आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यसुरक्षा : जाहल्या काही चुका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुडॉल्फ वरको म्हणतात, ‘जर आजार व्यक्तिगत आयुष्यातील प्रतिकूलता दर्शवत असतील, तर साथी समाजातील प्रतिकूलतेकडे बोट दाखवतात. साथी या राजाला त्याच्या राज्याची उत्क्रांती खंडित होते आहे हे सांगतात व प्रजेला जबाबदा-यांचे भान देतात.’
सध्या मुंबईसह अख्ख्या महाराष्ट्रात डेंग्यू साथीची चर्चा सुरू आहे. त्यातच के.ई.एम. रुग्णालयातील डॉ. खोब्रागडे या भूलतज्ज्ञ शाखेच्या निवासी डॉक्टरच्या डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूमुळे शासनाला ही साथ नियंत्रणात आणण्यात आलेल्या अपयशासाठी टीकेला तोंड द्यावे लागते आहे. दरवर्षी आपल्याकडे अधूनमधून साथीचे आजार येतात व काही साथी तर कित्येक वर्षे अव्याहत सुरूच आहेत. साथींच्या आजाराविषयी संसर्गजन्य आजारांचे थोर अभ्यासक रुडॉल्फ वरको यांनी एक सूचक वाक्य वैद्यकीय पुस्तकात लिहून ठेवले आहे. वरको म्हणतात, ‘जर आजार या व्यक्तिगत आयुष्यातील प्रतिकूलता दर्शवत असतील, तर साथी या समाजातील प्रतिकूलतेकडे बोट दाखवतात. साथी या राजाला त्याच्या राज्याची उत्क्रांती खंडित होते आहे हे सांगतात व प्रजेला विसर पडलेल्या जबाबदा-यांचे भान देतात.’ कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या या वाक्याचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केला, तरी सध्याच्या डेंग्यू साथीचे कोडे उलगडू शकते.

मुळात डेंग्यूच्या साथीची धास्ती घेताना एक गोष्ट आपण नीट समजून घ्यायला हवी. डेंग्यू हा एक विषाणुजन्य आजार आहे. डेंग्यूच काय, पण इतर कुठलाही विषाणुजन्य आजार हा काही दिवसांत आपोआप बरा होतो. अशी कुठली जादुई कांडी किंवा औषध नसते, ज्यामुळे डेंग्यू बरा होतो. तो आपोआपच बरा होत असतो. त्यामुळे डेंग्यूच्या साथीत डेंग्यू झाला म्हणजे आपण आता मृत्यूच्या दारातच उभे आहोत हा रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमधील गैरसमज सर्वप्रथम खोडून काढायला हवा. या गैरसमजामुळे रुग्ण फसवणुकीला बळी पडतात. पहिल्यांदा डेंग्यू होतो तेव्हा तो सौम्य स्वरूपात होतो (प्राथमिक संसर्ग); पण तो दुस-यांदा होतो (सेकंडरी इन्फेक्शन) तेव्हा मात्र तो काही वेळा रक्तदाब कमी करणारा ‘डेंग्यू शॉक’ व रक्तस्राव घडवून आणणारा ‘डेंग्यू हिमरेजिक फीव्हर’ असे रौद्ररूप धारण करतो. यात काही प्रमाणात मृत्युदर असला तरी डॉक्टरांनी ठरवून दिलेली उपचारांची मार्गदर्शक तत्त्वे पाळली तर यात ही रुग्णाचा मृत्यू होत नाही. डेंग्यूमध्ये शरीर काही काळ पांढ-या पेशी व प्लेटलेट्सचे उत्पादन थांबवते. गावात दंगल झाली असेल तर कर्फ्यू लावला जातो व हानी टाळली जाते. त्याचप्रमाणे शरीरात डेंग्यूची दंगल सुरू असताना शरीर कर्फ्यू लावते व पेशींचे उत्पादन कमी करते. त्यामुळे कमी झालेल्या पेशींना मुळीच घाबरायचे नसते. मात्र, रुग्णावर बारीक लक्ष ठेवून हृदयाचे ठोके, श्वासाची गती, रक्तदाब व लघवीचे प्रमाण या गोष्टी पाहायच्या असतात. पण डेंग्यूच्या साथीत पेशी कमी झाल्या व आता फारच मोठे संकट कोसळल्याचा भास निर्माण केला जातो जो चुकीचा आहे. या भीतीमुळेच डेंग्यूमध्ये अनावश्यक प्लेटलेट्स ट्रान्सफ्यूजनचा चुकीचा प्रघात पडत चालला आहे. मुळात शरीरात रक्तस्रावाचा पुरावा असेल तर दहा हजार व तसा पुरावा नसल्यास वीस हजारांपर्यंत प्लेटलेट्स कमी होत नाहीत तोपर्यंत प्लेटलेट्स देण्याची गरज नसते. सध्या मात्र प्लेटलेट्स एक लाखाच्या खाली गेले, तरी अनावश्यक प्लेटलेट्स दिले जातात. मुळात अशा अनावश्यक प्लेटलेट्स ट्रान्सफ्यूजनमुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होऊन प्लेटलेट्स अजून खालावतात. तसेच प्लेटलेट्सचा कृत्रिम तुटवडा निर्माण होतो व खरोखरीच प्लेटलेट्सची गरज असलेले रुग्ण त्यापासून वंचित राहतात. असे असूनही प्लेटलेट्स देणारा डॉक्टर जास्त काही तरी करणारा म्हणून हुशार आणि चांगला वाटतो.

साथीमध्ये आजारांच्या उपचाराइतकेच आजाराचा फैलाव थांबवणे व प्रतिबंध करणे हा साथ नियंत्रणात महत्त्वाचा घटक असतो. डेंग्यूच्या उपचारांमध्ये जसे डॉक्टरांचे अज्ञान व रुग्णाच्या भीतीमुळे पीछेहाट झाली तसेच प्रतिबंधाच्या बाबतीत आपल्या साध्या व्यक्तिगत व सामाजिक जबाबदा-या विसरल्यामुळे गोंधळ झाला आहे. एडिस या डेंग्यूचा फैलाव करणा-या डासाची उत्पत्ती साधारणत: साठवलेल्या, स्वच्छ व कधी घाण पाण्यात होते. यात घराच्या छतावरील पाण्याची टाकी, छतावरील पडलेले सामान, जुने टायर्स, रस्त्यावरील खड्डे, घराच्या आजूबाजूला असलेले खड्डे, फुटके डबे, नारळाच्या करवंट्या अशा जागांचा समावेश असतो. एवढी गोष्ट समजून घेतली व आपण आपली मान दोन्हीकडे वळवण्याची तसदी घेतली किंवा सहज खिडकीबाहेर डोकावण्याची तसदी घेतली, तरी डेंग्यूच्या साथीचे मूळ आपल्याला काही मिनिटांत सापडेल. डेंग्यू साथीमध्ये शासनाच्या काही जबाबदा-या आहेत; पण कोणी मंत्री वा सेलिब्रिटी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हातात झाडू घेऊन फोटो काढून घेण्यासाठी आपल्या छताची व घराची निवड करेल याची वाट बघणे व्यर्थ आहे. या जबाबदा-या आपल्यालाच घ्याव्या लागणार आहेत, कारण डेंग्यू झाला तर तो आपल्यालाच भोगावा लागणार आहे. शासनाकडून, नगरपालिकेकडून होणारी फवारणी ही काही प्रमाणात प्रभावी असली तरी त्यातून डासांची उत्पत्ती थांबत नाही. तसेच आपल्याकडे डासांमुळे होणा-या सर्वच आजारांना मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाखाली नियंत्रित करण्याचा प्रयत्न होतो; पण मलेरियाच्या फवारणीसाठी वापरले जाणारे डी.डी.टी. हे डेंग्यूवर तितकेसे प्रभावी नाही, कारण हे दोन आजार दोन वेगळ्या जातीच्या डासांमुळे होतात. डेंग्यू नियंत्रणासाठी मस्किटो रिपेलंट क्रीम, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांची जोरात जाहिरात होते. मच्छरदाणीसह या डासाच्या चाव्यापासून वाचवणा-या वैयक्तिक सुरक्षेच्या गोष्टी तुम्हाला रात्री डासांपासून वाचवतील; पण डेंग्यूचा डास हा दिवसा चावतो. म्हणून या जाहिराती साहाय्यभूत ठरू शकतात, पण ते भासवले जाते तसे अंतिम उत्तर नाही. पाण्यात गप्पी मासे सापडणे फायद्याचे ठरते; मात्र डासांची उत्पत्ती होत ते साचलेल्या पाण्याची ठिकाणे शोधून कोरडी करणे व अशा प्रकारे आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळणे हाच साथ नियंत्रणाचा केंद्रबिंदू आहे. डेंग्यूची साथ सहसा पावसाळा संपल्यावरच्या पुढील महिन्यात येते, कारण तेव्हा पावसात वाहणारे पाणी स्थिर होते. डेंग्यूची साथ दरवर्षी याच काळात येते व ती इतक्या उत्तम प्रकारे इशारा देऊनही आम्ही पावसाळा सरून गेल्यावर आंधळेपणाने साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करतो. डेंग्यू पसरवणा-या एडिस डासाची उडण्याची क्षमता १०० मीटरपेक्षा जास्त नसते. त्यामुळे डेंग्यूचे निदान झालेल्या रुग्णाच्या घराच्या १०० मीटर आसपास जरी शोध घेतला, तरी एडिस डासांची खाण सापडते. अशा प्रकारे १० ते १५ दिवस जरी ध्यास घेऊन रुग्णांचा शोध व त्यांच्या १०० मीटरभोवतीच्या परिसराचा सर्व्हे हाती घेतला, तरी डेंग्यू साथीच्या मुळाशी घाव बसेल. हे करण्याएेवजी ‘एडिसची अंडी घराभोवती सापडल्यास पोलिस कार्यवाही’ असा काहीतरी हास्यास्पद फतवा व संजय गांधी स्टाइल साथ नियंत्रण सध्या ऐकिवात येते आहे.

वारंवार येणा-या डेंग्यूच्या साथीबद्दल शासनाने करावयाचा एक पुरोगामी विचार म्हणजे अशा साथी कुठल्याही नियोजनाअभावी होत चाललेले शहरीकरण, नियमांना डावलून होणारे रस्त्यांचे बांधकामांचे अपत्य आहे. बेरोजगारीमुळे लोक कामाच्या शोधात शहरांकडे जाऊन झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. मोठमोठ्या टॉवरचे बांधकाम सुरू असताना साचलेल्या पाण्याच्या नियोजनासाठी कुठलेही नियम नाहीत, म्हणून डासांमुळे होणा-या आजारांना ‘बिल्डर्स डिसीज’ असेही म्हटले जाते. स्मार्ट शहरे उभारताना पुलाखाली झोपणारे सावज अशा साथींमध्ये चिरडले जाणार आहेत. याचा अर्थ आर्थिक प्रगती नकोच असा नाही, पण आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक प्रगतीही आवश्यक असल्याची आठवण आपल्याला डेंग्यूची साथ देते.
amolaannadate@yahoo.co.in