आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैज्ञानिक आणि अनैतिहासिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या शनिवारी मुंबईत १०२ व्या भारतीय सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करताना मोदी यांनी महाभारतातील कर्णाचा जन्म जेनेटिक सायन्सच्या माध्यमातून झाला होता व गणपतीची सोंड प्राचीन भारतात प्लास्टिक सर्जरीचे तंत्र पुढारलेले असल्याचे उदाहरण असल्याचे वक्तव्य केले होते. देशाचे पंतप्रधान असे अशास्त्रीय विधान जाहीररीत्या करत असताना मीडियाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. देशाचे पंतप्रधानच अवैज्ञानिक घटनांचे उदात्तीकरण करत असताना पुराणमतवाद्यांना मोकळे रान मिळाले नसते तर नवलच होते. आता संघ परिवाराने व त्यांच्याशी संलग्न गटांनी विविध व्यासपीठांचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. याचे उदाहरण मुंबईत होणार्‍या भारतीय सायन्स काँग्रेसमध्येही दिसून आले आहे. या परिषदेत "एन्शन्ट इंडियन एव्हिएशन टेक्नॉलॉजी' व "अ‍ॅडव्हान्सेस इन सर्जरी इन एन्शन्ट इंडिया' अशा दोन परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे परिसंवाद अवैज्ञानिक गोष्टींना विज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचे थेट प्रयत्न आहेत. भाजपची सत्ता केंद्रात आल्यानंतर इतिहास पुनर्लेखनाचे प्रयत्न सुरू झाले आहेतच व पुराणातील सांगोवांगीच्या गोष्टींना अधिकृत इतिहास व विज्ञानातील उदाहरणांची प्रतिष्ठा देण्याचे काम सुरू असताना हा एक ठळक प्रयत्न आहे. सोमवारीच भारतीय इतिहास परिषदेने पंतप्रधानांसह सरकारमधील मंत्र्यांनी ऐतिहासिक घटनांबद्दल विसंगत विधाने करू नये, असे सुनावले आहे. अनेक इतिहासकारांनी अनेक दशके संशोधन करून पुराव्यांच्या आधारे शास्त्रीय पद्धतींच्या माध्यमातून इतिहासाचे लेखन केलेले असते. अशा वेळी अवैज्ञानिक वक्तव्ये करून ते बदलण्याचा आग्रह धरणे म्हणजे समाजात दुहीची बीजे पेरण्याचे प्रयत्न आहेत, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. परिषदेची ही रोखठोक भूमिका भारतीय सायन्स काँग्रेसने अधिक पुढे न्यायला हवी होती, पण त्यांनी ती नजरेआड केली आहे. मुंबईतल्या अधिवेशनात देशातील व जगभरातील शेकडो विज्ञान संशोधक, प्राध्यापक व तज्ज्ञ येणार असल्याने त्यांच्या उपस्थितीत असे अवैज्ञानिक, अशास्त्रीय परिसंवाद ठेवून आयोजकांनी आपले हसे करून घेतले आहे.