आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मांध दहशतवादाचा क्रूर चेहरा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल कायदापासून वेगळे होऊन स्थापन झालेल्या ‘इसिस’ या संघटनेने जिहादच्या नावाखाली सुरू केलेला उच्छाद अधिकाधिक क्रूर वळण घेत आहे. इसिसने पसरवलेल्या दहशतवादाचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत चालले असून त्याच्या झळा जगाच्या सर्वच खंडांतील देशांना बसू लागल्या आहेत. सिरियातील रक्का या शहरावर इसिसने कब्जा केला असून त्यांच्याविरोधातील कारवाईत सहभागी झालेल्या जॉर्डन हवाई दलातील मोआझ अल कासासबेह या वैमानिकाला इसिसच्या दहशतवाद्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये पकडले होते. मोआझ व जपानी पत्रकार केंजी गेतो यांच्या मुक्ततेच्या बदल्यात इसिस आपली साथीदार साजिदा अल रिशवी हिची सुटका व १२०० कोटी रुपयांची खंडणी मागत होते.

जॉर्डनने त्याची तयारीही दाखवली होती. मात्र प्रत्यक्ष कृती करण्यास जॉर्डनने विलंब लावल्याने इसिसने आधी पत्रकार केंजी गेतो याचा शिरच्छेद केला व त्यानंतर मंगळवारी मोआझ अल कासासबेह याला पिंजर्‍यात डांबून जिवंत जाळले. मानवतेला काळिमा फासणार्‍या या कृत्याला चोख प्रत्युत्तर म्हणून जॉर्डनने आपल्या ताब्यात असलेल्या इसिसच्या साजिदा व करबौली या दोन दहशतवाद्यांना बुधवारी फाशी दिली. मोआझ अल कासासबेह याला जिवंत जाळल्याबद्दल निषेध करण्यासाठी जॉर्डनच्या काही भागातील नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी इसिसवरील कारवाईत जॉर्डन सहभागी असल्याबद्दलही तीव्र टीका केली. जॉर्डनच्या ताब्यात असलेल्या साजिदा अल रिशवी हिने २००५ मध्ये अम्मान येथे घडवलेल्या तीन बॉम्बस्फोटात ६० जण ठार झाले होते, तर अल करबोली याने २००८ मध्ये इराकमधील जॉर्डेनियन नागरिकांवर दहशतवादी हल्ले चढवले होते.

या दहशतवादी कारवायांबद्दल साजिदा व करबौली यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पत्रकार केंजी गेतो व वैमानिक मोआझ अल कासासबेह यांच्या क्रूर हत्येनंतर इसिसविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचे जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह दुसरे व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यातील चर्चेतून ठरवण्यात आले. सध्या जगात विविध ठिकाणी २१ युद्धे सुरू असून त्यातील बहुतांश युद्धे जिहादच्या नावाखाली लढवली जात आहेत. बोको हराम असो वा इसिस, या दहशतवादी संघटनांना नामशेष करण्यासाठीचा खात्रीलायक उपाय सध्या कोणत्याही देशाकडे नाही. जग धर्मांध दहशतवादरूपी कड्याच्या टोकावर उभे आहे!