आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वदेशी - "विशाल' युद्धनौकेची नांदी, अणुशक्तीच्या वापराने पल्ला वाढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नौदलासाठी सुमारे ६५ हजार टन वजनाची ‘विशाल’ ही भारतात बांधली जाणारी आजपर्यंतची देशातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका असेल. या बहुप्रतीक्षित प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. अणुशक्तीचा वापर केल्यामुळे ‘विशाल’चा पल्ला बराच वाढणार आहे.
भारतीय नौदलासाठी ‘विशाल’ हे आणखी एक विमानवाहू जहाज स्वदेशातच बांधण्याच्या बहुप्रतीक्षित प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे या जहाजाच्या प्राथमिक कामाला लगेच सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र, हे जहाज भारतीय नौदलात दाखल होण्यासाठी किमान १० ते १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय नौदलाच्या भविष्यकालीन गरजांनुरूप हे जहाज बांधले जाणार आहे.

भारताने १९६१ पासून आजपर्यंत आपली विमानवाहू जहाजांची गरज ब्रिटन आणि रशियाकडून (विक्रांत, विराट व विक्रमादित्य) भागविली आहे. आपल्या नौदलासाठी स्वदेशातच दोन विमानवाहू जहाजे बांधण्याचा विचार सर्वप्रथम १९८९ मध्ये मांडण्यात आला होता. त्या वेळच्या नियोजनानुसार त्यातील पहिले जहाज २००० मध्ये आणि दुसरे पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतीय नौदलात सामील होणे अपेक्षित होते. पण निर्णयप्रक्रियेतील परंपरागत दिरंगाईमुळे भा.नौ.पो. विक्रांत (आयएनएस विक्रांत) हे पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज २०१८ मध्ये नौदलात दाखल होत आहे. त्याचे बहुतांश काम पूर्ण होत आल्याने आता दुसऱ्या विमानवाहू जहाजाच्या बांधणीसाठी केंद्र सरकारने नुकतेच तीस कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून हैदराबादस्थित नौदलाच्या ‘डायरेक्टोरेट ऑफ नेव्हल डिझाइन’द्वारे नव्या जहाजाचे आरेखन करण्यात येणार आहे. हे काम येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर या जहाजाच्या प्रत्यक्ष बांधणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर आठ ते दहा वर्षांनी हे जहाज नौदलात दाखल होईल.

सुरुवातीच्या संकल्पनेनुसार, दोन्ही स्वदेशी विमानवाहू जहाजे समान आरेखनाची आणि २५ हजार टन वजनाची असणार होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नौदलाच्या कार्यक्षेत्रात झालेली प्रचंड वाढ आणि वाढलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन नौदलाने मोठ्या आकाराच्या विमानवाहू जहाजांची मागणी केली आहे. भविष्यात नौदलाला विमानवाहू जहाजावरून अवजड विमाने हाताळावी लागणार असल्याने दुसरे स्वदेशी विमानवाहू जहाज (आयएनएस विशाल) पूर्णपणे वेगळ्या आरेखनाचे असणार आहे.

सुमारे ६५ हजार टन वजनाचे ‘विशाल’ हे भारतात बांधले जाणारे आजपर्यंतचे सर्वात मोठे जहाज असेल. भारतीय नौदलात आजपर्यंत व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग व शॉर्ट टेक-ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (स्टोबार) या तंत्रावर आधारलेली विमानवाहू नौका घेतली होती. दोन दशकांपूर्वी भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर त्याच्या राष्ट्रहिताचाही मुख्य भूमीपासून दूरवर विस्तार झालेला आहे. अलीकडच्या काळात चीनच्या नौदलाच्या हिंदी महासागरातील हालचालीही वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारताला आपल्या सुरक्षेच्या हेतूने नौदलाची शक्ती वाढविण्याची गरज अधिकच प्रकर्षाने जाणवू लागली आहे. नौदलाची शक्ती वाढवण्याचा एक भाग म्हणून आणखी एका स्वदेशी विमानवाहू जहाजाच्या बांधणीचे काम आता हाती घेण्यात आले आहे.

जहाजे कार्यरत आहेत. मात्र ‘विशाल’मध्ये वाफेवर आधारित कॅटॅपल्ट असिस्टेड टेक-ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (कॅटोबार) तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलाच्या अन्य विमानवाहू जहाजांप्रमाणे याच्या डेकवरील धावपट्टीला पुढील बाजूस स्की-जंप केलेली नसणार आहे. पूर्वीच्या ‘विक्रांत’वर सुरुवातीला अशी कॅटोबार यंत्रणा होती. ‘विशाल’च्या आरेखनासाठी सहकार्य देण्याबाबत आणि यावरून विमानांच्या संचलनासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच सिस्टिम (ईएमएएलएस) ही कॅटोबारचीच सुधारित आवृत्ती पुरविण्याबाबत अमेरिकेने तयारी दर्शविली आहे. वाफेवर आधारित पारंपरिक कॅटोबार यंत्रणेपेक्षा ही यंत्रणा अधिक किफायतशीर पण महागडी आहे. या यंत्रणेमुळे अधिक वजनदार आणि मोठ्या आकाराच्या विमानांना जहाजावरून उड्डाण करणे सोपे जाते. पण अमेरिकेकडून असे तांत्रिक सहकार्य घेताना आपल्या विमानवाहू जहाजाच्या संचालनाच्या स्वातंत्र्यावर भविष्यात बंधने येणार नाहीत, याबाबत भारताला सर्वाधिक जागरूक राहावे लागणार आहे. हे जहाज चालविण्यासाठी अणुशक्तीच्या पर्यायावरही विचार करण्यात येत आहे. त्यासाठी रशियाचे सहकार्य घेण्याबाबत विचार सुरू आहे. अणुशक्तीचा वापर केल्यामुळे ‘विशाल’चा पल्ला बराच वाढणार आहे. मात्र यामुळे या जहाजाच्या बांधणीच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे.

‘विशाल’चे आरेखन पूर्णपणे वेगळे असल्यामुळे त्यावर तैनात केल्या जाणाऱ्या विमानांच्या पर्यायाबाबतही वेगळा विचार करावा लागणार आहे. सध्याची ‘मिग-२९ के’ ही लढाऊ विमाने स्टोबार तंत्रावर आधारलेली आहेत. त्यामुळे ‘विशाल’वर ही विमाने तैनात केली, तर त्या विमानांमध्ये काही सुधारणा कराव्या लागतील. तसेच अन्य विमानांच्या पर्यायावरही नौदलाचा विचार करावा लागेल. या जहाजावर शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हवाई दलाप्रमाणे ‘ॲवॅक्स’ विमाने तैनात करण्याचा नौदलाचा विचार आहे. ही विमानेही भारतीय नौदलात स्वतंत्रपणे समाविष्ट करावी लागतील. सध्याच्या ३० कोटी रुपयांच्या तरतुदीतून या सर्व बाबींवर सखोल विचार करण्यात येणार आहे. या जहाजाच्या बांधणीत परदेशांची मदत घेतली जाणार असली तरी त्याचे आरेखन व त्यावरील किमान ६०-६५ टक्के यंत्रणा स्वदेशी बनावटीच्याच असणार आहेत.

जहाजावरील मर्यादित धावपट्टीवर विमानांना उतरणे शक्य व्हावे यासाठी त्यावर तीन अरेस्टेड वायर बसविण्यात येणार आहेत. विमानांच्या मागील हूक या वायरमध्ये अडकून ते जागच्या जागी थांबेल. या धावपट्टीखाली विमाने व हेलिकॉप्टरच्या देखभालीसाठी हँगरही असेल. नौसैनिकांसाठी अत्याधुनिक रुग्णालय, चित्रपटगृह, स्वयंपाकघर, बेकरी इत्यादी सुविधाही यावर उपलब्ध असतील. या जहाजावर अत्याधुनिक संदेशवहन यंत्रणा, क्षेपणास्त्रे, रॉकेट, रडार इत्यादी बसविले जाणार आहे.

भारतीय नौदलाला आज किमान तीन विमानवाहू जहाजांची आवश्यकता भासत आहे. मात्र नौदलाची ही गरज कधीच पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ‘विशाल’च्या समावेशापर्यंतही ती पूर्ण होणार नाही. सध्या भारतीय नौदलात ‘विराट’ आणि ‘विक्रमादित्य’ ही दोन विमानवाहू जहाजे कार्यरत आहेत. त्यातील विराट २०१६ मध्ये निवृत्त होत आहे. त्यानंतर नवी ‘विक्रांत’ येईपर्यंत नौदलाला ‘विक्रमादित्य’वरच विसंबून राहावे लागणार आहे. ‘विक्रांत’ सेवेत आले तरी नौदलाकडे आवश्यकतेपेक्षा एक विमानवाहू जहाज कमीच असणार आहे.
parag12951@gmail.com
बातम्या आणखी आहेत...