आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसआयची नवी रणनीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या दोन एजंटांना मागच्या वर्षी जम्मू- काश्मीर सेनेने जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पकडले. त्यानंतर ७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. आता मराठवाड्यातल्या लातूरमध्ये दोन अवैध टेलिफोन एक्स्चेंज सापडले आहेत. या एक्स्चेंजच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय काॅलचे स्थानिक काॅलमध्ये रूपांतर केले जात होते. या दोन घटनांचा एकमेकांशी अर्थाअर्थी काय संबंध, असा प्रश्न हे वाचणाऱ्याला पडू शकतो. त्याचे उत्तर आहे, या दोन्ही घटनांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. जम्मूत अटक झालेल्या दोघांकडून जी माहिती समोर आली त्याचे धागे थेट या एक्स्चेंजच्या माध्यमातून लातूरपर्यंत पोहोचले अाहेत.   

संगणकीय कार्यप्रणालीचा उपयोग करून आंतरराष्ट्रीय इंटरनेट काॅलला भारतीय व्हॉइस काॅलमध्ये रूपांतरित करण्याचे काम या एक्स्चेंजच्या माध्यमातून होत होते. स्थानिक दोन तरुण हे केंद्र  गेल्या सहा महिन्यांपासून चालवत होतेे. या टेलिफोन एक्स्चेंजवरून दहशतवादी कृत्याचे काही संकेत अजून मिळालेले नसले तरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून येणाऱ्या आणि तिकडे केल्या जाणाऱ्या दूरध्वनींच्या नोंदी या एक्स्चेंजवर झाल्या आहेत. या दोन एक्स्चेंजमुळे दूरसंचार खात्याचे सुमारे १६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. ही सर्व प्राथमिक माहिती आहे.  जम्मू- काश्मीर सेनेने दिलेल्या माहितीवरून दहशतवादविरोधी पथकाने दिल्लीत २४ जानेवारी २०१७ ला छापा टाकून गुलशन कुमार सेन नामक व्यक्तीला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार महिनाभराने बिहारमध्ये छापा टाकून मनोज मंडल नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आणि आणखी १० जण वेगवेगळ्या ठिकाणांहून उचलण्यात आले.  मनोज मंडल अशाच प्रकारचे अवैध टेलिफोन एक्स्चेंज चालवत होता. गुलशन कुमार सेन हा या सर्व कारवायांचा म्होरक्या होता आणि तोच पाकिस्तानी आयएसआयला भारतीय धोरणात्मक माहिती पुरवत होता. त्यासाठी त्याला एक लाख रुपये महिन्याला मिळत होते, अशीही माहिती पथकाला मिळाली. देशभरात अशा प्रकारचे किमान १०० टेलिफोन एक्स्चेंज या टोळीमार्फत चालवले जात असल्याची माहितीही त्याच वेळी तपास यंत्रणांच्या हाती लागली होती. तोपर्यंतच्या माहितीनुसार भारतीय दूरसंचार कंपनीचे किमान दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले होते. जी १०० केंद्रे देशभर चालवली जात असल्याची माहिती त्या वेळी समोर आली होती त्यातलीच लातूरची ही दोन केंद्रे आहेत. अजून किमान ९५ ठिकाणची अशी केंद्रे समोर यायची आहेत. ती कुठे कुठे सुरू असतील आणि केव्हा सापडतील हा प्रश्नच आहे. एटीएसच्या या कारवाईमुळे मराठवाड्याचा संबंध मात्र  पुन्हा एकदा दहशतवादाशी जोडला गेला आहे.  

या प्रांताचा पहिला उल्लेख दहशतवादी कृत्यासाठी झाला होता तो  नोव्हेंबर १९९८ मध्ये. त्या वेळी नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद येथे आझम घौरी हा बाॅम्ब बनवत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर २००२ मध्ये त्याने नांदेड शहरातल्या एका चित्रपटगृहात बाॅम्बस्फोट घडवून आणला. पुढे तो आंध्र प्रदेश पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. सिमी या संघटनेशी तो संबंधित होता. नांदेडमधील या स्फोटाने कथित ‘हिंदू दहशतवादा’ला जन्म दिला, तोही मराठवाड्यातच. सन २००३ आणि २००४ मध्ये परभणी जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यात दोन मशिदी आणि एक मदरसा यात बाॅम्बस्फोट घडवून आणले गेले. त्यात एक ठार, तर ४६ जण जखमी झाले. २००५ मध्ये नांदेडमध्ये बाॅम्ब बनवत असताना स्फोट झाला आणि त्यात दाेघे हिंदुत्ववादी तरुण ठार झाले. त्याची प्रतिक्रिया पुन्हा मुस्लिमांमधून उमटली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचा एक तरुण मिर्झा हिमायत बेग याने तिथेच बसून पुण्याच्या जर्मन बेकरीत स्फोट घडवून आणण्याचा कट रचला. लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा ताे महाराष्ट्राचा प्रमुख बनला होता.  वेरूळजवळ २००६ मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्याचा सूत्रधार अबु जिंदाल हादेखील मराठवाड्यातील बीड शहरातला.  हे सगळे संदर्भ लातूरला सापडलेल्या अवैध टेलिफोन एक्स्चेंजमुळे ताजे झाले आहेत. यानिमित्ताने एक गंभीर बाब समोर येते आहे. त्यावर अजून फारशी कोणी चर्चा केलेली दिसत नाही. जानेवारीमध्ये दिल्लीत सापडलेल्या गुलशनकुमार सेनपासून आता लातूरमध्ये सापडलेल्या रवी साबदे आणि शंकर बिरादार या दोन तरुणांपर्यंत ज्या काही १४-१५ जणांना अटक करण्यात आली आहे ते सर्व बिगर मुस्लिम आहेत. आतापर्यंत मुस्लीम तरुणांवर सहज संशय घेतला जात होता आणि मुस्लिम धर्मीयांकडे संशयाने पाहण्याची प्रवृत्ती वाढत होती. आता आयएसआयने आपली रणनीती बदलल्याचे हे संकेत आहेत. 

- निवासी संपादक, औरंगाबाद