आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खगोलविदांची 'सरस्वती' (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाशगंगा या अब्जावधी तारे, वायू, धुळीच्या बनलेल्या असतात आणि या  आकाशगंगा प्रचंड अशा महासमूहाच्या (सुपर क्लस्टर) भाग असतात. म्हणजे एखाद्या सुपर क्लस्टरमध्ये लाखो अब्ज आकाशगंगा असतात. या आकाशगंगांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये प्रचंड उलथापालथी होत असतात, त्यांच्या केंद्रात महाकाय कृष्णविवरांची निर्मिती होत असते, या कृष्णविवरांतून ऊर्जाकण उत्सर्जित होत असतात व हे ऊर्जाकण प्रकाशवेगाने ब्रह्मांडात फेकले जात असतात. आपली आकाशगंगा ‘लानियाकिआ’ या सुपर क्लस्टरचा एक भाग आहे आणि या सुपर क्लस्टरमधील एक इवलीशी आपली सौरमाला. या सौरमालेतला एक सूक्ष्म बिंदू म्हणजे आपली पृथ्वी आहे. खगोलविज्ञान असे मानते की, या अनंत-असीम अशा पसरलेल्या ब्रह्मांडात अगणित आकाशगंगा असून कुठे ना कुठे आपल्या पृथ्वीसारखे जीवन या आकाशगंगेत अस्तित्वात असू शकते. म्हणून खगोलविज्ञान एखाद्या आकाशगंगेचा शोध घेण्यापेक्षा अगणित आकाशगंगा असलेल्या सुपर क्लस्टरचा शोध घेण्याला प्राधान्य देते. हा शोध घेण्यासाठी रेडिओ दुर्बिणीशिवाय अन्य पर्याय नसतो. कारण रेडिओ लहरींच्या माध्यमातून या महाकाय आकाशगंगेपर्यंत पोहोचता येते. पुण्यातील ‘आयुका’ व ‘आयसर’ या दोन खगोल संस्था व अन्य संस्थांना सुमारे ४ अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या अशाच एका ‘महाकाय रेडिओ आकाशगंगा’ समूहाचा शोध लागला आहे. या महासमूहाचे नामकरण ‘सरस्वती’ असे केले असून या सर्व संस्था २० वर्षे अशा सुपर क्लस्टरचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होत्या. २०१४ मध्ये या संस्थांमधील शास्त्रज्ञांनी हवाई येथील विद्यापीठात ‘सरस्वती’चे संशोधन मांडले होते. आता हे संशोधन अमेरिकन अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या ‘द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये १९ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. हा शोधप्रबंध प्रसिद्ध होण्याचा अर्थ असा की, पुण्यातील शास्त्रज्ञांच्या संशोधनाला मान्यता मिळाली आहे. भारतीय खगोल शास्त्रज्ञांच्या या अथक प्रयत्नांना व संशोधनाला ही आंतरराष्ट्रीय पावती असून भारतासाठी ही अभिमानास्पद अशी वैज्ञानिक घटना म्हटली पाहिजेे. ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली ‘आयुका’ची स्थापना झाली होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या संस्थेतील शास्त्रज्ञांनी हा पल्ला गाठला, हे विशेषकरून कौतुकास्पद.  
 
भारतीय खगोल शास्त्रज्ञांच्या या शोधामुळे खगोलविज्ञानातील एका लोकप्रिय अशा गृहितकालाही धक्का बसला आहे. आजपर्यंत ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा विचार करताना खगोलविज्ञान ‘कोल्ड डार्क मॅटर’ या मॉडेलचा वापर करत होते. या मॉडेलनुसार हे ब्रह्मांड अनेक छोट्या आकाशगंगांच्या निर्मितीपासून तयार झाले असून अगणित अशा छोट्या आकाशगंगांचे एक सुपर क्लस्टर (महासमूह) तयार होते असे मानले जात होते. पण हे गृहितक ‘सरस्वती’च्या शोधामुळे कदाचित बाद ठरवले जाण्याची शक्यता आहे. भारतीय शास्त्रज्ञांना ‘सरस्वती’ हाच मोठा सुपर क्लस्टर सापडल्याने खगोलविज्ञानाला ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा  शोध घेणारा  नवा मार्ग  सापडला आहे. या ‘सरस्वती’ची वैशिष्ट्येही चकित करणारी अशी आहेत. आपल्या विश्वाचे वय जेव्हा एक हजार  कोटी वर्षे होते तेव्हा ‘सरस्वती’ सुपर क्लस्टर जसे होते तसे आता पाहायला मिळाले आहे. कारण ‘सरस्वती’वरून आपल्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यास इतका कालावधी लागला. ताऱ्यांचे अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिमाण वापरतात. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर. प्रकाशाचा वेग सेकंदाला सुमारे तीन लाख किमी इतका असतो. यावरून कल्पना करता येईल की ‘सरस्वती’ सुपर क्लस्टर आपल्यापासून किती दूर आहे. ‘सरस्वती’चा आकार आपल्या ३३ आकाशगंगांएवढा असून त्याचे वस्तुमान दोनवर १५ शून्य इतक्या सूर्याच्या वस्तुमानाएवढे आहे. आजपर्यंत खगोलविज्ञानाला आकाराने कमी असलेल्या समूहांचा शोध लागला होता, पण ‘सरस्वती’सारख्या सुपर क्लस्टरच्या शोधामुळे खगोलविज्ञानाला आकाशगंगेच्या निरीक्षणाला एक वेगळा आयाम मिळाला आहे. आजच्या खगोलविज्ञानात सुपर क्लस्टरचे संशोधन हा नवा संशोधन मार्ग समजला जातो. कारण या मार्गातून आपण आपल्या आकाशगंगेच्या उत्पत्तीपर्यंत जाऊ शकतो, असे विज्ञानाला वाटते. आपल्या आकाशगंगेतील अब्जावधी कृष्णविवरे हाही खगोलविज्ञानाचा जिज्ञासेचा विषय आहे. आयुकातील शास्त्रज्ञ असे मानतात की, ‘सरस्वती’च्या शोधामुळे कृष्णविवरांच्या जीवनचक्राची माहिती मिळू शकेल. भारतीय संस्कृतीत सरस्वती देवी विद्या, संगीत, कला, निसर्ग व बुद्धीची देवता म्हणून मानली जाते. आयुकाने ‘सरस्वती’चा शोध घेऊन भारतीय खगोलविज्ञान संशोधन परंपरेत मैलाचा दगड रोवला आहे.
बातम्या आणखी आहेत...