर्मी वागणुकीशी इस्लामी जगत सहमत नाही.

सौदी कालपर्यंत हज यात्रेच्या नावाने आपली तुंबडी भरून घ्यायचा. परंतु, दुर्दैवाने आता म्हणावे लागते की, तो पवित्र हज यात्रेच्या कमाईतून अय्याशी करतोय. इतकेच नाही, तर इस्लामच्या नावाने खूनखराबा आणि लढायासुद्धा घडवून आणतोय. यात कोट्यवधी डाॅलर्सचा चुराडा हाेतो आणि माणुसकीचा गळा घोटला जातो. हे सत्य समजून घ्यायचे असेल तर हजच्या नावाने सुरू असलेल्या अब्जावधीच्या कमाईवरचा पडदा दूर करावा लागेल. हजच्या नावाने दुसऱ्या कोणी अशी लूट केली असती तर जगातील साऱ्या मुल्लांनी मिळून त्याचे जगणे हराम केले असते. परंतु, सौदीच्या या गैरइस्लामी आणि माणुसकीच्या विरोधी कामाविरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही, ही मोठ्या आश्चर्याचीच गोष्ट आहे. या मुद्द्यावर मुस्लिम गप्प का? मुस्लिम जगताच्या या पळपुटेपणामुळेच सौदीची हुकूमशाही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इराण हा शियाबहुल देश आहे. तो देश अधूनमधून याला विरोध करतो. पण त्या वेळी सुन्नीबहुल देश इराणलाच गैरइस्लामी ठरवतात. परिणामी इराणचे खच्चीकरण होते. असे असले तरी आतल्या आत मुस्लिमांमध्ये असंतोषाची भावना वाढत आहे. आपल्या आर्थिक सुबत्तेची फुशारकी मारून सौदी आपल्या विरोधकांना चूप बसवत असतो. पण आता हा असंतोष वाढू लागला अाहे. काही दिवसांपूर्वी ६९ इस्लामी देशांनी सौदीच्या राजाला एक पत्र धाडून चकित केले. या पत्रलेखकांमध्ये भारतातील रजा अकादमीचे सदस्य आणि अध्यक्ष मौलाना सईद नूरी यांचाही समावेश आहे. या प्रकरणात हज यात्रेच्या वेळी घेण्यात येणाऱ्या करांची चर्चा सर्वप्रथम केली पाहिजे की ज्यामुळे सौदीचा खजिना ओसंडून वाहत असतो. व्हिसाच्या (पारपत्र) नावाखाली सौदी सरकार हाजींकडून लाखो डाॅलर वसूल करत असते. वाचकांना सांगितले पाहिजे की, मौलाना नूरी हे मुंबईतील मोठे इस्लामी विद्वान आहेत. सौदी सरकार देवबंदी विचारधारेचे समर्थक आहे. एक अन्य विचारधारा जी बरेलवी मौलानांची शाखा आहे, ती वेळोवेळी सौदी परिवाराच्या कट्टरतेला विरोध करत असते. सौदी सरकारचे म्हणणे काहीही असले तरी मौलाना नूरी यांनी लावलेले आरोप ते नाकारू शकत नाहीत. या आरोपांतील सत्य पडताळून पाहिल्यानंतर तरी जगातील मुसलमानांनी सौदीच्या बादशहाचे कान उपटलेच पाहिजेत. तसे झाले तरच सर्व देशांतील मुस्लिम नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

पैगंबर मोहंमद साहेबांचा जन्म मक्केत झाला होता. इस्लामच्या प्रसार आणि प्रचाराला याच नगरीतून सुरुवात झाली होती. त्यामुळे मक्का हे मुसलमानांसाठी सर्वाधिक पवित्र स्थान आहे. या नगरीपर्यंत पोहोचण्यासाठी एका हाजीला एकूण किती खर्च करावा लागतो, हे जाणून घेणे आवश्यक आहे. हज यात्रा करणाऱ्याकडून व्हिसा आणि विमान तिकिटाचे पैसे तिप्पट अधिक वसूल करतात. या भल्या मोठ्या रकमेवरून बिचारा सामान्य मुसलमान संभ्रमात पडतो, कारण त्याला हज यात्रा करायचीच असते. या मुद्द्यावरूनच ६९ इस्लामी देशांनी सौदीच्या राजाला पत्र पाठवून दिले आहे. या पत्राच्या माध्यमातून हज यात्रेच्या नावाखाली हाेणाऱ्या लुटीसंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या पत्रात मौलाना नूरी यांनी म्हटले आहे की, सामान्यपणे हज आणि उमरासाठी व्हिसा विनामूल्य जारी करण्यात येतो; परंतु सौदी दूतावासात बसलेले उच्च अधिकारी उमरा व्हिसा देण्यासाठी २५ ते ३० हजार, तर हज व्हिसा देण्यासाठी ५० ते ७५ हजार रुपये वसूल करतात. प्रश्न केवळ व्हिसाचाच नाही, तर विमान यात्रेपासून ते बसच्या तिकिटाच्या नावावर तिप्पट पैसा वसूल केला जातो. ही बाब सौदीच्या राजाला माहीत नाही असे नाही, पण तो मौन असतो. जेद्दापर्यंतच्या प्रवासाला साधारण १७ हजार रुपये खर्च येतो. पण हज आणि उमरा करणाऱ्यांकडून ३५ ते ४५ हजार रुपये वसूल केले जातात. ही लूट येथेच थांबत नाही. मक्केहून मदिनेला जाण्यासाठी बसभाडे ४५० ते ५०० सौदी रियाल वसूल केले जातात.
सामान्यपणे हे भाडे १४० ते १८० िरयाल असते. हज यात्रेच्या काळात मक्का आणि मदिनेतील प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडलेले असतात. या दरवाढीवर तेथील सरकार अंकुश ठेवत नाही. सौदीच्याच दबावाखाली येऊन भारत सरकारने जलमार्गाने होणारी यात्रा बंद केली. आपण हज यात्रा जलमार्गाने करावी की हवाई मार्गाने हे ठरवण्याचा अधिकार सामान्य मुसलमानाला पाहिजे की नाही?

मुसलमानाने स्वत:च्या कमाईतील पैशाने ही धार्मिक यात्रा संपन्न करावी यातच या यात्रेचे पावित्र्य आहे. या दृष्टीने विचार केल्यास भारत सरकारने अनुदान देणे योग्य ठरत नाही. भारत सरकार आणि हज यात्रा करणाऱ्यांनी या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सौदीकडून होणारी लूट थांबवली तर स्वखर्चाने हज यात्रा करणे काही कठीण नाही. पण सौदीच्या गळ्यात घंटा बांधण्यासाठी जगभरातील मुसलमान धजावतील काय, हा खरा प्रश्न आहे.