आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अमेरिकन ड्रीम’ला तडे (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी मूल्ये ही रसरसून जगण्याचा मार्ग आहे, असे समजले जाते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विशाल कक्षा, मुक्त जीवनशैली व जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले आर्थिक स्वातंत्र्य अशा चौकटीत ‘अमेरिकन ड्रीम’ पाहिलं जातं. ६० ते ८० च्या दशकात भारतातून आयआयटीतून शिकलेले शेकडो बुद्धिवान तरुण अमेरिकेकडे ओढले गेले ते केवळ जगण्यासाठी नाही, तर तेथे मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या संधींमुळे, बुद्धिमत्तेला मिळणाऱ्या अवकाशामुळे.
 
आज अमेरिकेत स्थायिक होऊ पाहणारी भारतीयांची तिसरी पिढी आहे. आणि प्रत्येक पिढीतल्या भारतीयाचा खारीचा वाटा अमेरिकेच्या समृद्धीत आहे, अमेरिकेला हवे असणाऱ्या ‘अमेरिकन ड्रीम’ साकारण्यात आहे. पण गेल्या तीन-चार वर्षांत व आता ट्रम्प सरकार आल्यामुळे अमेरिकेतले वातावरण असे काही बिघडले  आहे की ‘अमेरिकन ड्रीम’ला ट्रम्प यांच्या ‘अमेरिकन फर्स्ट’मुळे तडे जाऊ लागले आहेत. ट्रम्प यांचे वादग्रस्त निर्वासित धोरण हे त्याला काही अंशी कारणीभूत आहे; पण ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेत स्थलांतरितांविषयी, निर्वासितांविषयी जी द्वेषयुक्त भावना पेरण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू केला आहे, ती एवढी भयावह आहे की त्याची विषारी फळे आता दिसू लागली आहेत. हैदराबादचा इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोतला या तरुणाची दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील कान्सास या प्रांतात झालेली हत्या हे त्याचे ढळढळीत उदाहरण म्हणता येईल.
 
एका निवृत्त अमेरिकी नौदल अधिकाऱ्याने एका बारमध्ये श्रीनिवास व त्याच्या मित्राला उद्देशून, आमच्या देशातून चालते व्हा अशी धमकी दिली आणि त्यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या.  या दुर्दैवी घटनेत श्रीनिवास ठार झाला, तर त्याचा मित्र जखमी झाला. एवढी भीषण घटना घडत असतानाही माणुसकीच्या नात्यातून या हल्लेखोराला रोखण्याची हिंमत एका अमेरिकी तरुणाने दाखवली. त्याच्याही अंगाला गोळी चाटून गेली. पण या घटनेमुळे पसरणारी कंपनं अशी वेगाने जगभर पसरली की चोहोबाजूंनी ट्रम्प यांच्या एकूणच स्थलांतरित, निर्वासितांवरच्या धोरणावर जोरदार टीका झाली. हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनीही या विषयुक्त, द्वेषपूर्ण भाषेमुळे असे परिणाम भोगावे लागतात, अशी प्रतिक्रिया दिली.
 
व्हाइट हाऊसलाही या घटनेचा व ट्रम्प सरकारच्या निर्वासित धोरणाचा संबंध नसल्याचा दावा करावा लागला; पण या घटनेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या जगभरातील व प्रामुख्याने आशियाई वंशांच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या समुदायात आपल्या जीविताची जबाबदारी अमेरिकी सरकार घेऊ शकणार नाही, असा समज पसरत चालला आहे. श्रीनिवास यांची पत्नी सुनयनाने, आम्ही अमेरिकेचा भाग आहोत ना, असा आर्त सवाल करत असे हल्ले थांबविण्यासाठी अमेरिकेचे सरकार काय करणार, असा सवालही विचारला आहे. सुनयनाच्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न आहेत. स्थलांतरितांच्या अस्थिर आयुष्याबरोबर त्यांच्या जिवाला असलेल्या धोक्याची भीती आहे. कारण केवळ एक श्रीनिवास नव्हे तर हजारो अशा बुद्धिमान तरुणांना अमेरिकेसाठी चांगले काम करण्याची इच्छा असते. ते मेहनती असतात व एका परीने जगाच्या भल्यासाठीही असे तरुण काम करत असतात. 
 
श्रीनिवास ज्या कंपनीत नोकरी करत होता त्या कंपनीच्या परिसरामध्ये ८६ भाषा बोलल्या जातात. एका अर्थाने जगाच्या सर्व संस्कृती तिथे एकत्र नांदताहेत असे वातावरण होते. अमेरिकेत नोकरीसाठी आलेल्या बहुसंख्य आशियाई वंशाच्या तरुणांना अमेरिकेत केवळ पैसा किंवा छानछोकीचे आयुष्य जगायला मिळते म्हणून यावेसे वाटत नाही, तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करण्याची इच्छा असते. आपली बुद्धिमत्ता, आपली मेहनत याला अमेरिकेत न्याय मिळेल हा आशावाद त्यांच्याठायी असतो. सिलिकॉन व्हॅलीतल्या बहुसंख्य कंपन्यांमध्ये काम करणारे भारतीय व अन्य देशांचे नागरिक अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत आपल्या बौद्धिक संपदेची भर टाकत असतात. ट्रम्प ज्या ‘अमेरिकन फर्स्ट’ची घोषणा सातत्याने करत अमेरिकेतील स्थलांतरित, निर्वासितांना अस्वस्थ करत असतात त्या घोषणेला मूर्त स्वरूप या लोकांना बरोबर घेऊनच द्यावे लागणार आहे. अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली असो वा वॉल स्ट्रीट, हॉलीवूड असो की मॅनहॅटन की अमेरिकेतील अन्य समृद्ध राज्ये असो, यांच्या प्रगतीला हातभार हा स्थलांतरितांचा आहे. त्यांचे योगदान पुसून टाकणे, धर्म, जात, वंश याला महत्त्व देऊन निष्पाप, प्रामाणिक स्थलांतरितांची हत्या करून त्यांना देशोधडीला लावणे ही अमेरिकेची संस्कृती नव्हे. अमेरिकेने जग बदलले आहे, पण आता जगात होणाऱ्या बदलांना अमेरिकेने स्वीकारले पाहिजे. अमेरिकेत वाढणारी द्वेषमूलक भावना जगाच्या आरोग्याला हानिकारक आहे.
बातम्या आणखी आहेत...